अमेरिकेवर घोंगावणार्‍या निर्वासितांच्या अनिर्बंध लोंढ्याचे सावट

    08-Oct-2023
Total Views |
The Presidential Determination on Refugee In America

डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन अध्यक्षपदी येताच, त्यांनी अमेरिकेच्या मेक्सिकोला भिडणार्‍या सीमेवरून अमेरिकेत येऊ इच्छिणार्‍या निर्वासितांसाठी सीमा सताड उघडल्या. त्यानंतर दिवसागणिक वाढत जाणारा आणि अमेरिकेत प्रवेश करणार्‍या निर्वासितांचा लोंढा अजूनही कायम आहे.

नुकतेच ’एक्स’ ( पूर्वीचे ट्विटर )चे सर्वेसर्वा आणि अमेरिकेतील प्रथितयश उद्योगपती एलन मस्क यांनी अमेरिका व मेक्सिकोच्या सीमेवरील भागाला भेट दिली आणि त्याचे ‘याचि देही याचि डोळा‘ असे वृत्तांकन त्यांच्या स्वतःच्या अकाऊंटवर प्रसिद्ध केले. अमेरिकेतील प्रथितयश माध्यमांनी कानाडोळा केलेला असला तरी अमेरिकेतील सर्वसामान्यांमध्ये चर्चिला जाणार्‍या, या अनिर्बंध बेकायदेशीर निर्वासितांच्या लोंढ्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मस्क यांनी सीमेवरील ठिकाणांचा दौरा केला होता. स्थानिक मेयर आणि इतर सुरक्षा अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चांच्या ध्वनिचित्रफितीही त्यांनी त्यांच्या अकाऊंटवर प्रसिद्ध केल्या. यामुळे अमेरिकेत प्रचंड संख्येने घुसणार्‍या निर्वासितांच्या प्रश्नांचे गांभीर्य जनतेसमोर आले.

जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यापासून आतापर्यंत सुमारे ५० लक्ष निर्वासितांनी अमेरिकेत प्रवेश केलेला आहे. या निर्वासितांमध्ये फक्त मेक्सिकन नागरिकच नाहीत, तर अगदी चीनमधून मेक्सिकोपर्यंत आलेले चिनी निर्वासित, पाकिस्तान, सीरिया, लेबनॉन आणि लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला, अर्जेंटिना यांसारख्या देशांमधून आलेले निर्वासितही प्रचंड प्रमाणात आहेत. अफगाणिस्तानमधून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर अमेरिकेच्या लष्करासाठी काम करणार्‍या आणि इतर तत्सम अफगाणी नागरिकांनाही, याच काळात अमेरिकेत प्रवेश मिळाला. या लोकांची पार्श्वभूमी न बघता त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला होता. त्यामध्ये अनेक तालिबानी लोकांनीही अमेरिकेत प्रवेश मिळविला होता. परंतु, या सर्व अमेरिकेत घुसणार्‍या सर्व बेकायदेशीर निर्वासितांमध्ये यामध्ये ’मानवी तस्करी’चाही एक भाग आहेच.

अमेरिकेला काय कमी आहे, असे या निर्वासितांचे प्रांजळ मत असते. आता या घुसखोर नागरिकांची शैक्षणिक कौशल्ये बघावीत, तर तेथेही नन्नाचाच पाढा. मग या निर्वासितांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी उपयोग काय? स्वस्त मनुष्यबळाची उपलब्धता संख्येने असली तरीपण कौशल्याच्या नावाने मारामारच. एवढ्या घुसखोर लोकांना अमेरिकेला पुढील काळात पोसावे लागणार, तो भाग वेगळाच. अर्थात, अमेरिकेला काय डॉलर संपले की, नवीन छापा आणि लोकांना चक्क वाटा, असा प्रकार चालू आहे. या निर्वासितांना अमेरिकेत घुसविण्यासाठी मेक्सिकन ड्रग माफिया सक्रिय असल्याचे सांगितले जाते. कोणतीही अमेरिकन ओळखपत्रे आणि स्थानिक पत्ता नसणार्‍या, या निर्वासितांचा हे मेक्सिकन ड्रग माफिया अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी बेफाम वापर करतात. अमेरिकेच्या मेक्सिकन सीमेवरील स्थानिक पोलीसच तारांचे कुंपण तोडून निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश देत असल्याच्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. एवढेच न्हवे तर सीमेवरून अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये जाण्यासाठी कोणत्या मार्गाने जाता येईल, (रेल्वे/बस वगैरे ) याचे मार्गदर्शन करताना दिसतात.

या निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश देऊन पुढील काही वर्षांत या निर्वासितांना अमेरिकेचे अधिकृत मतदार बनविण्यासाठी चाललेल्या या हालचाली आहेत की, काय हे न कळे. यावरून भारतात अवैधरित्या प्रवेश करणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्या निर्वासितांना मानवतेच्या बुरख्याआडून प्रवेश देण्याची मानसिकता राखणार्‍या भारतातील राजकीय पक्षांची आठवण येते. या निर्वासितांकडे भविष्यातील मतदार म्हणूनच बघितले जाते, हे वास्तव आहे. याचा देशावर काय विपरित परिणाम होईल, याचे या राजकीय पक्षांना कोणतेही देणेघेणे नसते, हेही कटू सत्य असते. भारतातील अशी मानसिकता राखणारे राजकीय पक्ष कोणते, हे चाणाक्ष वाचक ओळखतीलच.

लोकशाही आणि सगळे काही मुक्तछंदातील वावरणे, अशी काही स्वप्ने घेऊन, हे निर्वासित अमेरिकेत येतात. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामधील भौगोलिक सीमा तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या सीमेवर कुठे-कुठे स्थानिक पोलीस तैनात करता येतील? तर ते अवघड आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर त्यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अमेरिका आणि मेक्सिकोच्या भौगोलिक सीमेवर भिंत बांधण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत निर्वासितांच्या अमेरिकेत घुसण्यावर बरेच निर्बंध आले होते. पण, डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदी येताच, त्यांनी अमेरिकेच्या मेक्सिकोला भिडणार्‍या सीमेवरून अमेरिकेत येऊ इच्छिणार्‍या निर्वासितांसाठी सीमा सताड उघडल्या. त्यानंतर दिवसागणिक वाढत जाणारा आणि अमेरिकेत प्रवेश करणार्‍या निर्वासितांचा लोंढा अजूनही कायम आहे.

भारतातून ’अमेरिकन ड्रीम’ घेऊन ’एचवनबी’ व्हिसावर उच्च शिक्षणासाठी जाणारे भारतीय लोकही अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षावर खूश असतात. कारण एकच. डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यकाळात वेगाने ’ग्रीन कार्ड’ उपलब्ध होते, ही वस्तुस्थिती आहे. पण, अमेरिकेत येऊ घातलेल्या परिस्थितीकडे डोळेझाक करता येणार नाही. या बेकायदेशीर निर्वासितांना स्थानिक पोलिसांनी पकडले, तरी या निर्वासितांकडे ना टपाल पाठविण्यासाठी पत्ता उपलब्ध असतो ना, ओळखपत्र उपलब्ध असते. त्यामुळे स्थानिक न्यायालयांनी जामिनावर सोडले, तर नंतर त्यांना परत शोधावयाचे कसे, हाही मोठा जटिल प्रश्नच आहे. कारण, तेथेही खटला सुमारे तीन वर्षे चालतो.

अमेरिकेचा एका वर्षाचा ’एचवनबी’ व्हिसाचा कायदेशीर कोटा आहे-६५ हजार आणि ’एच २’ व्हिसाचा कायदेशीर कोटा आहे-१८ दशलक्ष. यावरून अमेरिकेत घुसणार्‍या लाखो बेकायदेशीर निर्वासितांच्या घटनेचे गांभीर्य लक्षात येईल. निर्वासितांच्या अक्राळविक्राळ समस्येला आळा घालण्यात आलेल्या अपयशामुळे न्यूयॉर्कच्या पोलीस कमिशनरने जून महिन्यात त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.अमेरिकेत बंदुकीचे विविध प्रकार सहजपणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेल्या निर्वासितांकडून दुकानांमध्ये लुटालूट चालू असल्याचे वारंवार दिसून येते. हेच निर्वासित स्थानिक गुन्हेगारीमध्ये पुढे असतात. बंदुकीने एखाद्यावर गोळ्या झाडून पळून जाणारे, हेही काही प्रमाणात याच निर्वासितांमध्ये असतात.

