भारताप्रमाणेच बांगलादेशातसुद्धा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतात निवडणुका जवळ येताच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. पण, बांगलादेशमध्ये सरकार आणि विरोधक एकमेकांवर चक्क गोळीबार करत असल्याच्या घटनाही अलीकडेच घडल्या आहेत. बांगलादेशमध्ये २००९ पासून सत्तेत असलेली ‘अवामी लीग’ आणि खालिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’मध्ये हिंसक संघर्ष उफाळून आला आहे. बांगलादेशमधील अशांततेचा परिणाम भारतावर होतो. त्यामुळे बांगलादेशमधील घडामोडींवर भारतही लक्ष ठेवून आहे.
बांगलादेशच्या स्थापनेसाठी भारतीय सैनिकांनी आपले बलिदान दिले होते. बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाल्यानंतरही भारत बांगलादेशच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आला. मात्र, बांगलादेशच्या स्थापनेपासूनच या देशात दोन गट निर्माण झालेले दिसतात. एक गट हा धर्माच्या आधारावर पाकिस्तानसोबत चांगल्या संबंधांची वकिली करतो. या गटाचे नेतृत्व पाकिस्तानपोषित कट्टरवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’ करते, तर दुसरा गट धर्माला बाजूला सारून बांगला संस्कृती आणि बांगला भाषेवर प्रेम करणार्यांचा, ज्याचे राजकीय नेतृत्व सध्या ‘अवामी लीग’च्या शेख हसीना यांच्याकडे आहे.बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर्रहमान यांच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये १९९० पर्यंत लष्करी राजवट होती. या काळात बांगलादेशमध्ये कट्टरवादी इस्लामिक शक्तींचा उदय झाला. या इस्लामिक कट्टरवाद्यांची सर्वात मोठी संघटना आहे, ‘जमात-ए-इस्लामी.’ याच ’जमात-ए-इस्लामी’ संघटनेने धर्माच्या नावाखाली बांगलादेशच्या मुक्ती संग्रामाला विरोध केला.
भारतात बाबरी ढाँचा पाडल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूविरोधी दंगली भडकवल्याचा आरोप ’जमात-ए-इस्लामी’वर आहे. याच ’जमात-ए-इस्लामी’ आणि ’बीएनपी’च्या एक लाख कार्यकर्त्यांनी शनिवारी ढाक्याच्या रस्त्यावर अक्षरश: धुडगूस घातला. या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. हे आंदोलक शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. बांगलादेशमध्ये जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होतील. या निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी हसीना यांनी सत्ता सोडून काळजीवाहू सरकारची स्थापना करावी, अशी विरोधकांची मागणी.
२००९ मध्ये सत्तेत आल्यापासून शेख हसीना यांच्यावर विरोधकांचे दमन केल्याचे आरोप केले जात आहेत. त्यांच्याच काळात ‘बीएनपी’च्या मुख्य नेत्या खालिदा झिया या पाच वर्षांपासून आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत, तर त्यांचे पुत्र तारिक रहमान लंडनमध्ये निर्वासित जीवन जगत आहेत. त्यामुळे बांगलादेशमधील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेले ‘बीएनपी’चे राजकीय अस्तित्व सध्या संकटात आहे. ’जमात-ए-इस्लामी’चे बांगलादेशमध्ये उपद्रवी मूल्य असले, तरी या संघटनेच्या पक्षाला बांगलादेशच्या मुख्य धारेच्या राजकारणात लोकप्रियता नाही. त्यामुळे २००९ पासून शेख हसीना यांची ‘अवामी लीग’ बांगलादेशमध्ये एकहाती सत्ता उपभोगत आहे.
शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशमध्ये इस्लामिक कट्टरवाद नियंत्रणात आला. बांगलादेशच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्याचे आणि त्याला एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनविण्याचे श्रेयही हसीना यांचेच. बांगलादेशातील कोट्यवधी नागरिकांना गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढल्याबद्दल त्यांच्या सरकारचे जगभर कौतुक झाले. पण, त्यांच्यावर हुकूमशाही वृत्तीचा अवलंब करून राजकीय विरोधकांना आणि सरकारवर टीका करणार्यांना दडपण्याचा आरोपही केला गेला. यासाठी त्यांना पाश्चिमात्य देशांच्या रोषालासुद्धा सामोरे जावे लागले. पण, बांगलादेशमध्ये इस्लामिक कट्टरवादाला बळ देणार्या पक्षाची सत्ता येणे हे निश्चितच भारताच्या हिताचे नाही.
भारताच्या पाच राज्यांसोबत बांगलादेशची सीमा असून बांगलादेशी घुसखोरीची समस्या भारताला आजही भेडसावत आहे. पण ‘जमात-ए-इस्लामी’सारखी इस्लामिक कट्टरवादी संघटना सत्तेत आल्यास घुसखोरी आणि दहशतवादाला खतपाणी घातले जाईल.त्यामुळे सध्यातरी बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता भारतीय उपखंडातील शांततेसाठी महत्त्वाचीच!
- श्रेयश खरात