वादविवाद करणे सोडून द्यावे...

    04-Oct-2023   
Total Views |
Article On Ramdas Swami Dasbodh

समर्थ साक्षेप म्हणजे सततोद्योगाला महत्त्व देतात. माणसाने सतत उद्योगी असावे, असे स्वामींना वाटते. त्यामुळे वेळेचे महत्त्व, वेळेची किंमत ते जाणतात. ज्यातून काहीही निष्पन्न निघत नाही, अशा शुष्क वादविवादात माणसाने वेळ घालवावा, हे समर्थांना मान्य नाही.

समर्थभक्तांना आणि वाङ्मय अभ्यासकांना समर्थांची लेखनशैली परिचित आहे. दासबोधात स्वामींनी समासात येणारे विषय विस्ताराने सांगितले आहेत. त्यातील एखादा मुद्दा समजावून सांगताना समर्थ त्यातील बारकावे उलगडत जातात. ‘अध्यात्मिक ताप’ या प्रकरणात समर्थ शारीरिक व्याधींची नावे एका मागून एक अशी सांगतात की, एखाद्या व्यावसायिक वैद्यालासुद्धा ती पटकन आठवणार नाहीत. एखादा प्रश्न चर्चेलाघेतला, तर त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू स्वामी उघड करतात. मनाच्या श्लोकात, विचार मर्यादित जागेत, चार ओळीत शब्दबद्ध करायचा असतो, तरीही स्वामी त्या विचारातील विविधता सांगून पुढे जातात. मागील श्लोक क्र. १०८ मध्ये वाद करणे सोडून दिल्यावरच सुखसंवाद साधता येतो,असे मत स्वामींनी मांडले आहे. तो वाद संवादाचा विषय आणखी पुढे चालू ठेवून, पुढील सात श्लोकांतून त्याचा पाठपुरावा केला आहे. या सर्व श्लोकातून स्वामींना श्रोत्यांच्या मनावर बिंबवायचे आहे की, सदासर्वदा निरर्थक वाद घालण्याची सवय चांगली नाही. अशा शुष्क वादातून काहीही निष्पन्न होत नाही. तेव्हा वादविवाद करण्यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा संवाद करून आपले कार्य साधता येते. अहंकार दूर सारल्यास दोन्ही पक्षांना हितकारक निष्कर्ष संवादातून मिळतो, म्हणून माणसाने असे वागावे, असे स्वामी सांगतात.

दासबोधातही समर्थांनी या विचाराचे समर्थन केलेले दिसून येते. ‘अखंड ध्यान’ या दशकातील ’निःस्पृहलक्षण नाम’ या समास क्र. १४.१ मध्ये महंतांसाठी केलेल्या उपदेशात वाद न करण्याचा आणि भांडणाचे प्रसंग टाळण्याचा सल्ला समर्थांनी दिला आहे. त्या समासात स्वामी सांगतात-

शुद्धमार्ग सोडूं नये। दुर्जनांसी तंडो नये।
दुर्जनांसी, नीच दुष्ट माणसांशी संबंध आला, तरी आपले शुद्ध आचरण सोडू नये. कदाचित दुर्जन दुष्ट माणसे निरर्थक वाद घालण्याचा प्रयत्न करून शुद्ध आचरण हा दुबळेपणा आहे, ते ढोंग आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी आपण शांत राहून त्यांच्याशी या विषयावर वाद घालत बसू नये. या संदर्भात समर्थ पुढे असेही सांगतात की-

तपीळपण धरु नये। भांडविता भांडो नये।
या प्रसंगी आपल्या अंगी तापटपणा नसावा.कोणी मुद्दाम भांडण उकरून काढून आपल्याला भांडणासाठी चिथावले तरी आपण शांत राहावे-वाद घालत बसू नये. अशा प्रसंगी लोकांनी भरीस घातले तरी- ‘अती वाद करुं नये।’

समर्थ महंतांना तयार करून विहित कार्यासाठी दूरवरच्या मठावर पाठवीत तेव्हा ते महंत शिष्यांना दासबोधाची एक प्रत देत आणि दूरवरच्या प्रांतात कसे वागावे, यासंबधी उपदेश करीत. समर्थ शिष्य गिरिधर स्वामी काही दिवस समर्थांच्या सहवासात राहिले होते. समर्थ महंताला मठावर पाठवताना कसा उपदेश करीत, हे गिरिधरस्वामींनी स्वानुभवाने एका कवितेत सांगितले आहे. त्यापैकी काही ओळी-

निरोपिती कोठे वाद घालू नको।
भक्ति सोडूं नको राघवाची॥
कुठल्याही प्रसंगी वाद घालून वेळेचा अपव्यय करणे हे समर्थांना मान्य नाही. पण, सामान्यजनांचेतसे नसते. अहंभाव, गर्व, ताठा यांच्या प्रभावाने माझेच म्हणणे खरे, इतरांना काही समजत नाही, या भावनेतून लोक वितंडवाद घालीत असतात. हा स्वामींचाही अनुभव आहे. त्यामुळे तुम्हा-आम्हा सर्वांसाठी पुढील श्लोकांत सांगत आहेत की,

जनी वाद वेवाद सोडूनी द्यावा।
जनीं सूखसंवाद सूखे करावा।
जनीं तो चि तो शोकसंतापहारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥
एखाद्या गोष्टीचे, घटनेचे, प्रसंगाचे, तत्त्वाचे ज्ञान असो वा नसो, प्रत्येक बाबतीत वाद घालण्याची लोकांना सवय असते. त्यांचा अहंभाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. तीव्र अहंकाराने त्यांना वाटते की मलाच सर्व समजते. मी म्हणतो तेच बरोबर. दुसर्‍याला चुकीचे ठरवण्यासाठी, आपल्या अहंकाराला गोंजारण्यासाठी ही माणसे शुष्क वाद घालीत असतात. त्यातून काहीही साध्य होत नाही. केवळ वादाची हौस भागवली जाते आणि सर्वांच्या वेळेचा अपव्यय होतो. बरं, या वादपटूंना काही वेगळा विचार सुचवायचा असतो असे नाही. तुम्ही एखादे मत मांडले, तर ते असेच का? असे का नाही? इत्यादी प्रश्न उपस्थित करून केवळ वादाकरिता वाद किंवा गंमत म्हणून वाद घालतात. त्यात काहीही अर्थ नसतो. अशा लोकांना समजावून सांगताना समर्थ म्हणतात की, लोकहो, तुम्ही हा वादविवाद सोडून द्यावा. त्याऐवजी सुखसंवादकेला, तर सर्वांच्या हिताचे होईल.

सुखसंवाद होण्यासाठी सर्वप्रथम दुसर्‍याचा विचार समजून घ्यावा. त्या मताविषयी आदर करायला शिकले पाहिजे. प्रत्येक कालखंडात त्या त्या काळातील परिस्थितीला अनुसरून समस्यानिर्माण झालेल्या असतात. लोक त्यावर विचार करू लागतात. आजच्या काळात तर प्रसार माध्यमांची बेसुमार वाढ झाल्याने देशभरातून अनेक समस्या आपल्यापर्यंत पोहोचल्यात. अनेक दूरवरच्या छोट्या समस्यांसाठी लोक मोर्चे काढून वाहतुकीला अडथळे निर्माण करतात. आपल्याच मताचा आग्रह धरतात. दुसर्‍या बाजूचा त्यांच्या मताचा विचार करीत नाहीत. वादविवाद घातल्याने समस्यांचे निवारण न होता, त्या चिघळत जातात. समस्या सोडवायच्या असतील तर सुसंवाद साधून समंजसपणाने त्या सोडवता येतात. निर्माण झालेला प्रश्न सोडवायचा आहे, या भूमिकेतून दोन्ही पक्षांनी सुसंवाद साधून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तर वादविवादात होणार्‍या वेळेचा अपव्यय टाळता येईल. समर्थ साक्षेप म्हणजे सततोद्योगाला महत्त्व देतात. माणसाने सतत उद्योगी असावे, असे स्वामींना वाटते. त्यामुळे वेळेचे महत्त्व, वेळेची किंमत ते जाणतात. ज्यातून काहीही निष्पन्न निघत नाही, अशा शुष्क वादविवादात माणसाने वेळ घालवावा, हे समर्थांना मान्य नाही. ‘जनीं सुखससंवाद सुखें करावा’ असा उपदेश ते सर्वांसाठी करीत आहेत. वादापेक्षा संवाद साधण्यावर समर्थांचा भर आहे. या संदर्भातील समर्थांचे अन्य विचार पुढील लेखात पाहता येतील.(क्रमश:)

७७३८७७८३२२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..