राजभवनात पहिल्यांदाच 'झारखंड राज्य स्थापना दिवस' साजरा

    15-Nov-2023
Total Views |

Jharkhand State Foundation Day
 
मुंबई : वनसंपदा, खनिज संपदा व कला यांनी समृद्ध असलेले झारखंड हे राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. या राज्यातील जमिनीच्या उदरात काही ना काही संपदा दडलेली आहे. वृक्ष व निसर्गाची पूजा करणारे आदिवासी लोक या राज्यात आहे. निसर्ग रक्षणाला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे लोकांनी निसर्ग संपदेचे रक्षण केले आहे, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच 'झारखंड राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
 
झारखंडचे सुपुत्र महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन करुन राज्यपालांनी झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. झारखंड राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून राज्य कला, चित्रकला व नृत्य या क्षेत्रात समृद्ध असल्याचे राज्यपालांनी सांगितले. झारखंड राज्याचे दोन वर्षे राज्यपाल म्हणून काम करणे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्व राजभवनांमध्ये विविध राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे केल्यामुळे राज्यांच्या संस्कृतींची ओळख होत आहे व त्यातून राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याला चालना मिळत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
 
 
लोक संस्कृतीचे दर्शन
 
झारखंड सरकारचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, जय फाउंडेशन व रुद्र प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून झारखंडच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात छट पूजा, छऊ नृत्य, कावड यात्रा, पैका नृत्य, फगुआ नृत्य, करम नृत्य, माघे नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते जय व रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह, खासदार संजीव नाईक, झारखंड येथील कलाकार सृष्टीधर महतो व लखन गुरिया, लालमती सिंह, सीमा सिंह, तसेच इतर कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा झारखंड स्थापना दिनानिमित्त संदेश दाखविण्यात आला. झारखंड राज्याची माहिती दाखविणारा लघुपट देखील यावेळी दाखविण्यात आला.