वेदनेच्या शब्दकळा जाणणारा ‘महादेव’

    15-Nov-2023   
Total Views |
Article on Mahadev Irkar

मातीकाम करणारा माणदेशातील तरूण ते ‘पीएचडी’ प्राप्त उच्चशिक्षित प्राध्यापक, अशा महादेव इरकर यांचा संघर्षमय जीवनप्रवास...
 
दुष्काळग्रस्त माणदेशच्या सरहद्दीवर असणार्‍या सुळेवाडी या खेडेगावात महादेव दिनकर इरकर यांचा जन्म झाला. अशा दुष्काळग्रस्त भागात जन्माची तारीख माहिती नसणार्‍या, या अवलियाने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. मात्र, संघर्षाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना चांगलंच ठाऊक होते. इरकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून घेतले. मुळात महादेव इरकर ज्या वस्तीत वाढले, त्या वस्तीतील बहुसंख्य लोक मेंढपाळ, हमाली, मातीकाम अशी भटकंतीची कामे करायचे. त्यामुळे इरकर यांना लहानपणापासून कष्टाची सवय होती. कारण, पाचवीला असतानाच इरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. अशावेळी नातेवाईकांचा आधार नसल्याने आणि दारिद्य्र पाचवीला पूजलेलं असल्यानं इरकर यांना लहानपणी आईनेच जनावरं राखण्यासाठी चाकरीवर ठेवले. पण, त्यावेळी शाळेतील काही शिक्षकांमुळे कसंबसं पाचवीपर्यंत इरकर यांनी शिक्षण पूर्ण केले. मुळात वडिलांच्या दारूच्या व्यसनाने कुटुंबाला आणखीनच दारिद्य्राच्या खाईत लोटलं. त्यावेळी इरकर यांच्या कुटुंबाला आठवड्यातील किमान दोन दिवस उपाशी झोपावे लागत असे.
 
दरम्यानच्या काळात आईदेखील वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी वसईसारख्या भागात मातीकाम करण्यासाठी जात. त्यामुळे मातीच्या भिंती असणार्‍या बिनदरवाज्याच्या घरात इरकर याचं एकटेपण अधिकच वाढलं. पण, त्यावेळी शाळेचा अभ्यास आणि शिकण्याची जिद्द इरकर यांनी कधीच सोडली नाही. त्यावेळी त्यांची परिस्थिती लक्षात घेता, शाळेतील अनेक शिक्षकांनीदेखील सढळ हस्ते मदत केली. पण, या सगळ्यात महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केलेल्या इरकर यांच्या मनावर एका घटनेचा प्रहार बसला. एकदा शेतात काम करताना लाकडाची ढलपी पायात घुसून आरपार झाली, त्यामुळे अपंगत्वासह आयुष्य काढावं लागणारं, हे शल्य त्यांच्या मनात घर करून राहिलं.

पण, तरीदेखील परिस्थितीची बोचरी वेदना त्या पायात घुसलेल्या ढलपीच्या वेदनेपेक्षा कैक पटीने जास्त होती. त्यामुळेच त्यांनी कापूस वेचणे, ज्वारी काढणे अशी कामे केली. त्यादरम्यान ते बारावीची परीक्षा ७० टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. पण, पुन्हा दुःखांचा डोंगर आ वासून त्यांच्या समोर उभा राहिला. कारण, ’डीएड’च्या प्रवेशाला एक गुण कमी पडल्याने निवड समितीने त्यांचा प्रवेश नाकारला आणि त्यावेळी जवळ पैसे नसल्याने खासगी महाविद्यालयात प्रवेश घेणं, त्यांना शक्य नव्हतं. त्यानंतर म्हसवडच्या एका महाविद्यालयात त्यांनी वरिष्ठ शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण, तिथे त्यांना पैशांअभावी दोन महिन्यांतच शिक्षणाला दुसर्‍यांदा मुकावं लागलं. त्यानंतर शिक्षणाची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नसल्याने, त्यांनी मातीकामासाठी वसईची वाट धरली. पण, इथे आल्यावरही संकटांनी त्यांची साथ सोडली नाही. कारण, इथे आल्यावर आईच्या डोळ्यातील मोतीबिंदू वाढला. त्यामुळे कमावलेले पैसे त्यांना आईच्या औषध उपचारासाठी द्यावे लागत. पण, त्यातच वेळप्रसंगी पोटाला चिमटा मारून आणि काही लोकांनी केलेल्या मदतीतून त्यांनी पैसे जमवले आणि हफ्त्यावर पैसे देण्याच्या अटीवर वसईच्या जी. जी. महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मग वर्तक महाविद्यालय आणि जी. जी. महाविद्यालयातून कला शाखेत प्रथम श्रेणीत पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

त्यानंतर ’एमए’ आणि ‘बीएड’चे शिक्षण ही त्यांनी पुढील काळात प्रा. शत्रुघ्न फड आणि वर्तक महाविद्यालयाच्या काही शिक्षकांच्या आर्थिक मदतीमुळे पूर्ण केले. तेव्हा इरकर ज्या खोलीत राहत होते. त्या खोलीच्या भाड्यातील इरकरांच्या हिस्स्याचे भाडेदेखील त्यांच्या काही मित्रांनी भरले. त्यानंतर प्रा. कोडोलीकर यांच्या शिफारशीने विरार येथील उत्कर्ष विद्यालयात इरकर शिक्षक म्हणून रुजू झाले. मग विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेत, ते विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन करू लागले. जवळ-जवळ ३०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर शिक्षणाच्या आवडीमुळे त्यांनी मुंबई विद्यापीठातून ’एमएड’देखील केले. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या धनगर जमातीची लोककला जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने डॉ. अलका मटकर यांच्या मार्गदर्शानाखाली ’माणदेशी मेंढपाळ धनगर जमातीच्या लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात ’पीएचडी’ केली.

दरम्यान ’नेट’ व ’सेट’सारख्या परीक्षादेखील त्यांनी उत्तीर्ण केल्या. तसेच सामाजिक जाणिवेतून महादेव इरकर हे प्रत्येकवेळी एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतात. त्यातून आतापर्यंत चार विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे. त्यातील मुलांनी ‘एमबीए’, ‘मॅकेनिकल इंजीनिअरिंग’ असे शिक्षण घेतले आहे. दरम्यान, इरकर यांना ‘ज्ञानभूषण पुरस्कार’, ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार’ यांसारखे पुरस्कारांनीदेखील गौरवण्यात आले आहे. तसेच त्यांचा ’वेदनेच्या शब्दकळा’ हा कवितासंग्रह आणि ’टिकावं फावडं’ हे आत्मचरित्र प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे, तरी महादेव इरकर यांना पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा!
९३५९६९२४५४
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.