मुंबई : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या विरोधात एक ट्विट लिहीले होते. यावरुन आण्णा हजारेंनी आव्हाडांनी केलेल्या ट्विटवरुन कोर्टात जाणार असल्याचा इशाराच दिला आहे. 'ह्या माणसाने या देशाचं वाटोळं केलं.. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही' अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यासोबत त्यांनी अण्णा हजारे यांचा फोटो देखील पोस्ट केला होता.
यानंतर अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासंबंधी वकिलांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या इशाऱ्यानंतर आव्हाडांनी पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, "माझ्या ट्विट नी ह्यांना जाग आली. कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का" असे आव्हाड म्हणाले आहेत. आव्हाडांनी जुन्या पोस्टला रिप्लाय देत ही नवीन पोस्ट केली आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात अण्णा हजारे खरंच कोर्टात जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.