"किंगपिन अजून बाहेर, त्याचाही नंबर येणार"; अनुराग ठाकूर यांचा केजरीवालांवर हल्लाबोल

    05-Oct-2023
Total Views |

Arvind Kejriwal


नवी दिल्ली :
बुधवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे.
 
यावेळी बोलताना आधी उघडपणे घोटाळे करणे आणि सापडल्यानंतर राजकारण करणे हा आम आदमी पक्षाचा स्वभाव असल्याचे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, या सगळ्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर लोक हसत आहेत.
 
केजरीवाल सरकारचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तुरुंगात आहेत. हे तेच लोक आहेत जे भारताविरुद्ध भ्रष्टाचाराच्या घोषणा देत पुढे आले होते. पण आता तेच भ्रष्टाचारात गुंतले आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी अनुराग ठाकूर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला.
 
केजरीवालांबद्दल बोलताना ते म्हणाले की, किंगपिन अजूनही बाहेर आहे. त्याचाही नंबर येईल. चौकशी सुरू आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. तसेच ज्या लोकांना अरविंद केजरीवाल यांनी प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र दिले होते ते सर्वजण एक वर्षापासून तुरुंगात आहेत, असेही ठाकूर यावेळी म्हणाले.