अमेरिकेने एकेकाळी जगासाठी आदर्श, अशा ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या, ज्यामध्ये रस्ते, पूल वगैरे येतात, त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांत सुधारणाच झालेल्या नाहीत. अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे अमेरिकेला दुबई, सिंगापूर यांच्यासारख्या विमानतळाची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क शहरामध्ये आलेल्या पुरामुळे तेथील सबवेमध्ये गळणार्‍या पाण्यामुळे आणि त्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात पसरलेल्या पाण्याबद्दलच्या ध्वनिचित्रफितींमुळे, या पायाभूत सुविधा कशा निकामी होत चालल्या आहेत, हे समोर येते.

भारतातून कायदेशीर मार्गाने अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश करणारे तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि तेथीलच नोकरीमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर अमेरिकेच्या ’ग्रीन कार्डा’साठी वाट बघत बसतात, हे आपण पाहतोच. या मुलामुलींचे आई-वडीलही कौतुकाने त्यांच्या नातवंडांसाठी अमेरिकेत जाऊन राहतात, हेही आता सर्वसामान्यपणे दिसून येते. या वयोवृद्ध आई-वडिलांच्या अमेरिकेत ओळखी नसल्याने नातवंडांना घेऊन तेथील स्थानिक बागेमध्ये जाऊन एकटेच बसणारे, हे वृद्ध भारतीय पालक अमेरिकेतील वास्तव्यात कंटाळून जातात आणि कधी एकदा भारतात मित्रपरिवारात परत जातो, याचीच वाट बघताना दिसतात. हे सर्व सांगण्याचा मुद्दा एवढाच की, येणार्‍या काही वर्षांत अमेरिकेतील परिस्थिती खूपच बदलणार आहे.

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये फेंटानिल आणि इतर अमली पदार्थांच्या आहारी गेलेली तरूण पिढी दिसून येते. अमेरिकेतील कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे १२ ते १५ वयोगटातील मुले, मुली घराबाहेर पडतात. पालकांचे मार्गदर्शन न मिळाल्याने अर्धवट शिक्षण घेतात. पुढे प्रगती होताना दिसली नाही की, अमली पदार्थांच्या आहारी जातात. विवेक रामस्वामी या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या आणि भारतीय मूळ असणार्‍या व्यक्तीने मुलांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत कशी पालकांची गरज असते, ते अधोरेखित केलेले आहे.

अमेरिकेतील उद्योगक्षेत्र यापूर्वीच दक्षिण आशियातील देशांमध्ये आणि लॅटिन अमेरिकेतील मेक्सिकोसारख्या देशांमध्ये स्थलांतरित झालेले आहे. ते सर्व अमेरिकेत परत आणणे नुसते अवघडच नाही, तर अशक्य बनलेले आहे. त्यामुळे अमेरिकेकडे सध्या असणारे हुकूमाचे एक्के कोणते तर जगामध्ये सगळीकडे स्वीकारले जाणारे चलन म्हणजेच अमेरिकन डॉलर आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, असे संरक्षण साहित्याचे उत्पादन. अमेरिकन डॉलरच्या जागतिक मागणीमुळे अमेरिकेकडूनच होत असणारी डॉलरची अनिर्बंध होणारी छपाई आणि तिचे दूरगामी परिणाम अजूनपर्यंत जगासमोर आलेले नाहीत. पण, डॉलरच्या जागतिक मागणीमध्ये जर खंड पडत गेला आणि डॉलरला वगळून जागतिक व्यापाराला चालना मिळू लागली, तर अमेरिकन डॉलरची भेसूर वास्तविकता जगासमोर येत जाणार आहे. पुढील पाच ते सहा वर्षांत याचे परिणाम दिसू लागणे अपरिहार्य आहे.

सनत्कुमार कोल्हटकर