"मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही"; एकनाथ शिंदेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली
12-Nov-2023
Total Views | 257
मुंबई : “मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही. नरेश मस्के आणि कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की त्यांना वापस जावं लागलं. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे.” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे.
मुंब्य्रातील शाखा पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून उबाठा गट आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेच्या जागेची पाहणी केली. तिथे त्यांनी भाषण सुद्धा केले. त्यांच्याच भाषणाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, “मुंब्र्यात एवढे फटाके वाजले की काहींना वापस जावं लागलं,” दिवाळीनिमित्त ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाण्यातील मुंब्रा येथील शाखेजवळ शनिवारी उद्धव ठाकरे पोहोचताच शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे लावलेले बॅनर फाडल्याने वाद आणखीनच चिघळला होता. पण आता वातावरण शांत झाले आहे.