मुंबईच्या विकासाचा ‘मंगल’मय मार्ग

पालकमंत्री लोढा आणि आयुक्त चहल यांच्यात चर्चा

    31-Oct-2023
Total Views |

MANGALPRABHAT LODHA

मुंबई :
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून नागरिकांच्या सुविधेसाठी उपनगर जिल्ह्यात विविध सोईसुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची स्थापना केली आहे. या उपमक्रमाचे कौतुक होत आहे. पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून शिक्षण, आरोग्य, उन्नतीकरण व सुशोभीकरण, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, जलपुरवठा इत्यादी सुविधा सुधारण्यासाठी आमूलाग्र बदल घडवण्यात आले आहेत. पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या नवीन योजना, प्रलंबित कामे आणि भविष्यात सुरू करण्यात येणार्‍या नव्या संकल्पना याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांची महापालिका मुख्यालयात भेट घेणार आहेत.

शिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, आरोग्य विभागांतर्गत आपला दवाखाना, पाळणाघर, रुग्णालय मदत कक्ष, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालय, उद्यान विभागाअंतर्गत उद्यान, मनोरंजन मैदाने क्रीडांगणे सुशोभीकरण, घन कचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरण, डब्बे पुरवठा, मलबार हिल येथील जलाशयाची क्षमता वाढवण्याच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा, ‘पी उत्तर’ विभाग कार्यालयाचे ‘पी पूर्व’ उपविभाग कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम राबवणे आदी विषयांवर पालकमंत्री लोढा या भेटीदरम्यान आयुक्तांशी चर्चा करतील.

मलबार हिल येथील पाण्याच्या टाकीची क्षमता वाढवण्यासाठी पालिकेच्या प्रस्तावाला तेथील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. त्या संदर्भात काही पर्यायी व्यवस्था करता येईल का? यावर ही चर्चा होणार आहे. ‘पी उत्तर’ विभाग कार्यालयाचे ‘पी पूर्व’ उपविभाग कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. महापालिकेतील सेवा निवृत्त कर्मचार्‍यांसाठी पेन्शन अदालतीचा अपेक्षित परिणाम झाला असून अवघ्या तीन दिवसांत ६७ कर्मचार्‍यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झाली होती. ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांच्यासाठी दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पेन्शन संदर्भात विशेष मोहीम महापालिका मुख्यालयात राबविण्याची सूचनाही पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.