नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. दिल्लीतील दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या साथीदारांनाही ईडीने धारेवर धरले आहे. संजय सिंह यांच्या तीन निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीत सहभागी होण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
बुधवार ४ ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. ईडीच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता ईडीने विवेक त्यागी, सर्वेश मिश्रा आणि कंवरबीर सिंग या तीन साथीदारांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत.
विवेक त्यागी आणि सर्वेश मिश्रा या दोघांचाही आम आदमी पक्षाशी संबंध आहे. यापैकी सर्वेश मिश्रा आज ईडीसमोर हजर होण्याची शक्यता आहे. ईडीकडून संजय सिंह यांच्यासोबतच त्यांच्या तिन्ही सहकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
संजय सिंह यांचा सहकारी सर्वेश याने संजय सिंहच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी दोन वेळा २ कोटी रुपये घेतल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच संजय सिंह यांचा पीए विजय त्यागी यांना अमित अरोरा यांच्या कंपनी अरालियास हॉस्पिटॅलिटीच्या व्यवसायात भागभांडवल देण्यात आले असल्याचेही ईडीकडून सांगण्यात येत आहे.