डाव्या विषवल्लीला ठेचलेच पाहिजे!

    11-Nov-2023   
Total Views |
IIT Bombay Hamas Conflict Discussion

मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सुधन्वा देशपांडेला पवई ‘आयआयटी’च्या एका अभ्यासक्रमात मार्गदर्शक म्हणून प्रा. शर्मिष्ठा साहने बोलवले. त्यात त्याने पॅलेस्टाईन आणि ‘हमास’च्या हिंसेचे समर्थन केले. सुधन्वाच्या कट्टर डाव्या हिंसक विचारांचे मार्गदर्शन ऐकून ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळणार होती? सुधन्वाला आमंत्रित करणार्‍या प्रा. शर्मिष्ठा साहची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी समस्त सज्जन देशप्रेमी समाजाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा मागोवा घेणारा हा लेख...

“आपण २०१५ साली झकेरिया झुबेदीला भेटलो होतो आणि धन्य झालो होतो,” असे सुधन्वा देशपांडे याने म्हटले. आता कोण हा झकेरिया झुबेदी? तर हा ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला एक दहशतवादी. ‘आयआयटी मुंबई’मध्ये प्रा. शर्मिष्ठा साह या प्राध्यापिकेने आपल्या अधिकारांचा वापर करून सुधन्वा देशपांडेला ‘एचएस ८३५’या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला बोलावले. तेव्हा त्याने मार्गदर्शनामध्ये दहशतवादी झकारिया झुबेदी व दहशतवादी घासान कनाफनीच्या अतिरेकी हल्ल्यांचे व हिंसेचे समर्थन केले. पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ अतिरेक्यांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या निर्घृण हल्ल्याबद्दल चकार शब्दही न काढता त्याने म्हंटले की, पॅलेस्टाईन जे काही करते आहे, ते त्यांचे स्वातंत्र्य युद्ध आहे? नाट्य-साहित्य या क्षेत्रामध्ये समाज आणि देशाच्या उत्कर्षावर, वैभवशाली परंपरेवर किंवा देशाच्या जनतेसंदर्भात बोलणारे कुणीच नाही का? पण, साहित्य, नाट्य वगैरेच्या आड ‘आयआयटी मुंबई’मध्ये शर्मिष्ठा साहा या प्राध्यापिकेने निमंत्रित कुणाला केले, तर सुधन्वा देशपांडेला? सुधन्वाने ‘आयआयटी मुंबई’च्या प्रबुद्ध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन काय केले, तर म्हणे हिंसेशिवाय कोणतीही क्रांती होत नाही.

जेएनयू असू दे की जदयू आणि आता ‘आयआयटी मुंबई’च्या बाबतीतही दिसून आले की, इथल्या मुलांना शिकवणारे प्राध्यापक कोण होते, कोण आहेत, यावर एक नजर टाकली, तर जाणवते की समाजविघातक मनोवृत्तीचे तक्षक इथे एनकेन प्रकारे जागा मिळवून आहेत. हे लोक मोक्याच्या पदावर आरूढ होतात आणि त्यांच्या हक्काचा सर्रास गैरवापर करत विद्यार्थ्यांना लक्ष्य करतात. विद्यार्थ्यांच्या भोळ्या मनात हिंसेचे, विद्वेषाचे विष पेरतात.यातून त्यांना काय मिळते तर? अनेक प्रकरणातून सिद्ध झाले आहे की, या लोकांना आपल्या देशाचे विरोधक आर्थिक रसद पुरवतात. इतकेच नाही, तर जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळवून दिले जाते. सुमार दर्जाचे लेखन केले असेल, तरीसुद्धा त्या पुस्तकाला जागतिक स्तरावर सर्वोत्तम पुस्तक आणि त्या लेखक लेखिकेला सर्वोत्तम लेखक म्हणून सन्मानित केले जाते. अरूंधती रॉय ही लेखिका सामान्य वाचकांना माहिती नाही. मात्र, तिचे नाव इतर बाबतीत ऐकलेले असते. जसे देश-समाजविघातक कृत्य करणार्‍या लोकांना सहानुभूती दर्शवणे, त्यांची प्रतिमा लोकांपुढे चांगल्या पद्धतीने मांडणे वगैरे वगैरे बाबतीत अरूंधती रॉयचे नाव अनेकांनी वाचले-ऐकलेले आहे. अरूंधती रॉय यांचे ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ हे पुस्तक किती वाचकांना आवडते,असा प्रश्न विचारला तर? दुसरीकडे हिंदू आणि त्यांचा श्रद्धा, देव, धर्म हे शब्द जरी ऐकले तरी त्याविरोधात बोललेच पाहिजे,अशी मानसिकता असणारेही लोक आहेत, जे कलाक्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात जागा अडवून आहेत. या परिक्षेपात भालचंद्र नेमाडे यांचे ‘हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक किती जणांना आवडले?

आपल्या देशात जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन, याविषयी अनेक चर्चा आणि मंथन होताना दिसते. पण, कला केवळ हिंसेसाठी आणि द्वेषपेरणीसाठी, अशी विकृत मानसिकता जोपासणारेलोकही या भूतलावावर आहेत. या असल्या लोकांना पाहून ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे ते दृश्य आठवते. ती दहशतवादी समर्थक प्राध्यापिका भोळ्या विद्यार्थ्याची मानसिकता विकृत करते. त्याला दहशतवादी समर्थक बनवते. ती त्या विद्यार्थ्याला म्हणते, ‘सरकार उनकी हैं, प्रशासन मे हमारे लोग बैठे हैं।’ हे विधान केवळ त्या चित्रपटामधल्या त्या एका चित्रपटापुरते मर्यादित नाही, तर प्रत्यक्ष जीवनात हे सत्य पदोपदी जाणवत राहते.
 
असो. ‘आयआयटी मुंबई’मध्ये सुधन्वा देशपांडे याने जे दहशतवादाचे, हिंसेचे समर्थन केले, ती त्याच्या कट्टर डाव्या विचारसरणीला साजेसीच होती. मागे एकदा त्याने म्हंटले होते की, तुम्हाला समोरच्या व्यक्तीने दुर्लक्षित करावे, असे वाटत असेल तर त्याला सल्ला द्या आणि तुम्हाला वाटत असेल की, समोरच्या मनबुद्धीला तुम्हाला प्रभावित करायचे आहे, तर तुम्ही त्यांना गोष्टी सांगा. त्यानुसार सुधन्वा ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांना पॅलेस्टाईनच्या ‘हमास’हिंसेसंदर्भात त्यांच्या विचाराच्या गोष्टी सांगून गेला.
आज तरूणाई जागृत आहे. आपला देश, देव, धर्म, समाज, संस्कृती याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे प्रा. शर्मिष्ठा साह आणि सुधन्वा देशपांडेसारख्या लोकांचे कृत्य विचार उघडे पडले. पण, यापूर्वीही सुधन्वाच नव्हे, तर अशा विचारांचे अनेक लोक अशा अभ्यासक्रमांना मार्गदर्शक म्हणून जातच असतील.

मागे मी छत्तीसगढला गेले होते. तेव्हाही नक्षल्यांनी कितीही हिंसा केली, तरी ती त्यांनी जनतेसाठी केली, असे म्हणणार्‍या काही सामाजिक कार्यकर्त्यांची नावे कळली होती. सरकारने कोणतीही विकासकामे केली, तर त्या विरोधात स्थानिक वनवासी जनतेला भडकावण्याचे त्यांचे दैनंदिन काम. मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे शहरांतून हे लोक छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त भागात राहायला आले होते. हे लोक छत्तीसगढमध्ये येण्यापूर्वी देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक होते आणि आताही ते ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून तिथे जातात. प्रशासनामार्फत अनेक कार्यक्रम केले जातात. त्यामध्ये अतिथी म्हणून त्यांना मानाचे पान दिले जाते. बिचार्‍या मंत्र्यांना आणि प्रशासकीय अधिकार्‍यालाही माहितीही नसते की हे कोण आहेत? मात्र, त्यांच्यातला कुणीतरी एक अधिकारी यांना धार्जिणा असतो. नव्हे, या लोकांनी त्याला बरोबर जाळ्यात ओढलेले असते. त्यामुळे या असल्या लोकांची नावे सरकारी सन्मान, सरकारी समितीमध्ये अक्षरशः घुसवली जातात. हे थांबलेच पाहिजे. आज आणि आताच याची सुरुवात झाली पाहिजे. ‘आयआयटी मुंबई’ आणि सुधन्वा देशपांडेमुळे पुन्हा एकदा मुद्दा एरणीवर आला आहे. सुधन्वाला‘आयआयटी मुंबई’मध्ये कशासाठी का बोलावले, याचे उत्तर प्रा. साह हिने द्यायलाच हवे. म्हातारी मेल्याचे दुःखनाही, पण काळ सोकावतो आहे!.

९५९४९६९६३८
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.