एका गृहिणीची संघर्षगाथा

    09-Oct-2023   
Total Views |
Article On Social Worker Hemangi Patil

समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या आणि समाजाची आरोग्यसेवा, हाच ध्यास असलेल्या हेमांगी पाटील यांच्या जीवनाची ही प्रेरणादायी संघर्षगाथा...

शिक्षण मंडळ, भगूरच्या सदस्य आणि संस्थापक एकनाथ शेटे यांच्या कन्या हेमांगी पाटील. एक सालस कन्या ते गृहिणी, ते उद्योगिनी, ते सामाजिक कार्यकर्ता, ते एक डॉक्टर अशा विविध जबाबदार्‍या अत्यंत कार्यप्राविण्याने सांभाळणार्‍या हेमांगी पाटील. डी.फार्मसी, बीए सायकोलॉजी आणि आता वयाच्या ५१व्या वर्षी त्यांनी नुकतेच नॅचरोपॅथी डॉक्टर म्हणून शिक्षण पूर्ण केले. नाशिक जिल्हा आणि ग्रामीण भागात समाजामध्ये शिक्षणाचा टक्का वाढावा, यासाठी त्या शिक्षण मंडळ भगूरच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या मेरठच्या ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायन्टिफिक स्पिरिच्युॅलीझम’ या संस्थेच्या नाशिक शहराच्या आरोग्य आणि आध्यात्मिक प्रमुख आहेत. ‘दुर्गा वाहिनी’, ‘राष्ट्र सेविका समिती’ या राष्ट्रनिष्ठ संघटनांशी त्यांची वैचारिक नाळ जुळलेली. काही वर्षं संघटनांच्या माध्यमातून त्यांनी कार्यही केले. हेमांगी यांनी स्वकर्तृत्वाने नाशिक शहरामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यामागचा संघर्ष स्त्रीमधील शक्तीची देवत्वाची जाणीव करून देतो.

भगूरच्या एकनाथ शेटे आणि मंदाकिनी या पापभिरू आणि राष्ट्रनिष्ठ दाम्पत्याला तीन अपत्ये. त्यापैकी एक हेमांगी. एकनाथ हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. आणीबाणीमध्ये १८ महिने त्यांनी तुरूंगवास भोगला. त्यावेळी हेमांगींना नुकतेच कळू लागले होते. लहानग्या हेमांगीला बाबांचा फार लळा. बाबांना भेटण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांनी हेमांगींनाही सोबत नेले. त्यावेळी हेमांगीने बाबांना विचारले होते की, “इथे असे का ठेवले आहे तुम्हाला? तुम्हाला त्रास होतो ना?” त्यावेळी एकनाथ यांनी जे उत्तर दिले ते हेमांगीच्या मनात कोरले गेले. ते म्हणाले की, “चिऊ, आम्ही सगळे चांगल्या कामासाठी इथे आहोत.

चांगल्या कामासाठी त्रास झाला, तर तो त्रास नसतो.” पुढे बाबा घरी आले. एकनाथ यांना भेटण्यासाठी संघाचे अनेक ज्येष्ठ मान्यवर यायचे. संघप्रचारकही यायचे. हेमांगी यांना वाटायचे की, इतके उच्चशिक्षित आणि संपन्न घरातील व्यक्ती देश-धर्म-समाजासाठी किती त्यागमय जीवन जगतात. त्या प्रेरणेमुळे हेमांगी यांनी लहाणपणापासूच ठरवले की, मीसुद्धा समाजासाठी काही तरी करणारच! अभ्यासात त्या हुशार होत्याच. त्यांनी डी.फार्मसीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर बीए सायकोलॉजी घेऊन शिक्षण पूर्ण केले. पुढे समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे असे ठरले. मात्र, त्याचकाळात त्यांचा विवाह शशिकांत पाटील यांच्याशी झाला. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून कुटुंबासोबतच समाजाचेही कार्य करू, असे हेमांगीचे मत. मात्र, नशिबात काही वेगळेच होते.

हेमांगी यांना तन्मय नावाचा अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान मुलगा. सध्या तो परदेशात उच्चशिक्षण घेत असून, जलतरणामध्ये त्याने राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकल्या आहेत. पण, तो जेव्हा दोन वर्षांचा होता, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, “अतिक्रियाशील म्हणजे त्याला हायपर टेन्शनची समस्या आहे. त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. त्याची ऊर्जा सकारात्मक कार्याकडे वळवली पाहिजे.” हेमांगी यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तन्मयचे संगोपन करणे सुरू केले. (आज तन्मयनेही आईच्या मायेचे काळजीचे सोने केले आहे) त्यांचे पती शशिकांत पेशाने वास्तुविशारद आणि अतिशय हुशार आणि कर्तृत्वान. पण, दुर्देवाने वयाच्या तिशीतच त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांनी गाठले.

आरोग्याच्या गंभीर समस्यांमुळे बाहेर काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक विवंचना सुरू झाल्या. त्यातच हेमांगी यांनाही मायग्रेनचा त्रास सुरू झाला. त्रास कमी व्हावा म्हणून त्या दिवसाला सहा ते सात गोळ्या खाऊ लागल्या. आजारपण आणि समस्या यामध्येच आपले आयुष्य संपणार, अशी निराशात्मक भावना त्यांच्या मनात आणि जीवनात निर्माण झाली. मात्र, त्याचवेळी त्यांना वाटे की, आपण असेच आजारी राहिलो, तर घराचे काय होणार? पती आणि मुलाचे काय होणार? आपण बरे झालेच पाहिजे, या उद्देशाने त्यांनी मेरठच्या ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायन्टिफिक स्पिरिच्युॅलीझम’ या संस्थेच्या शिबिरात उपचार घेतला. उपचार, पथ्य आणि नियम पाळल्यामुळे त्यांची अर्धशिशी आणि थॉयरॉईडही बरे झाले. तसेच आजारामुळे मनात जे नैराश्य उत्पन्न झाले होते, तेही पळून गेले. आपण ठीक झालो, आता कुटुंबासोबतच समाजाचीही आरोग्य सेवा करायची, या ध्यासाने त्यांनी समाजसेवा करायला सुरुवात केली.

या सगळ्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना खूपच सहकार्य केले. हेमांगी यांची आर्थिक विवंचना दूर व्हावी म्हणून वडिलांनी त्यांची कुबेर लॉज हेमांगीला चालवायला दिला. मुलगी लॉज चालवेल म्हणत त्यावेळी अनेक लोकांनी नावे ठेवली. एकच गहजब केला. मात्र हेमांगी ठामपणे म्हणाल्या की, “मी लॉजचा धंदा करणार नाही, तर व्यवसाय करेन.“ तो शब्द त्यांनी खरा केला. कोरोना काळात रुग्णांच्या विलगीकरणासाठी हेमांगी यांनी कुबेर लॉजचा वापर केला. रुग्ण सुश्रुषा आणि उपचाराचे कुशल ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून हेमांगी यांनी नॅचरोपॅथीचे शिक्षण घेणे सुरू केले.

मात्र, कोरोना काळात प्रदीर्घ आजाराने त्यांच्या पतीचाही मृत्यू झाला. हेमांगी यांच्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. पण, त्यातून त्यांनी स्वःताला सावरले. कारण, त्यांच्यासमोर समाज आरोग्याचे ध्येय होते. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि कार्य सुरूच ठेवले. काल दि. ९ ऑक्टोबर रोजी हेमांगी यांना नॅचरोपॅथी डॉक्टरची पदवी प्राप्त झाली. हेमांगी म्हणतात की, “ ‘राष्ट्र सेविका समिती’च्या भगिनींकडे पाहून मला आयुष्याचा अर्थ कळला आहे की, ”त्या स्वतःसाठीही जगतात आणि समाजाच्या उत्थानासाठीही जगतात, कार्य करतात. मीही आयुष्यभर समाजाच्या आरोग्यसेवेसाठी कार्य करणार आहे,” अशा या हेमांगी पाटील प्रत्येक गृहिणींसाठी आदर्श आहेत.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.