‘बीएनएचएस’ महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देणार निसर्ग शिक्षण
01-Nov-2023
Total Views |
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीत शिक्षण घेणार्या सात हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) ही भारतीय उपखंडातील १४० वर्ष जुनी सर्वांत मोठी पर्यावरण संशोधन संस्था आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था यांच्यासह विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने कार्यरत आहे. पर्यावरण संवर्धन आणि जतन यांच्यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. ठाणे खाडी क्षेत्र, फ्लेमिंगो संवर्धन यावरही संस्था काम करीत आहे. ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि ‘बीएनएचएस’ यांच्यात निसर्ग शिक्षण उपक्रमासाठी करार झाला असल्याने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
वंचित समाजातील, निम्न आर्थिक स्तरातून येणार्या या विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी जाणून घेण्याची, जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व समजून घेण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संवर्धन शिक्षण केंद्र, ठाणे खाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौर्यासाठी नेण्यात येईल. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ही संधी मोलाची ठरेल, असा विश्वास या उपक्रमाविषयी महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.