कोरोना काळात खरे तर अनेकांची घरं विस्कटली. आर्थिक जडणघडणदेखील विस्कळीत झाली. मात्र, त्या काळात संकटाचा सामना करताना संकटकाळात जे एकमेकांच्या मदतीला, सहकार्यासाठी धावून आले आणि त्यामुळे ज्या आपलेपणाच्या भावना निर्माण झाल्या. ही बाब खरे तर पुन्हा एकदा भारतीयांमध्ये ’ज्योत से ज्योत जगाते चलो’ची जाणीव दृढ करणारी होती. सुदैवाने आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने या महाकाय देशातील हे संकट हाताळताना जी समयसूचकता आणि तत्परता दाखविली, त्यामुळे लोकांच्या या भावनेला बळकटी मिळत गेली. त्याच वेळी मात्र आपल्या राज्यातील विश्वासघाताने सत्ता बळकावलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मात्र भ्रष्टाचार आणि निर्दयीपणाचा कळस गाठला आणि वसुलीत दंग राहून मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्यात धन्यता मानली. पण, आता या मंडळींची त्यांच्याच करामतींमुळे सत्ता गेल्याने झोप उडाली आहे. म्हणूनच या उरल्यासुरल्या विरोधकांनी फडणवीस-शिंदे सरकारला त्रास देण्यासाठी त्यांनी नवनवीन कुटिल कारस्थाने सुरू केली आहेत. यामुळे आता राज्यात फडणवीस-शिंदे-अजित पवार यांच्या बाजूने जनतेचा कौल दिसू लागल्याने, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी रचलेली षड्यंत्रे, कारनामेदेखील उघडे पडत आहेत. ललित पाटील, मराठा आरक्षण किंवा अन्य प्रकरणांत ही जोडी आपल्या नेत्यांना, रिकामटेकड्या कार्यकर्त्यांना भडकवत ठेवून समाजाची घडी विस्कटली जाईल, याच प्रयत्नांत दिसते. मात्र, त्यांचा हा डाव या राज्यातील जनता आता पुरेपूर ओळखून आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालातून ही चपराक शरद पवार, उद्धव ठाकरे यांना जनतेने लगावली आहेच. मात्र, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पुण्यात माध्यमांशी बोलताना समाजात तेढ निर्माण होणार नाही, ही काळजी राज्य सरकार तर घेईलच. मात्र, प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगून, या दोघांच्या पाळलेल्या पोपटांची तोंडे एकप्रकारे बंद केली आहेत. त्यांच्या बोलण्यातून ’ज्योत से ज्योत जगाते चलो’चे संकेत मिळाले आहेत आणि ते सद्यःपरिस्थितीत अगदी चपखल लागू पडतात.
चपळ तुझे चरण जरा...
सध्या दीपोत्सवामुळे आपले सांस्कृतिक क्षेत्र अधिक उजळून निघालेले दिसते. परवाच पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींना उजाळा म्हणून राज्यभरात कार्यक्रम सुरू झाले. पुलं हे व्यक्तिमत्त्वच असे होते की, ज्याने आपल्या साहित्यकृतीतून अतिसामान्य व्यक्ती ते अगदी अतिश्रीमंत व्यक्तीला एक सारख्या आनंदात न्हाऊ घालण्याची किमया केली. हे आपल्या सर्वांचे भाग्यच. त्यामुळे आगामी पिढीनेदेखील पुलं समजून घेताना रोजच्या धकाधकीत निखळ आनंदाचा अनुभवदेखील घेतला पाहिजे. उद्या लक्ष्मीपूजन असल्याने प्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर यांची पु. ल. देशपांडे यांनी गायलेली ’चपळ तुझे चरण जरा या घरी स्थिरावे’ ही रचना नेहमी लक्षात ठेवावी इतकी छान आहे. ही लक्ष्मी अर्थात धन, द्रव्य या अर्थाने प्रत्येक घरात स्थिर राहतेच असे नाही, ती चपळ, चंचल आहे. हा अनुभव प्रत्येकाचा असतो. त्या अनुषंगाने आणि काळानुरूप स्थिती बदलत असल्याने या लक्ष्मीपूजनापासून प्रत्येकाने योग्य नियोजनाचे संकल्प केले पाहिजेत. आपल्या देशातील अर्थनियोजनाच्या संकल्पनादेखील बदलत आहेत. एकेकाळी भ्रष्टाचारात हात धुवून घेणार्यांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली होती. गेल्या नऊ वर्षांत आता ही स्थिती आश्वासक अशी बदलली आहे.लोकांना आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नातून भविष्यात अर्थव्यवस्थेला प्रामाणिक दिशा मिळणार आहे. ’लोकल टू ग्लोबल’ प्रवास भारताचे उज्ज्वल भवितव्य निश्चित करणार आहे, त्यामुळे जे काय करायचे, ते सरकार करेल हा समज कायमचा पुसावा लागणार आहे. आयत्या बिळावरच्या नागोबांना कुणीही थारा देऊ नये, आपल्या सभोवती खेळत राहणार्या लक्ष्मीला योग्य स्थान देण्याची जबाबदारी सर्वांची आहे, तिला जनतेचा विश्वासघात करणार्यांच्या हवाली केले की, काय हाल होतात हे गेल्या तीन साडेतीन वर्षांत राज्यातील जनतेने बघितले आहे. म्हणूनच या चपळ लक्ष्मीचे चरण घरी स्थिरावताना आपलेही योगदान देशासाठी कसे देता येईल, हा सकारात्मक विचार करून घरोघरी लक्ष्मीपूजन व्हावे, यामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल, हे निश्चित!