बेकायदा मदरशावर बुलडोझर! धामी सरकारची कारवाई

    02-Nov-2023
Total Views |

Madarsa


देहरादून :
उत्तराखंडच्या सरकारने बेकायदेशीर मदरशावर मोठी कारवाई केली आहे. उत्तराखंडमधील नैनीताल येथील बेकायदेशीर मदरशावर बुलडोझर चालवण्यात आले आहे. यासोबतच बेकायदेशीरपणे बांधलेली शौचालये आणि टिनशेडही पाडण्यात आले आहे.
 
नैनीतालमध्ये २ नोव्हेंबर रोजी अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मागील महिन्यात नैनितालमधील वीरभट्टी गावाजवळ एका अवैध मदरशाचा पर्दाफाश झाल्याने तिथे प्रशासनाने छापा टाकला होता. यावेळी मदरशांमध्ये २४ विद्यार्थी आजारी अवस्थेत आढळून आले. त्यानंतर हा मदरशा बंद करण्यात आला होता.

 
त्यानंतर आता हा मदरशा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या मदरशाच्या संचालकास नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच बेकादेशीरपणे बांधण्यात आलेल्या मदरशा पाडण्यास सांगण्यात आले होते.
 
परंतू, त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली न दिसल्याने आता प्रशासन आणि पोलिसांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने या मदरशाला जमीनदोस्त केले आहे. २६६.०५ चौरस मीटरचा भाग बेकायदेशीर आढळल्याने तो पाडण्यात आला आहे. यासोबतच बेकायदेशीरपणे बांधलेली शौचालये आणि टिनशेडदेखील पाडण्यात आले आहे. ही जागा सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.