बोली भाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल - राज्यपाल रमेश बैस

    15-Nov-2023
Total Views |

ramesh bais
नंदुरबार : इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत. परंतु, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
 
नंदुरबार येथे राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.
 
यावेळी राज्यपाल म्हणाले, स्वातंत्र्यानंतर प्रथमच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी जनजातीय गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस देशभरात आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आदिवासी विकास विभागाने १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत हा गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आज या सर्व योजना आणि आदिवासी संस्कृतीचा जागर करण्यासाठी मी आदिवासी विकास विभागाचे अभिनंदन करतो. तसेच मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की भारत सरकार आणि राज्य शासन दोन्ही आमच्या आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी एकत्र काम करत आहेत, करत राहतील, असेही त्यांनी सांगितले.
 
राज्यात ७३ 'नमो शाळा'
 
राज्याचा आदिवासी विकास विभाग १ हजारहून अधिक शाळा चालवत आहे. राज्यात ४९९ सरकारी आश्रमशाळा आणि ५३८ सरकारी अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच ७३ 'नमो शाळा' आहेत, ज्या विज्ञान केंद्र म्हणून आज कार्यरत आहेत. सुपर-५० प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘एनईईटी’ परीक्षांसाठी तयार केले जात आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीही दिली जात आहे. 'मेस्को' सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्रे चालवत आहे, जिथे त्यांना पोलीस दल आणि सशस्त्र दलात भरतीसाठी तयार केले जात आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आदिवासी युवकांसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये क्रीडा आणि साहसी खेळांमध्ये प्राविण्य मिळवण्याची नैसर्गिक क्षमता आहे. तीन-चार वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या आश्रमशाळेतील ५ विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. आमचे तरुण धनुर्विद्या आणि इतर खेळांमध्येही चांगली कामगिरी करत आहेत. आदिवासी विकास आयुक्तालय साहसी क्रीडा उपक्रम आणि प्रशिक्षणाद्वारे युवा नेतृत्व कार्यक्रमात उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन शौर्य’ अभियान राबवत आहेत, अशी माहिती राज्यपालांनी दिली.