माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेविरुद्ध कतार न्यायलयात अपील दाखल - परराष्ट्र मंत्रालय
10-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय नौदलातील माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेवर पुनर्विचार करण्यासाठी भारताकडून कतारमधील न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी सांगितले की, सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करून अपील दाखल करण्यात आले आहे. तसेच आम्ही कतारमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व माजी नौदलाचे अधिकारी कतारची राजधानी दोहा येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. मागील वर्षी त्यांच्यावर कथित हेरगिरीचा आरोप करण्यात आला आहे. तेव्हापासून हे आठही अधिकारी तुरुंगात आहेत.