एक पार पडलेला चित्रपट!

    18-Nov-2023   
Total Views |
Article on Marathi FIlm Shyamchi Aai

आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. झोपताना, जेवताना गोष्ट ऐकायची परंपराच असते लहानपणी. आई, आजी व आजोबांकडे वार लागलेले असतात. लहान वयात जन्मजात असलेली ज्ञानतृष्णा, अशी कथा ऐकून शमवली जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत, भारतीय परंपरेत गोष्टींतून मूल्यशिक्षण द्यायची पद्धत पुरातन काळापासून रूढ झाली आहे. साने गुरुजींचं सगळं साहित्य लहान मुलांसाठीच लिहिलेलं आहे. आपल्या आईच्या शिकवणीतून आलेला संस्कारांचा वारसा त्यांनी गोष्टी रुपाने नुकत्या वाचू लागलेल्या, सगळ्या लहान मुलांना उपलब्ध करून दिला. आईपासून दूर गेल्यावर आजारी असलेल्या आईच्या आठवणीतून उसळून येणार्‍या स्वतःच्या आयुष्यातल्या गोष्टी ते आश्रमात आजूबाजूला जमलेल्या सर्वांना सांगत असत. त्यातून जन्माला आलं ते ’श्यामची आई’ हे आत्मचरित्रात्मक लहान मुलांसाठी लिहिलेलं गोष्टीचं पुस्तक.

जेव्हा कोणताही विचार आपण पाच वर्षांच्या लहान बाळापासून सत्तरीपार पोहोचलेल्या आजी-आजोबांनाही आवडेल अशा पद्धतीने लिहितो, तेव्हा त्या साहित्यकृतीचे मूल्य स्वाभाविकपणे श्रेष्ठ असते. ती साहित्यकृती कालसापेक्ष असली तरीही कालातीत असते. साने गुरुजींच्या गोष्टीत भूक आहे, गरज आहे, स्वाभिमान आहे, शिक्षणासाठी केलेली ओढाताण आहे, नात्यातले कच्चे ओले धागे आहेत. भावना हेलावणारे अनेक प्रसंग आणि गरिबीच्या दिवसांतली आपल्या माणसांच्या प्रेमाची उब अशा अनेक उत्तम गोष्टी असल्याने या पुस्तकावर चित्रपट पुन्हा एकदा बनवावा, असे निर्मात्यांना वाटणे साहजिकच. पण, तरीही हा चित्रपट तितकासा प्रभावशाली झालेला नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल.

पुस्तक त्या काळातही घराघरात पोहोचलं, अत्र्यांनी त्यावर चित्रपट बनवला. म्हणजे हे पुस्तक चित्रपट या माध्यमातूनही पूर्वप्रदर्शित झालं होतं! त्यावर पुन्हा चित्रपट का बनवला गेला, यामागचे प्रयोजनच फारसे लक्षात येत नाही. एक काळ होता, जेव्हा खेड्यांची रचना परकीय आक्रमणांमुळे सामाजिक स्तरावर विस्कळीत झाली. पण, यातूनच भारतीय राष्ट्रवादाचा उदय होत गेला. हा तोच काळ होता, जेव्हा संपूर्ण भारत एकत्र होऊन जात, भाषा यांची बंधने मोडून आपल्या अस्मितेसाठी, संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणांविरोधात लढत देत होता, तेव्हाचा काळ. आज मात्र भारताच्या कक्षा अजून विस्तारल्या. आज एक राष्ट्र म्हणून भारत एकसंध आहे, तेव्हा या विकसनशील ‘आत्मनिर्भर’ होऊ घातलेल्या भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. अनेक आकांक्षा आहेत. भारताच्या सीमेलगत सुरू असलेली छुपी युद्धे, शीतयुद्धे, अंतराळ क्षेत्रातले संशोधन, स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः तयार करण्याचा संरक्षण क्षेत्रातील विस्तार, आर्थिक आणि चलन अशा अनेक मुद्द्यांवर देश सक्रिय असताना स्वातंत्र्यपूर्व चळवळींतील घडून गेलेल्या, ज्ञात असलेल्या बाबींवर पुन्हा किस पाडणे आता काहीसे अप्रस्तुत वाटते.

