जिल्हा प्रशासनाचे मध्यरात्री ऑपरेशन 'आरोग्य केंद्र'

जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शहापूरच्या आरोग्य केंद्रांना दिली अचानक भेट

    06-Oct-2023
Total Views |
Thane District Administration At Health Centre

ठाणे :
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या सूचनेनुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. या ऑपरेशन 'आरोग्य केंद्र' मोहिमेमुळे आरोग्य विभागातील कर्मचारी धास्तावले आहेत.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी, नवी दिल्लीतुन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून शासकीय रुग्णालयांना नियमितपणे भेटी देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हाधिकारी शिनगारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या समवेत शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रास मध्यरात्री १२:३० वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांच्यासह नर्स व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री दहा वाजता एका महिलेची प्रसूती झाली होती. यानंतर रात्री १: ३० वाजता टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली.