भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच ’जी २०’ परिषदेदरम्यान एक विधान केले होते की, “जग आता पुनःवैश्विकीकरणाकडे तसेच नवीन संरचनेकडे सरकत आहे. पण, ते जग आता ’बहुध्रुवीय’ झालेले आहे आणि अजून ही प्रक्रिया चालूच आहे.” येणार्या काळात जग पूर्वीप्रमाणे अमेरिका आणि त्यांच्या दोस्त राष्ट्रांच्या प्रभावाखालील असणार नाही. जग आता बहुध्रुवीय होत असताना, विविध देशांच्या चलनांमधून व्यवहार वाढीला लागणार आहेत. थोडक्यात, अमेरिकन डॉलर आणि युरोपियन चलनांचा जगात पसरलेला दबदबा यापुढील काळात कमी होत जाणार आहे. ही एक न थांबविता येणारी प्रक्रिया असेल, तर या बहुध्रुवीय जगामधील नवीन प्रभावशाली प्रदेश अथवा ’ध्रुव’ कोणते असतील, त्याचा हा घेतलेला धांडोळा.
या प्रत्येक ध्रुव अथवा प्रदेशाकडे स्वतःचे असे भौगोलिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांपैकी जे असेल, ते प्रदेश स्वतःच या साधनसंपत्तीवर अधिकार ठेवूनच, त्याचा विनियोग कसा करावयाचा, हे यापुढील काळात ठरवतील. बाहेरील देश आता तुमच्या साधनसंपत्तीची लूट करू शकणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. अमेरिकन डॉलरची दादागिरी पुढील काळात कमी कमी होत जाणार आहे, हे निश्चित. या नवीन बहुध्रुवीय जगात प्रत्येक प्रदेशाकडे जगामध्ये विकण्याजोगे जे असेल आणि ते विकत घेणारे जे इतर देश असतील, ते प्रदेश द्विपक्षीय कराराद्वारे अमेरिकन डॉलर अथवा युरोपियन देशांच्या चलनाचा वापर न करता विक्री-खरेदी व्यापार परस्पर चलनांमध्ये पूर्णत्वास नेतील.
हे सर्व बहुध्रुवीय प्रदेश हे स्वतंत्र आणि सार्वभौम असतीलच. याबद्दलच्या आफ्रिकेतील पाऊलखुणा आता नायजर, सुदान या आणि इतर आफ्रिकन देशांमध्ये दिसू लागल्या आहेत. नायजरमध्ये फ्रान्सच्या राजदूताला नायजर सोडून जाण्यास सांगण्यात आलेले आपण बघतोच आहोत. सुदानमधील नैसर्गिक साधनसंपत्ती लुटण्यासाठी अमेरिका, फ्रान्स आणि रशियामध्ये तुंबळ संघर्ष चालू आहे.
एकूण जगातील सात ध्रुव, प्रदेश (की साम्राज्ये) अथवा प्रदेशांचा समूह (जसे की आफ्रिकन देश) ठळकपणे समोर येतात.
१. अमेरिका, पश्चिमी देश, ब्रिटन आणि या सर्व देशांच्या ताटाखालील मांजरे असणारे ’नाटो’मधील सदस्य देश.
२. युरेशियन साम्राज्य, ज्यामध्ये रशिया आणि रशियाला मानणारे बेलारूससारखे इतर देश. युरेशियन देशांमध्ये क्रूड तेल आणि इंधन वायूचा मुबलक साठा असल्याचे आपण बघतोच. नुकतेच ऑगस्ट महिन्यात काळ्या समुद्रातील सोची येथे झालेल्या बैठकीला संबोधित करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केलेली विधाने, ही बहुध्रुवीय जग आकाराला येत असताना, त्याच्या पार्श्वभूमीवर खूपच लक्षवेधी ठरणारी आहेत. त्यांनी अमेरिका आणि त्याच्या साथीदार देशांना त्यांच्या ’वसाहतवादी’ मानसिकतेतून बाहेर येण्याचा सल्ला दिला होता. अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांच्या दादागिरीच्या भूमिकेमुळे जगातील इतर देशांमध्ये ’ध्रुवीकरण’ होण्यास सुरुवात झाली असून, जग आता वेगाने ’बहुध्रुवीय’ व्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
३. चीन आणि त्याच्या सभोवताली असणार्या दक्षिण आशियातील चीनला मानणार्या देशांचा समूह. यामध्ये भौगोलिक रचनेमुळे तैवानही, यात तूर्तास समाविष्ट केला गेला आहे. नुकतेच चीनमध्ये ’बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ची बैठक पार पडली. चीनकडून ज्या देशांमध्ये बंदर उभारणी असो, विमानतळ उभारणी असो, रस्ते बांधणी असो असे जे-जे प्रकल्प पार पाडले गेले आहेत आणि जे देश चीनची त्या-त्या देशातील गुंतवणुकीचा आर्थिक भार घेण्यास सक्षम नाहीत, अशा अनेक देशांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. हा असा एक ध्रुव तयार होताना दिसतो आहे. येत्या काळात या समूहातील सदस्य देश कोणते, हे स्पष्ट होत जाईल असे दिसते.
