राम मंदिर सोहळा आणि ‘मुस्लीम राष्ट्रीय मंचा’ची राष्ट्रीय एकात्मता

    13-Nov-2023   
Total Views |
Article on Upcoming Ram temple ceremony

दि. २२ जानेवारी या दिवशी सर्व धर्मीयांनी, सर्व समाजाने आणि राष्ट्रांनी आपापल्या स्थानी शांतता आणि बंधुभाव यांचे प्रतीक असलेले दीप प्रज्वलित करावेत, असे आवाहनही इंद्रेश कुमार यांनी केले. ‘मुस्लीम राष्ट्रीय विचार मंच’ गेल्या अनेक वर्षांपासून देशातील दर्गे, मशिदी, मदरसा आदी स्थानी धनत्रयोदशीच्या दिवशी दिव्यांची रोषणाई करीत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ देशामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या शक्ती करीत आहेत, त्यांचा प्रभाव कमी करण्याचा आणि शांततेचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
अयोध्येमध्ये दि. २२ जानेवारी २०२४ या दिवशी राम मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्या दिवशी या मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. दिवाळीच्या निमित्ताने लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात अयोध्यानगरी उजळून निघाली असून, आता राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा संपूर्ण जगातील हिंदू बांधव करीत आहेत. मुस्लीम बांधवांना अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि ’मुस्लीम राष्ट्रीय मंचा’चे संस्थापक इंद्रेश कुमार यांनी केले आहे. दि. २२ जानेवारी या दिवशी भगवान राम यांची या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार असून, भगवान राम हे संपूर्ण जगासाठी मानवता, शांतता आणि सलोख्याचे प्रतीक आहे, याकडे इंद्रेश कुमार यांनी लक्ष वेधले आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना, दि. २२ जानेवारी हा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करण्याची का आवश्यकता आहे, हे उपस्थित मुस्लीम बांधवांना सांगितले. या समारंभात सर्व धर्माच्या लोकांनी सहभागी व्हावे आणि जगाला मानवता, शांतता आणि सलोख्याचा संदेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, “अरब देशांमधील लोकही रामास ‘इमाम-ए-हिंद’ म्हणून मानतात. सकाळी ज्यांना रामाचे दर्शन होते, त्यांना स्वर्गसुख मिळो, असा आशीर्वाद मिळतो.” रामाच्या शिकवणुकीचे जे वैश्विक आवाहन आहे, त्यावर इंद्रेश कुमार यांनी आपल्या भाषणात भर दिला. जे रामाच्या संदेशाचे अनुकरण करतील, त्यांचे जीवन आदर्श आणि अधिक आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारे असेल, असेही इंद्रेश कुमार यांनी सांगितले. दि. २२ जानेवारी या दिवशी सर्व धर्मीयांनी, सर्व समाजाने आणि राष्ट्रांनी आपापल्या स्थानी शांतता आणि बंधुभाव यांचे प्रतीक असलेले दीप प्रज्वलित करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
 
इंद्रेश कुमार यांनी आपल्या भाषणात, शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद भारतासंदर्भात बोलताना, “भारत ही अशी भूमी आहे, ज्या भूमीवरून शांततेच्या शीतल हवेची अनुभूती मिळते,” या त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. ’मुस्लीम राष्ट्रीय विचार मंच’ गेल्या अनेक वर्षांपासून देशातील दर्गे, मशिदी, मदरसा आदी स्थानी धनत्रयोदशीच्या दिवशी दिव्यांची रोषणाई करीत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून ’मुस्लीम राष्ट्रीय मंच’ देशामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या शक्ती करीत आहेत, त्यांचा प्रभाव कमी करण्याचा आणि शांततेचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न करीत आहे.

तामिळनाडूमध्ये फटाके रोखण्यासाठी विशेष दल!

प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्यावर काही निर्बंध घातले आहेत. पण, तामिळनाडूमधील द्रमुक सरकार त्या निर्णयाच्या पुढे जाऊन कृती करीत असून, हिंदू समाजाच्या सणांना आपला किती तीव्र विरोध आहे, ते दाखवून देत आहे. द्रमुक सरकारने दि. १२ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ ते ७ आणि संध्याकाळी ७ ते ८ एवढाच वेळ फटाके फोडता येतील, असा आदेश दिला. द्रमुक सरकारची ही निवडक धर्मनिरपेक्षता आहे आणि त्यातून हिंदू परंपरा, सण यांच्या बद्दलचा आकस दिसून येतो, असे टीकाकारांनी म्हटले आहे. दिवाळीनिमित्त हिंदू समाजास शुभेच्छा देण्याचे साधे सौजन्यही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दाखविले नाही आणि दुसरीकडे प्रदूषणाचे निमित्त करून हिंदू समाजावर कायद्याचा बडगा उगारला जात आहे, असे हिंदूंचे म्हणणे आहे. द्रमुक सरकार अन्य धर्मीय लोकांच्या धार्मिक प्रथांमुळे होणार्‍या प्रदूषणाकडे लक्ष देत नाही, असा आरोपही द्रमुक सरकारवर केला जात आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी चेन्नई शहरातील १०२ पोलीस स्थानकांच्या हद्दीत विशेष दलाची निर्मिती करण्यात आली आहे. वेळमर्यादा न पाळणार्‍या आणि १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणारे फटके फोडणार्‍यांना अटक करण्याचे अधिकार या विशेष पथकास देण्यात आले आहेत. चेन्नई शहरामध्ये फटाके फोडण्यावरून नागरिक आणि पोलीस यांच्यात वादावादी होण्याच्या घटनाही घडत आहेत. विशेष दल नेमण्याच्या प्रकाराबद्दल समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष दल अतिरेक्यांना, अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांना की बेकायदा दारू विकणार्‍यांना पकडण्यासाठी निर्माण केले? नाही! ते ठरलेल्या वेळेनंतर फटाके फोडणार्‍या लोकांना पकडण्यासाठी निर्माण केले आहे, अशी टीकाही करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पलीकडे जाऊन द्रमुक सरकार जी कृती करीत आहे, त्याबद्दल हिंदू जनता तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार सुरूच!

