ब्रेकींग न्यूज! आप खासदार संजय सिंह यांना अटक

    04-Oct-2023
Total Views |

Sanjay Singh


नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. दिल्लीतील दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवार ४ ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आले आहे.
 
एप्रिलमध्ये दिल्ली दारू घोटाळ्याच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव आले होते. त्यानंतर त्यांनी ईडीवर मानहानीचा खटला दाखल करण्याची परवानगीही मागितली होती. दरम्यान, संजय सिंह यांनी ईडीने आपल्याला चुकून आरोपपत्रात आपले नाव जोडले गेले असल्याचे पत्र पाठवले असल्याचा दावा केला होता.
 
तसेच ईडीने आपली माफी मागितली आहे आणि यासंदर्भात कोणतीही विधाने करू नयेत, असेही संजय सिंह यांनी आपल्या दाव्यात म्हटले होते. मात्र, केवळ एका ठिकाणी संजय सिंह यांचे नाव चुकून 'राहुल सिंह' असे लिहिण्यात आले असून उर्वरित ३ ठिकाणी त्यांचे नाव बरोबर असल्याचे ईडीने म्हटले आहे.
 
दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण आणले होते. परंतु, या धोरणाबदद्ल अनेक वाद निर्माण झाल्यानंतर ते रद्द करण्यात आले. सध्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेदेखील दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.