संपूर्ण चित्रपट हा कृष्णधवल आहे. कारण, या कथानकातील घटना ज्या काळात घडतात, तो काळच कृष्णधवल असल्यामुळे आजच्या प्रेक्षकांना आणि तरुण पिढीला तो काळ पडद्यावर का होईना, पुन्हा अनुभवता यावा, म्हणून दिग्दर्शकाचा अट्टहास साध्य होतो. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा अभिनय. याबाबतीत मात्र कलाकारांना त्यांचे श्रेय द्यायला हवे. गुरुजींच्या आईची भूमिका साकारलेली अभिनेत्री गौरी देशपांडे हिने तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. याशिवाय साने गुरुजींची बालपणीची भूमिका साकारणार्‍या शर्व गाडगीळ याने मनाला भिडणारा अभिनय आहे. साने गुरुजी आपल्या गोष्टीतून काहीसे मवाळ वाटत असले, तरीही बाळ शाम काहीसा हूड आणि बंडखोर साकारला असल्याने शर्व खूपदा हसवतो.

ओम भूतकरसाठी गुरुजींची भूमिका विसंगत वाटेल, असे वाटले होते. परंतु, ओमच्या चेहर्‍यावरचे त्याच्या स्वभावाला साजेशे स्निग्ध भाव गुरुजींशी अगदी मिळतेजुळते आहेत. संदीप पाठक या कलाकाराचे कौतुक करणे यानिमित्त अगदी गरजेचे वाटते. कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेशी समरस होऊन तो अगदी प्रामाणिकपणे ती निभावतो. माय लेकराच्या प्रेमळ भावना आणि त्या-त्या प्रसंगांना दिलेले संगीत मात्र डोळ्यांच्या पापण्या ओलावते. गीतं जरी जुनीच वापरली असली तरीही ती भिडणारी, भावणारी असल्याने चित्रपटातील नावीन्याचा अभाव समोर फारसा येत नाही. चित्रीकरण करण्यासाठी वापरलेला वाडा, चिर्‍याची घरे, केळीच्या पानावर आणि पत्रावळीवर वाढलेला कढीभात कोकणातील जनजीवनाचे उत्तम दृक् अनुभव देतात.

कथानक मात्र पुस्तकातून जसंच्या तसं घेतल्याने अधेमध्ये तुटक वाटते. नाही म्हटले तरी त्या गोष्टी आहेत, कथा मालिका असली तरीही ती सलग नाही, म्हणूनच चित्रपटाशी पुरेसे एकरूप होता येत नाही. केवळ एका व्यक्तीभोवती कथानक नसल्याने हा चरित्रपटही वाटत नाही. अनेक किस्से सलग एकामागोमाग लावून सांगितले असावे, असा काहीसा अनुभव येतो. परंतु, कथानकातील मजकुरात अस्सलता असल्याने चित्रपट कंटाळवाणा मात्र वाटत नाही. काही घटना, चित्रे मुद्दामहून पेरल्यासारखी वाटतात. त्यातून चित्रपटाची लय तुटते.
 
लोकमान्य टिळक यांच्या प्रभावाने श्यामच्या वडिलांना देशप्रेमाचे महत्त्व पटल्याने प्रखर राष्ट्रप्रेमाची भावना गुरुजींच्या जगण्यात निर्माण झाल्याचे चित्रपटातून दिसते. लोकमान्यांचे भाषण ऐकण्यासाठी गुरुजी जाऊन बसतात. मात्र, लोकमान्य व्यासपीठावर येऊन बोलायला सुरुवात करणार, इतक्यात कॅमेर्‍याने रजा घेतली असल्याने टिळकांच्या विचारांवर जाणूनबुजून पडदा पाडल्यासारखे व त्यायोगे केवळ त्यांचे नाव अधोरेखित केल्यासारखे वाटते.

तसाच दुसरा मुद्दा शाळेच्या वर्गातला. पेशव्यांनी स्वराज्याचा घात केला, हे सांगणारा लहान श्याम आणि पुढच्या मागच्या किश्श्याशी अगदीच विसंगत दृश्यसंरचना (सिन). ही अशी उगाच पेरणी केलेली दृश्य साने गुरुजींच्या शिकवणीवर अन्याय करणारी वाटतात. शासनाकडून मराठी चित्रपटांसाठी वाढवून मिळालेल्या अनुदानातून केवळ आपल्या मनातील खळखळ व्यक्त करत असल्यासारखे चित्रपट पाहून झाल्यावर वाटते. श्याम आणि त्याच्या आईमुळे चित्रपट सुसह्य झाला आहे, एवढे मात्र खरे!
चित्रपट : श्यामची आई
दिग्दर्शक : सुजय डहाके
कलाकार : ओम भूतकर, शर्व गाडगीळ, गौरी देशपांडे, संदीप पाठक
रेटिंग : *
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.