४. भारत आणि त्याच्या सभोवताली भारताला मानणारे देश यांचा समूह. यामध्ये नेपाळ, बांगलादेश आणि भारताला जोडून घेऊ इच्छिणारे देश. या इतर देशांची जसे की, श्रीलंकेसारखे देश यांच्याबद्दलची स्पष्टता यापुढील काळात समोर येईल.
५. इस्लामिक देशांचा समूह की, ज्यामध्ये प्रमुख भूमिकेत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती असेल आणि इतर देशांमध्ये तुर्की, पाकिस्तान, इंडोनेशिया, मलेशियासारखे सुन्नी पंथाचे देश असतील. तसेच शिया पंथाला मानणारे इराण, सीरिया, इराक यांसारखे देश ही याच समूहात असू शकतील. इस्लामिक देशांचा समूह हा केवळ त्यांच्या विचारधारेशी संलग्न असणार्या आधारावर एकत्र झालेला दिसू शकतो. अर्थात, त्यांच्या मध्ये अंतर्गत हाणामार्या असल्या तरी विचारधारा, त्या देशांना एका समूहात राहण्यासाठी जोडून ठेवू शकेल.
६. लॅटिन अमेरिका अथवा दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, कोलंबिया, पेरू, व्हेनेझुएला, क्युबापासून कॅरेबियन मेक्सिको यांसारखे देश असतील.
७. आफ्रिकन देशांचा समूह. या समूहात प्रामुख्याने उत्तर आफ्रिकेतील देश जसे की केनिया, नायजर, सुदान यांसारखे देश तूर्तास समोर येतात. पूर्व आफ्रिकेतील आणि दक्षिण आफ्रिकेतील कोणते देश या समूहात येतील, हे आताच सांगणे अवघड असले तरी औत्सुक्याचे असेल, हे निश्चित.
सोव्हिएत संघराज्य कोसळल्यानंतर जगात प्रभावशाली बनलेल्या अमेरिका आणि इतर पश्चिमी देशांचा तूर्तास वरचष्मा असला तरी त्यांचा प्रभाव हळूहळू ओसरताना दिसतो आहे. यापुढील काळात विविध देशांच्या अर्थव्यवस्था, त्यांची लोकसंख्या, त्यांच्याकडील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि काही प्रमाणात वैचारिक अथवा विचारधारेशी संलग्न असणार्या देशांचा समूह प्रभावशाली बनणार आहे.
ज्या देशांना फार मोठा शतकांचा इतिहास आहे, अशा चीन, रशिया आणि भारत अशा आशियातील तीन ध्रुवांचा जगात बोलबाला असेल, हे स्पष्ट आहे. जिथे उत्पादनक्षम, तरूण आणि कुशल लोकसंख्या असेल त्याला भविष्य काळात मागणी असणार आहे. युरोप आणि अमेरिकेतील कुशल लोकसंख्या घटत जाताना भारतकडेच जगातील इतर देशांचे लक्ष लागलेले आहे.
पुढील वर्षी रशियाकडे ’ब्रिक्स’ संघटनेचे अध्यक्षपद असणार आहे आणि ’ब्रिक्स’ची बैठकही रशियामध्ये पार पडताना दिसेल. आशिया, लॅटिन अमेरिका, आखाती देश आणि अनेक आफ्रिकन देश ’ब्रिक्स’मध्ये समाविष्ट होण्यासाठी उत्सुक आहेत. रशियातील ’ब्रिक्स’च्या बैठकीनंतर या बहुध्रुवीय देशांच्या ध्रुवीकरणाला वेग, स्पष्टता आणि आकार येताना दिसू शकेल. या धु्रवीकरणात सातपेक्षा जास्त ’ध्रुव’ ही बनू शकतात.
या सर्व इच्छुक देशांना अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांच्या प्रभावापासून मुक्त व्हावयाचे आहे आणि त्यामुळे या अपेक्षित ध्रुवीकरणाला कोणीही थांबवू शकत नाही, अशीच परिस्थिती आहे. अमेरिकेलाही त्याने रशियाचे युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर गोठवून ठेवलेले ६०० अब्ज डॉलर्स कोणत्या ना कोणत्या स्वरुपात रशियाला परत करावे लागतील.
एकध्रुवीय व्यवस्थेकडून ’बहुध्रुवीय’ व्यवस्थेकडे जग जात असताना अनेक संघर्ष उद्भवणार असून, त्या-त्या संघर्षामधून निर्णायक व्यवस्थेकडे वाटचाल होईल, अशी अपेक्षा आहे. इस्रायल-‘हमास’ संघर्षाकडेही या प्रक्रियेतून बघावे लागेल. बहुध्रुवीय जग आकाराला येत असताना, या नवीन होऊ घातलेल्या संरचनेला अमेरिका व त्याच्या सहकारी पश्चिमी देशांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे जमेल तसे या व्यवस्थेच्या स्थापनेमध्ये खोडा घालण्याचे काम अमेरिकेकडून इमानेइतबारे चालू आहे.
सनत्कुमार कोल्हटकर