आकाशयोद्ध्यांची गरुडभरारी

    07-Oct-2023
Total Views |
Article on Inaugurates Indian Air Force new Flag

‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ची विधिवत स्थापना दि. ८ ऑक्टोबर, १९३२ झाली. त्यानिमित्ताने हा दिवस ‘ भारतीय वायूसेना दिन’ म्हणूनही साजरा करण्यात येतो. तसेच आजच्या या ऐतिहासिक दिवशी हवाई दलाचे प्रमुख हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरणही करणार आहेत. त्यानिमित्ताने....

आकाशाला गवसणी घालणार्‍या उडनखटोल्याचा शोध लागला आणि युद्धाच्या कक्षा रुंदावल्या. जमीन व पाण्यापुरतेच युद्ध न राहता लढाऊ विमानांनी हिमालयाची उंची कमी करून युद्ध आता सामान्यांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचले आहे. ‘रॉयल इंडियन फोर्स’चा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ साली झाला. कारण, ब्रिटिशांना पहिले महायुद्ध संपून दुसर्‍या महायुद्धाचे नगारे वाजू लागले होते. म्हणून ब्रिटिशांना हिंदुस्थानी जिगरबाज आकाशयोद्ध्यांची नितांत गरज होती. ब्रिटिशकालीन नभांगणातील युद्धात अनेक हिंदुस्थानी आकाशयोद्धांनी चमकदार कामगिरी करून ‘डिस्टिंगविश्ड फ्लाईंग क्रॉस’ हे अत्युच्च शौर्यपदक मिळवले होते. १९६२च्या युद्धात नेहरू सरकारने भारतीय वायूदलाचा प्रत्ययकारी (Effective)युद्धसैन्य असा वापर केलाच नाही, त्यामुळे लाल सेना सीमा पार करून आत घुसली, आपली जमीन बळकावू शकली. वायुदलाचा उपयोग केला असता, तर १९६२च्या संग्रामाचे चित्र निराळे दिसले असते. सरकारी बेपर्वाईमुळे सैन्याला १९६२चा अपमान सहन करावा लागला. हिंदुस्थान-पाक पहिल्या काश्मीर युद्धात पाकिस्तानच्या वायूदलाचे कंबरडे मोडले असताना, १९६२ मध्ये वायुदलाचा वापर का झाला नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.

१९७१च्या युद्धात युद्ध संपताना भारतीय आकाशयोद्ध्यांनी गव्हर्नरचे बांगलादेश (तत्कालीन पूर्व पाकिस्तान)मधील कार्यालय उडवून दिले आणि ९२ हजार पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीला चालना मिळाली. त्या जिगरबाज आकाशयोद्ध्यांचे नाव एअर व्हाईस मार्शल बि. के. विष्णोई. दोनदा वीरचक्राने अलंकृत या वीराचे नुकतेच निधन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय वायूदलाने परमवीरचक्र १, महावीरचक्र २० व वीरचक्र १८८ संपादित केली आहेत. १९६५च्या युद्धातील वायुदलाची गरूडभरारी स्पष्ट करणारा प्रसंग बरेच काही सांगून जातो.
 
दि. १ सप्टेंबर, १९६५... स्थळ संरक्षण मंत्रालय, दिल्ली, संध्याकाळची गोष्ट, उपस्थिती-यशवंतराव चव्हाण व सरसेनापती जनरल जे. एन. चौधरी. जनरल चौधरी म्हणाले की, “सर, हिंदुस्थानी वायुदलाची साथ, मदत ही प्रतिकाराकरिता अनिवार्य, अत्यावश्यक आहे.” ठीक आहे, असे म्हणून संरक्षणमंत्री म्हणाले की, “मी तशी तजवीज करतो” आणि यशवंतरावांनी तत्कालीन एअर चीफ मार्शल अर्जनसिंग यांच्याकडे विचारणा केली. आपण किती कमी वेळात भूदल सेनेला हवाई छत्र (Aircoverage) देऊ शकाल? अर्जनसिंग उत्तरले, “सर, आपल्या आदेशाची सरकारी हुकूमाची प्रतीक्षा आहे.” यशवंतराव म्हणाले की, “दिली परवानगी...” आणि निमिषार्धात वायूसेनेची व्हॅम्पायर (स्कॉड्रन नंबर ४५) ‘मिग २९’ व ‘व्हॅम्पायर’ (स्कॉड्रन २२०) विमानांनी आकाशाला गवसणी घालून हाजीपीरमध्ये पाकिस्तानी फौजांची दाणादाण उडवून भूदल सेनेच्या जाट रेजिमेंट व मराठा लाईट इंन्फट्रीला हवाईछत्र पुरवून पाकच्या अंतरंगात उडी ठोकण्यास वाट करून दिली. वायूसेनेने केलेल्या या जहाँबाज हल्ल्याने पाकी फौजेची झालेली वाताहात, ही या युद्धातील कामगिरी फलद्रूप ठरली.
 
