नवी दिल्ली : फिफा २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, २०३४ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम मुदतीच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जागतिक बोली लावणार नाही याबाबत स्पष्टता दिल्यानंतर २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाकडे सोपविण्यात आले.
दरम्यान, फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन करणारा सौदी अरेबिया दुसरा आखाती देश ठरणार आहे. या आधी २०२२ मध्ये कतार या आखाती देशामध्ये सर्वप्रथम फिफा विश्वचषक २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. फिफाने दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत विश्वचषक स्पर्धेसाठी आशिया आणि ओशनियामधून बोली मागवल्या होत्या. तसेच, फुटबॉल ऑस्ट्रेलिया (एफए) चे बॉस जेम्स जॉन्सन म्हणाले होते की देश विश्वचषक २०३४ भरविण्यास उत्सुक आहोत. परंतु, त्यानंतर २०२६ महिला आशियाई चषक आणि २०२९ क्लब विश्वचषक स्पर्धेच्या बोलींवर लक्ष केंद्रित करेल, असे स्पष्ट करण्यात आले.