नवी दिल्ली : आग्रा येथील ताजमहाल परिसरात नमाज अदा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पश्चिम बंगालमधील एका तरुणाने दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ताजमहालच्या बागेत हा प्रयत्न केला. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्याला असे करण्यापासून रोखले. यानंतर तरुणाने कॅम्पसमध्ये नमाज बंदीची माहिती नसल्याचे सांगत माफी मागितली.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तरुण बागेत नमाज अदा करण्यासाठी चादर उलगडत होता. मात्र सीआयएसएफ जवानाने त्याला रोखले. आणखी एका पर्यटकाने याचा व्हिडिओही बनवला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक प्रिन्स वाजपेयी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “गुरुवारी एक व्हिडिओ समोर आला आणि पडताळणीनंतर याची पुष्टी झाली की पश्चिम बंगालमधील एका पर्यटकाने ताजमहालच्या बागेत नमाज अदा करण्यासाठी आपली जानमाझ (चटई) उघडली होती. सीआयएसएफच्या जवानांनी त्याला तत्काळ असे करण्यापासून रोखले.
सैनिकांनी पश्चिम बंगालमधील या पर्यटकाला नियंत्रण कक्षात नेले. येथे त्यांनी ताजमहालमध्ये नमाज अदा करण्यावर घातलेल्या बंदीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. लेखी माफीनाम्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. एएसआय अधिकारी वाजपेयी म्हणतात की नमाज अदा करण्यात आली नाही आणि नंतर तरुणांनी नियमांचे पालन केले.तथापि, ताजमहाल संकुलात नमाज अदा करण्याची ही पहिलीच घटना नाही. २६ मे २०२२ ताजमहाल येथे बांधण्यात आलेल्या मशिदीत नमाज अदा करताना हैदराबादमधील तीन आणि आझमगडमधील एकाला अटक करण्यात आली. या सर्वांवर भादंवि कलम १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
२०१८ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने ताजमहाल संकुलाच्या मशिदीमध्ये बाहेरील लोकांना नमाज अदा करण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता, कारण या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक असल्याने त्याचे जतन केले पाहिजे यावर भर दिला होता.
आग्रा जिल्हा प्रशासनाने जानेवारी २०१८ मध्ये आदेश जारी केला होता की स्थानिक लोकांना देखील नमाज अदा करण्यासाठी आवारात प्रवेश करण्यापूर्वी वैध ओळखपत्र दाखवावे लागेल. तसेच दर शुक्रवारी पर्यटकांसाठी बंद असलेल्या ताजमहाल संकुलात बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रशासनाने बंदी घातली होती.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही महिन्यांनी नोव्हेंबरमध्ये एएसआयने ताजमहालमध्ये रोजच्या नमाजावरही बंदी घातली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये, ASI ने शुक्रवार वगळता सर्व दिवस ताजमहालमध्ये नमाज अदा करण्यास बंदी घातली होती.