ठाण्यातील इस्रायली ज्यूंना भावतेय भारतीय संस्कृती!
08-Oct-2023
Total Views |
ठाणे : इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरात धिक्कार होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रायलला पाठींबा दर्शविल्याने ठाण्यातील बेने इस्रायली समाज आनंदित झाला आहे.इस्रायल ही आमची पितृभूमी असली तरी,भारत हीच आमची मातृभूमी आहे.इथल्या सारखी संस्कृती जगात कुठेही आढळणार नाही. अशा भावना या समाजाकडुन व्यक्त होत आहेत.
भारतात सुमारे साडे सहा हजार ज्यू धर्मीय राहात असून ठाण्यात सुमारे ६०० आहेत. ठाण्याच्या जडणघडणीत ज्यू धर्मियांचा मोठा सहभाग राहीला असल्याने त्याचेच प्रतिक म्हणुन १८७९ साली ज्यू धर्मीयांची शार हाशामाईम ‘सिनगॉग’ (स्वर्गाचे द्वार) ही मशीद (प्रार्थनास्थळ) टेंभीनाक्यानजीक उभारण्यात आली.
सुमारे २००० वर्षापूर्वी इस्रायलमधून बाहेर पडलेल्या ज्यू समूहाची गलबते कोकणातील नागावच्या (रायगड) किनाऱ्यावर लागल्याने तेव्हापासून ज्यू समाज भारतात स्थायिक झाल्याचे सांगितले जाते.यातीलच एक बेने इस्रायल समुदायातील एक अग्रणी व्यक्तिमत्व सुभेदार मेजर संम्युअल मोझेस नागावकर (१८१६-१९०४) यांनी ही मशीद ठाण्यात उभारली.दर सोमवारी व इतर महत्वाच्या दिवशी प्रार्थनेसाठी ज्यू समाजबांधव इथे जमतात. तसेच,इस्रायलमधून आलेल्या नागरिकांनादेखील वास्तव्याची सुविधा पुरवली जाते.
ठाण्यातील ज्यू लोक आपले दैनंदिन व्यवहार मराठीतूनच करतात.भारतात आम्हाला सर्व काही मिळाले,तेव्हा भारत सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचे हे समाजबांधव सांगतात.