आठ वर्षे मदरशात डांबून ठेवले! धर्मांतर करुन 'विवेक'ला बनवले ‘मोहम्मद उमर’

    01-Nov-2023
Total Views |

Chandigarh

चंदीगड :
आठ वर्षांपुर्वी हरवलेला चंदीगडमधील विवेक मुझफ्फरनगरमध्ये सापडला आहे. विवेकचे धर्मांतर करुन त्याला मदरशात डांबून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याचे नाव बदलून ‘मोहम्मद उमर’ असे ठेवण्यात आले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय विवेक हा चंडीगडमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. एक दिवस तो शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला, पण परत घरी आलाच नाही. याप्रकरणी विवेकचे वडील वीरेंद्र यांनी १७ मार्च २०१६ रोजी मौलीजागरा पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांना विवेकचा शोध घेण्यात अपयश आले.
 
त्यानंतर आता ४ ऑक्टोबर २०२३ रोजी मतलूब नावाच्या एका व्यक्तीने आधार कार्ड केंद्रावर जात विवेक हा आपला मुलगा असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या आधारकार्डवरील नाव आणि पत्ता बदलण्यास सांगितले. परंतू, तेथील व्यक्तीला आधार कार्डवर विवेक, वडिलांचे नाव वीरेंद्र कुमार आणि पत्ता चंदीगड असा दिसला. यावरुन त्याला संशय आला. त्यामुळे त्याने लुहारी खुर्द गावचे प्रमुख जॅकी सैनी यांना याबद्दल माहिती दिली.
 
जॅकी सैनी यांनी ही बाब पोलिसांना कळवताच पोलिसांनी विवेकला ताब्यात घेत त्याच्या कुटुंबियाला बोलवले. त्यानंतर विवेकचे धर्मांतर करुन त्याला मदरशात डांबून ठेवले असल्याची माहिती पुढे आली. सहारनपूर जिल्ह्यातील रामपूर मणिहरन येथील जामिया उस्मानिया रहमानिया नावाच्या मदरशात तेथील मौलवींच्या उपस्थितीत झाल्याचे उघड झाले. दरम्यान, विवेकला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.