न्यूजक्लिकच्या संपादकास ७ दिवसांची पोलिस कोठडी

    04-Oct-2023
Total Views |

newsclick

नवी दिल्ली :
न्यूजक्लिक ऑनलाइन मीडिया आउटलेटचा संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन प्रमुख अमित चक्रवर्ती यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयाने बेकायदेशीक कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्ग (युएपीए) दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हे निर्देश दिले आहेत.

न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात न्यूजक्लिक या वृत्तसंकेतस्थळास चिनकडून वित्तपुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याद्वारे भारतविरोधी आणि चिनला पुरक असा अजेंडा न्यूजक्लिकद्वारे पसरविण्यात येत असल्याचे लेखात सांगण्यात आले होते.

त्यानंतर मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने न्यूजक्लिकशी संबंधित संपादक, पत्रकार आणि लेखक यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. दिवसभर चाललेल्या या छापेमारीनंतर रात्री पोलिसांनी न्यूजक्लिकच्या कार्यालयास टाळे ठोकले होते. त्याचप्रमाणे वृत्तसंकेतस्थळाचा संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन प्रमुख अमित चक्रवर्ती यांनाही रात्री उशिरा अटक करण्यात आली होती.

युएपीए प्रकरणाव्यतिरिक्त, यापूर्वी दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला देखील न्यूजक्लिक विरुद्ध प्रलंबित आहे. हवाला प्रकरणात डिजिटल मीडिया वेबसाइटवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये शेअर्सचे जास्त मूल्य, निधी वळवणे आणि थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) नियमांचे उल्लंघन यांचा समावेश आहे.

न्यूजक्लिक विरुद्ध दाखल केलेला एफआयआरमध्ये युएपीए कलम १३, १६ (दहशतवादी कृत्य), कलम १७ (दहशतवादी कृत्यांसाठी निधी उभारणी), कलम १८ (षडयंत्र रचणे), कलम २२ (क) (कंपनी, ट्रस्टद्वारे गुन्हा करणे) याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. त्याचप्रमाणे भादंवि अंतर्गत कलम १५३ (अ) (दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम १२० (ब) (गुन्हेगारी कट) या कलमांखालीदेखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे.