मुंबई : नागपूर, नांदेड, संभाजीनगर रुग्णालयात मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. यावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, आणि त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत. असं संजय राऊत म्हणाले आहेत. नागपूर, नांदेड, संभाजीनगरमधील लोक मरण पावले ते औषधांच्या खरेदीतील ठेकेदारीमुळ मरण पावले आहेत. कमिशनबाजीमुळे मरण पावले आहेत. अशी ही टीका राऊतांनी केली आहे.
रश्मी शुक्ला यांना राज्याचं पोलीस महासंचालक पद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "ज्यांच्यावरती फोन टॅपिंगचे आरोप आहेत, त्यांना तुम्ही पोलीस महासंचालकपदी बसवता? आमचं कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. माझं पोलिसांना आव्हान आहे. २०२४ मध्ये तुम्हाला या खोट्यांचा जबाब द्यावा लागेल. आमच्यासह १० लोकांचे फोन टॅप झाले होते. उद्धव ठाकरेंपासून अनेकांचे फोन टॅप केले. याचे पुरावे आहेत.मी त्यातला व्हिक्टिम आहे. माझा फोन टॅप झाला. नाना पटोले यांचा फोन टॅप झाला. खोटं षडयंत्र करून आमचे फोन टॅप केले, अशा पोलिसांच्या हाती तपास असेल तर काय अपेक्षा करणार? मी कोर्टात जातोय. त्या महिलेवर गुन्हे दाखल झाले. ते मागे घेण्यात आले. का घेतले गुन्हे मागे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुनावणीवर बोलताना राऊत म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांनी स्थापन केला आहे. आता कोणी ऐरागैरा हा पक्ष माझा असल्याचे बोलत आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोगाची खरी कसोटी आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेचा निर्णय लवकरात लवकर घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण कालमर्यादेत संपवा, असे सांगितले आहे. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे परग्रहावरची राज्यघटना मानतात, असे दिसते. कारण ते देशाच्या घटनेला मानत नाहीत. त्यामुळे आता शिवसेना आपली भूमिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडेल." असं राऊत म्हणाले.