भगवंतावाचून कुणी सर्वज्ञ नाही

    01-Nov-2023   
Total Views |
Article on Atindriya knowledge

गुरूने अतींद्रिय ज्ञान साध्य करून घेतलेले असते, तोच शिष्याला अतींद्रिय ज्ञानाची अनुभूती देऊ शकतो. नुसत्या पुस्तकी पांडित्यात नम्रता, अतींद्रिय अनुभूती त्यांचा अभाव असतो. शब्दज्ञान, अहंकार उत्पन्न करणारे असल्याने परमार्थात शब्दज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला काही किंमत नसते.

मनाच्या श्लोकांच्या क्र. १०८ पासून पुढील पाच श्लोकांची शेवटची ओळ, ‘तुटे वाद, संवाद तो हितकारी।’ अशी आहे. वादविवाद करणे सोडून देऊन संवाद साधला, तर तो सर्वांच्या कल्याणाचा आहे, असा विचार समर्थ मांडतात, याची चर्चा आपण श्लोक क्र. ११२ पर्यंतच्या विवरणात केली आहे. तसे पाहिले, तर अहंकाराच्या, आपल्या गर्विष्टपणाच्या नादात, धुंदीत माणसाला आपले हित कशात आहे, या गोष्टीचा विसर पडतो. म्हणून अहंकाराने, गर्वाचे पोषण व्हावे, यासाठी केलेल्या वादापेक्षा समंजसपणे संवाद साधण्यात सर्वांचे हित आहे, हे कितीही खरे असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, वर्षानुवर्षे हा विचार सांगून, ऐकून वादविवादाची हौस असलेल्या माणसांच्या जीवनात काहीही फरक पडलेला दिसत नाही. वाद आहे तसेच चालू आहेत, असे निरीक्षण समर्थांनी मागील श्लोक क्र. ११२ मध्ये नोंदवले आहे.

मराठी साहित्याचा इतिहास बघताना लक्षात येते की, ज्ञानेश्वरांची संतप्रभावळ सोडली, तर ज्ञानेश्वरांच्या काळानंतर तत्वज्ञानाच्या अनुभूतीतील निर्माणक्षमता लोप पावली. संत-वाङ्मयातील स्वानुभवाची तत्त्वे सांगण्याची परंपरा टिकून राहिली नाही. त्याऐवजी ज्ञान केवळ शब्दज्ञानावर सांगणारी पंडिती परंपरा सुरू झाली. स्वानुभवाचा लेश नसलेली, निरनिराळ्या शास्त्रग्रंथांतील तत्त्वज्ञानात्मक वचनांचे उतारे पाठ करून तात्विक वादात त्यांचा उपयोग करून, जय मिळवणारी शास्त्री पंडितांची परंपरा सुरू झाली.

आत्मप्रचितीपेक्षा पुस्तकीज्ञान, केवळ शास्त्रवचने सांगणारा पंडितांचा वर्ग तयार होऊ लागला- त्यांना पुस्तकी ज्ञानाचा अहंकार झाल्याने दोन शास्त्रीपंडित समोर आले की, त्यांच्यात वादाने सुरुवात होऊन ज्ञानीपणात जिंकण्याची स्पर्धा सुरू होत असे. पुस्तकी ज्ञानाच्या अहंकाराने आपले हित कशात आहे, हे न ओळखून आपले ज्ञानवर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे पंडित आपापसात शुष्क वाद करीत राहिले. या पढतमूर्खांची पुढील आयुष्यात आणि मरणोत्तर काय अवस्था होते, हे आता समर्थांनी पुढील श्लोकात स्पष्टपणे मांडले आहे समर्थ म्हणतात-

जनीं हीत, पंडित सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले।
तयांहूनि वित्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥११३॥
समर्थ वारंवार लोकांना शिष्यांना समजावून सांगत आहेत की, बाबांनो, आपले हित कशात आहे, ते ओळखायला शिका आणि त्याप्रमाणे आपले आचरण सुधारा. परमार्थ क्षेत्रात नुसती तत्वे समजून चालत नाही, तर त्याची अनुभूती महत्त्वाची असते, तो अनुभव अतींद्रिय असल्याने भौतिक ज्ञान किंवा ग्रंथवाचनाने ते साधता येत नाही.

तत्त्वज्ञानाच्या, शास्त्रज्ञानाच्या नुसत्या पुस्तकी वाचनाने त्यातील अर्थाचे आकलन झाल्यावर कदाचित सत्क्रिया, सदाचरण, नीतिमत्तेचे महत्त्व इत्यादी गुणांची जाणीव होईल. तथापि, चारित्र्य सुधारून सद्गुणांची अनुभूती येणे, हे सर्वस्वी मनाच्या निश्चयावर अवलंबून आहे. तो अनुभव अतींद्रिय असल्याने नुसत्या पुस्तकी वाचनाने घेता येणार नाही. पुस्तकीज्ञानाने माणसाचा ’स्व’ सुखावतो व तो अहंकाराकडे वळतो. पुस्तकी वाचनाने वरवरचे ज्ञान होऊन माणसाला गर्व होऊ लागतो. इतरांपेक्षा माझे वाचन जास्त आहे, असे वाटून अल्प ज्ञानाने माणसांची कुपमंडूक वृत्ती होऊ लागते. मीच ज्ञानी असा भ्रम निर्माण झाल्याने जगातील अथांग ज्ञानप्रकारांची जाणीव त्याला होत नाही. अनुभूती, आचरण हे दूरच असतात, असा भ्रमिष्ट माणूस माझ्या इतका ज्ञानवान दुसरा कोणीही नाही, अशा समजुतीने वाद घालायला तयार होतो. त्याने पाठ केलेली शास्त्रवचने, श्लोक तो वादविवाद प्रसंगी प्रतिपक्षाच्या तोंडावर फेकून आपण वादात जिंकलो, अशी प्रौढी मिरवत असतो. आजकाल तर बाजारात शास्त्रवचनांची, श्लोकांची वर्गीकरण केलेली पुस्तके उपलब्ध आहेत, ती लोकांना ऐकवून ज्ञानीपणाचा आव आणता येईल.

लोकांपुढे मुखोद्गत केलेले श्लोक आणि शास्त्रवचने त्यांना ऐकवून लोकात मानप्रतिष्ठा प्राप्त करून घेता येते. पण, अशाने स्वानुभवाचा लेश नसल्याने पुस्तकी पांडित्याने कुणाचाही आत्मोद्धार झालेला नाही. या पंडितांनी आपले हित कशात आहे, हे न ओळखल्याने त्यांचे नुकसानच झाले आहे. शिष्य जेव्हा सर्वज्ञ गुरूकडून शास्त्रवचने शिकत असतो, आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा गुरुविषयीच्या आदराने व शिष्यत्वाच्या नम्र भावनेने तो शिकत असतो. त्यामुळे त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा गर्व, अहंकार संभवत नाही. गुरूने अतींद्रिय ज्ञान साध्य करून घेतलेले असते, तोच शिष्याला अतींद्रिय ज्ञानाची अनुभूती देऊ शकतो. नुसत्या पुस्तकी पांडित्यात नम्रता, अतींद्रिय अनुभूती त्यांचा अभाव असतो. शब्दज्ञान, अहंकार उत्पन्न करणारे असल्याने परमार्थात शब्दज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला काही किंमत नसते. समर्थ दासबोधात ब्रह्मज्ञान हा विषय हाताळतात. तेव्हा, स्वामींनी स्पष्ट म्हटले आहेस की, नुसत्या पुस्तकी ज्ञानाने ब्रह्मज्ञान होत नाही. कारण, खरे ज्ञान किंवा आत्मज्ञान हे प्रत्ययाचे ज्ञान आहे, अनुभूतीचे ज्ञान आहे. ते सिद्धगुरू शिवाय मिळणार नाही. पुस्तकी ज्ञान फसवे असते. परमात्म स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी गुरूच पाहिजे. स्वामी दासबोधात म्हणतात,
 
पुस्तक ज्ञानें निश्चये धरणें।
तरी गुरु कासया करणें।
या कारणों विवरणें।
आपुल्या प्रत्ययें ॥ (१२.६.३०)
पुस्तकी पांडित्याने ज्ञानाचा गर्व होतो. अशा पंडितांना आपल्या हिताची जाणीव नसते. मेल्यावरही त्यांचा ज्ञानीपणाचा गर्व कायम असतो. या गर्विष्टपणामुळे त्यांना स्वर्गात जागा नसते. तेव्हा त्यांना ब्रह्मराक्षसाच्या योनीत काळ कंठावा लागतो. वास्तविक पाहता, भगवंत हाच सर्वज्ञानी व सर्वज्ञ आहे, हे समजल्यावर आपल्या ज्ञानीपणाचे क्षुद्रत्व लक्षात येते. गर्व नाहीसा होतो. समर्थ मनाला सांगत आहेत की, सर्वज्ञ परमेश्वराची सदैव आठवण ठेवून तुझ्या ठिकाणी जो काही ज्ञानाचा कण असेल, तोदेखील विसरून जा. त्यानेच तुला आत्मोद्धार साधता येईल.

७७३८७७८३२२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..