बांगलादेशमधील खुलना जिल्ह्यामध्ये तेथील हिंदू समाजावर आपली निवासस्थाने सोडून निघून जाण्याची सक्ती केली जात आहे. बांगलादेशातील काही भागांत ज्यास ‘लॅण्ड जिहाद’ म्हणता येईल, असे प्रकार त्या देशाच्या विविध भागांमध्ये सुरू आहेत. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागातील हिंदूंना दिल्या जात असलेल्या त्रासामुळे, होत असलेल्या छळामुळे सक्तीने आपल्या घरांचा त्याग करावा लागत आहे. खुलना जिल्ह्यातील शैलकुपाया भागात राहणार्‍या अनेक हिंदूंवर घरदार सोडून अन्यत्र निघून जाण्याची सक्ती करण्यात आली. हा धार्मिक छळवाद टाळण्यासाठी तेथील हिंदू आपला जमीनजुमला विकून अन्यत्र स्थलांतरीत होत आहेत. बांगलादेशच्या ‘जुबो लीग’ या संघटनेचा संचालक असलेल्या शमीम हुसेन मोल्ला नावाच्या व्यक्तीने सत्येंद्र नाथ सहा नावाच्या एका हिंदूच्या मालमत्तेत घुसखोरी केली. ‘जुबो लीग’ ही बांगलादेश अवामी लीग पक्षाची युवा शाखा आहे. ‘जुबो लीग’च्या या नेत्याने सक्तीने आमच्या घराचा आणि काली मातेच्या मंदिराचा ताबा घेतला, अशी माहिती सत्येंद्रनाथ साह यांच्या सुनेने दिली. याप्रकरणी स्थानी खासदाराकडे तक्रार करण्यात आली. पण, आरोपींविरुद्ध काहीही कारवाई करण्यात आली नाही, असेही त्या सुनेने म्हटले आहे.

सत्येंद्रनाथ साह यांचे हे एक उदाहरण झाले. त्या भागातील प्रभावशाली मुस्लीम नेत्यांमुळे अनेक हिंदू कुटुंबांना आपली संपत्ती गमवावी लागली आहे. या जागा मुस्लिमांनी ताब्यात घेतल्या आहेत. बांगलादेशमध्ये संघटितपणे हा जो ‘लॅण्ड जिहाद’ सुरू आहे, त्यामध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्ते गुंतले आहेत. या मुस्लीम जिहादी लोकांकडून हिंदू मंदिरांची नासधूस आणि देवदेवतांची विटंबना केली जात आहे. गेल्या दि. ६ नोव्हेंबर रोजी शैलकुपा उपजिल्ह्यातील बिजुलीया या खेड्यात मूर्तीची विटंबना करण्याचा प्रकार घडला. पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. पण, पोलिसांनी काहीच केले नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातही देवीच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता. या घटनेची माहिती देताना एक हिंदू महिला म्हणाली की, ”गेल्या वर्षी मुस्लीम गुंडांनी काली मूर्तीची विटंबना केली आणि त्या मूर्तीचे शीर तोडले.”

शैलकुपा भागात हिंदू समाजावर अन्याय होत असतानाही निष्क्रिय राहिलेल्या मोहम्मद अब्दुल हाई या विद्यमान खासदारास तिकीट देऊ नये, अशी विनंती त्या भागातील पूजा समितीने अवामी लीगला केली होती. त्याचप्रमाणे मंदिरांची विटंबना, मूर्तींची विटंबना आणि घरे उद्ध्वस्त करणे अशी ज्या राजकीय नेत्यांची पार्श्वभूमी आहे, त्यांना निवडणुकीतील उमेदवार म्हणून शेख हसीना यांनी अनुमती देऊ नये, अशी विनंती स्थानिक हिंदू नेत्यांनी केली आहे. गेल्या दि. १३ ऑक्टोबर रोजी हिंदू समाजाने काढलेल्या निषेध मोर्चावर हल्ला करण्याचा प्रकार घडला. कोमिल्ला महानगरातील नझरूल अ‍ॅव्हेन्यू भागात ही घटना घडली. बांगलादेशातील हिंदू समाजास सातत्याने तेथील जिहादी तत्त्वांमुळे सदैव भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे.
 
९८६९०२०७३२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.