हे विश्वची माझे घर...

    01-Nov-2023   
Total Views |
anti-israel-mob-attack-in-dagestan-russia-amid-hamas

नुकताच रशियाच्या दागिस्तानमध्ये शेकडो लोकांनी विमानतळावर हल्ला केला. त्यांना वाटले की, इस्रायलच्या लोकांना घेऊन दागिस्तानमध्ये विमान येत आहे. इस्रायलमधून कोण-कोण आले; तसेच प्रवाशांमध्ये यहुदी कोण आहेत, असा प्रश्न विचारत दागिस्तान विमानतळात शेकडो लोकांनी हिंसा सुरू केली. त्यात अनेक जण जखमी झाले. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था भेदत, या लोकांनी विमानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. रशियाच्या कायदा-व्यवस्थेचा तकलादूपणा या घटनेतून समोर आला.

साम्यवादी असलेल्या रशियामध्ये चेचेन्या आणि दागिस्तान हे कट्टरपंथी मुस्लिमांचे अड्डेच झाले आहेत. सुन्नी मुस्लीमबहुल असलेल्या दागिस्तानने तसे यापूर्वीही रशियन सरकारला नाकीनऊ आणले आहेच. हिंसाचार, अपहरण आणि सर्व प्रकारच्या गुन्ह्यांत दागिस्तान आघाडीवर. त्यामुळे रशियाचे पुतीन प्रशासनही काळजीत असते. आता तर दागिस्तानच्या जनतेने देशाच्या विमानतळावर हल्ला केला. देशाचे विमानतळ आहे किंवा देशाचे विमान आहे किंवा या विमानतळावर हल्ला करून परदेशी नागरिकांना त्रास दिला, तर जगात आपल्या देशाची प्रतिमा मलिन होईल, असे या हल्लेखोरांना वाटले नाही. देश, देशाची संपत्ती आणि प्रतिमा याहीपेक्षा त्यांना जिथे ते कधीही गेले नव्हते आणि जाणार नाहीत, अशा दूर असलेल्या पॅलेस्टाईनचे समर्थन करणे, हेच त्यांना कर्तव्य वाटले.

इस्रायल-‘हमास’ युद्धाचे पडसाद जगभर उमटले. सध्या अमेरिकेमध्येही ‘नॅशनल मुस्लीम डेमोक्रेटिक काऊंसिल’ने अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना इशारा दिला आहे की, बायडन यांनी पॅलेस्टाईनवर होणारा हल्ला थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणावा. पॅलेस्टाईनवरचे हल्ले इस्रायलने थांबवले नाहीत, तर याचे परिणाम निवडणुकीमध्ये बायडन यांना दिसतील. ‘नॅशनल मुस्लीम डेमोक्रेटिक काऊंसिल’च्या म्हणण्याचा अर्थ काय असेल? बायडन यांच्यावर काय परिणाम होणार? याबद्दलची माहिती अशी आहे की, २०२०च्या निवडणुकीमध्ये १.१ दशलक्ष मुसलमानांनी मतदान केले होते. यामध्ये ६४ टक्के मुसलमानांनी बायडन यांना मतदान केले होते, तर ३५ टक्के मुस्लिमांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिले होते. तेव्हा बायडन राष्ट्रपती झाले. याचाच अर्थ ‘नॅशनल मुस्लीम डेमोक्रेटिक काऊंसिल’ने इशाराच दिला आहे की, इस्रायलने हल्ले थांबवले नाहीत, तर अमेरिकेतील मुस्लीम एकत्र येतील आणि बायडन यांना मतदान करणार नाहीत. त्यामुळे बायडन हरतील, असे या संघटनेचे मत!
 
यावर जागतिक अभ्यासकांचे म्हणणे आहे की, जिथे आसरा मिळेल, तिथे प्रयत्नपूर्वक लोकसंख्या वाढवत आवश्यक ते निवासी पुरावे कसेही मिळवत, त्या परिसरातचे नागरिकत्व मिळवायचे. काही राष्ट्रीय कर्तव्य केले नाही तरी मतदानाचा हक्क कसोशीने पार पाडायचा, हे व्रत जगभरातले शरणार्थी आणि विस्थापित मुस्लीम एककलमी कार्यक्रम म्हणून राबवत असतात. त्याचाच परिणाम म्हणून अनेक पाश्चात्य देश हे हळूहळू मुस्लीमबहुल होत चालले आहेत. रशियाच्या सीमेवरीलही अनेक छोटछोटी गणराज्येही अशाच प्रकारे मुस्लीम झाली आहेत. आता अमेरिकेमध्ये मतदान हवे असेल, तर आमची मागणी मान्य करा, असे सांगणाराही संघटित मुस्लीम समुदाय तयार झाला आहे. भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. सगळ्या किनारपट्ट्या आणि रेल्वेरुळालगतचा भाग तसेच रेल्वे स्थानकाचा भाग, कोणत्याही वस्तीचे प्रवेशद्वार, गल्लीचा नाका इथे प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक अशा वसाहती निर्माण होत आहेत.
 
दुसरीकडे नुकतेच फ्रान्सच्या एका रेल्वे स्थानकावर पोलिसांनी एका व्यक्तीवर गोळी झाडली. याचे कारण ती व्यक्ती इतर सहप्रवाशांना धमकावत होती. तिच्याकडे हत्यार आहेत की बॉम्ब आहे, याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. कारण, त्या व्यक्तीने बुरखा परिधान केला होता. बुरखाधारी व्यक्ती स्त्रीच होती. तिच्या सहप्रवाशांचे म्हणणे, ही स्त्री सहप्रवाशांना धमकावत होती. जगभरात दहशतवादाने जे उग्र रूप आहे आणि ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी जे कृत्य केले, त्यामुळे त्यांना भीती वाटत होती. जगभरातच ही भीती भरून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर शांतीचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी जातपात, धर्म, वंश, वर्ण यांवर आधारित असलेल्या बंधुभावापेक्षा भारतीय संस्कृतीची ‘विश्वची माझे घर’ ही संकल्पना सवंर्धित व्हायला हवी, त्याशिवाय पर्याय नाही!
 
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.