अंधुक प्रकाशात, वातावरणाची प्रतिकूलता असताना हिंदुस्थानी आकाश योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता गरूडभरारी घेत या संकटकालीन परिस्थितीत ‘व्हॅम्पायर स्कॉड्रन नंबर ३’ व ३१ यांनी अतिशय शीघ्र उड्डाणे करून मोलाची कामगिरी केली. या युद्धात पाकिस्तानकडे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणार्‍या ‘सेबरजेट १००’ विनाशिका होत्याच. त्याशिवाय २४ ‘लॉकहीड स्टार फायटर्स एअरक्राफ्ट’ होत्या. याउलट हिंदुस्थानी वायूसेनेकडे ‘व्हॅम्पायर’, ‘मिस्टेरीज’, ‘नॅटस’ व ‘हंटर’ अशी महायुद्धकालीन लढाऊ एअरक्राफ्टस होत्या. हिंदुस्थानी जिगरबाज आकाशयोद्ध्यांचे मनोधैर्य व कार्यकुशलता श्रेष्ठ होती. कारण, ध्येयासक्ती व ’It's not machine but man behind machine counts.’ १९६५च्या या युद्धात आपल्या सीमावर्ती भागातील सरगोदा, पठाणकोट, जामनगर (गुजरात), अदमपूर, श्रीनगर या हवाईतळांवर छत्रीदारी (parachuters) सैनिक उतरवून पाकने हल्ला केला होता. परंतु, तेव्हाचे वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल अर्जनसिंग यांनी दि. ३० ऑगस्टलाच या भागात वायूदलाच्या अनेक स्कॉड्रन तैनात करून ठेवल्यामुळे सर्व पाकी छत्रीधारी सैनिक मारले गेले किंवा पकडले गेले. या युद्धात पाकिस्तानी वायूसेनेची ७३ लढाऊ विमाने आपल्या सैन्याने भुईसपाट केली. हा झटका बसल्यामुळे पाकी वायूदलाने नभांगणातून पळ काढला व पाकी वायूदल प्रमुख एअर मार्शल नूरखान यांनी संदेश पाठवला, “डीअर अर्जन, बंद कर मेरे दोस्त.” तेव्हा अर्जन सिंग म्हणाले की, “तेरे सरकार को बता बाप हमेशा बाप होता हैं, एैसी गलती दुबारा मत करना!“

भविष्यकालीन युद्धात वायूसेना हे ब्रह्मास्त्र ठरणार असून, अण्वस्त्र युगात युद्ध हे नभांगणापुरते मर्यादित राहिले नसून, ते अंतराळातही लढावे लागणार आहे. हिंदुस्थानी वायूदलाच्या पहिल्या लढाऊ (A squadron) ची दि. १ एप्रिल रोजी प्रतिष्ठापना केली. म्हणून दि. १ एप्रिल हा ‘वायूसेना दिन’ म्हणून जाहीर केला. आपल्या सुब्रतो मुखर्जी, मूळगावकर, अर्जनसिंग, वेलींगकर, पुरोहित यांच्यासारख्या जहाँबाज धुरंधर आकाशयोद्ध्यांनी ‘डिस्टिंगविश्ड फ्लाईंग क्रॉस’ मिळवून ब्रिटिश रॉयल फ्लायर्सना ‘हम भी कुछ कम नही’ असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ची विधिवत स्थापना दि. ८ ऑक्टोबर, १९३२ झाली. एप्रिल फूल झालेल्या ब्रिटिशांना हा बदल करणे क्रमप्राप्त होते. आज आमची वायूसेना ९१ वर्षेे पूर्ण करून जगातील एक प्रत्ययकारी (Effective striking force) म्हणून सर्वमान्य सर्वदूर झाली आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण आज आपल्या सशस्त्र सेनादलाला दहा हजारांपेक्षा जास्त अधिकारी तरुणांची चणचण भासत आहे. मराठी तरुणांनी पुढे येऊन, हे अग्निदिव्य स्वीकारावे. जय हिंद!

विनायक अभ्यंकर
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)