केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, लाभार्थ्यांना मिळणार ३०० रुपये अनुदान
04-Oct-2023
Total Views | 60
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या अनुदानात १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण ३०० रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी केले होते. ही किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना गॅस मिळत होता. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी भगिनींना आता ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना अधिसूचित करण्यात आली आहे. या मंडळामुळे हळदीबाबत जागरूकता आणि खप वाढण्यास आणि निर्यात वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करण्यात मदत होईल. त्याचप्रमाणे तेलंगणात वनदेवतेच्या नावाने केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ 889 कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने अंदमान आणि निकोबार, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी भाडेकरार नियमावली मंजूर केली आहे. जागा भाड्याने देण्यासाठी जबाबदार आणि पारदर्शक परिसंस्था निर्माण करण्यासाठी "कायदेशीर चौकट यामुळे प्रदान होणार आहे, असेही केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितले आहे.