मुंबईची श्वासकोंडी : कारणे आणि उपाययोजना

    31-Oct-2023   
Total Views |
Mumbai Becomes Second Indian Mega City to Battle Dirty Air
 
देशाची आर्थिक राजधानी, लाखो हातांना रोजगार देऊन जगवणारी मुंबई श्वासकोंडीत गुदमरते आहे. वायू प्रदूषण, बांधकाम प्रकल्पांतील धूळ आणि वातावरणातील धुरक्यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला आहे. यासंबंधी मुंबई महानगरपालिकेने काही उपाययोजना केल्या असल्या तरी, या समस्येकडे अधिक खोलवर आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून बघणे हेच क्रमप्राप्त ठरावे.

मुंबई शहरातील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. बुधवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी विलेपार्ले व अंधेरी (चकाला) येथील हवा तर अतिधोकादायक पातळीवर पोहोचली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, सायंकाळी ७ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक ४११ नोंदवला गेला, तर चकाला येथे गुणवत्ता निर्देशांक ३०९ नोंदवला होता. अशा धोकादायक वातावरणात घराबाहेर पडल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. विशेषकरुन रुग्णांना व ज्येष्ठांना श्वसनाच्या गंभीर स्वरुपाच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.

सध्या समुद्रापासून जमिनीपर्यंत जे वारे वाहतात, त्यांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे धुलीकण हवेतच साचून राहतात व परिणामी या कालावधीत हवेचा दर्जा खालावतो. मु्ळातच जगभर पसरलेल्या वातावरण बदलाच्या समस्येबरोबर शहरात सार्वत्रिक सुरू असलेली बांधकामे व अनेक प्रकारच्या विकासकामांमुळे उडणार्‍या धुळीची त्यात अधिकची भर पडते. यातूनच हवेतील अतिसूक्ष्म कण (पीएम २.५) व सूक्ष्म कण (पीएम १०) या धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबईत साधारणपणे तेलशुद्धीकरण प्रकल्प, छोटे कारखाने असलेल्या माजगाव, चेंबूर, गोवंडी, नवी मुंबई या परिसरातील हवेचा दर्जा अति खालावलेला राहतो. मात्र, यावेळी विलेपार्ले, अंधेरी (चकाला) येथील हवा सर्वांत प्रदूषित असल्याचे आढळून आले. पावसाळा संपला तरी वातावरणातील आर्द्रता कायम असल्याने प्रदूषके साचून सलग हवेची दुसर्‍या वा तिसर्‍या दिवसांची स्थितीसुद्धा खालावलेलीच नमूद करण्यात आली. सकाळच्या वेळी हवेत ८० टक्क्यांहून अधिक आर्द्रता, तर संध्याकाळी ७० टक्क्यांहून अधिक आर्द्रता नोंदवली गेली. मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवर असला, तरी शहरातील वेगवेगळ्या केंद्रावर हवेचे स्वरूप अतिवाईट स्वरूपात आढळून आले आहे.

वाहनांचे प्रदूषण तसेच बांधकामामुळे वाढीव धुलीकण हवेत सातत्याने असल्याने हवेचा गुणवता दर्जा खालावतो. यात ‘पीएम २.५’ व ‘पीएम १०’ या धुलीकणांचे निर्देशांक अधिक घातक स्वरूपात नोंद केले गेले आहेत. मुंबईमध्ये ‘सफर’ या हवेची गुणवता मोजणार्‍या प्रणालीवर ‘पीएम २.५’ माजगाव व अंधेरी येथे ३०० हून अधिक नोंदले गेले आहे. ‘पीएम १०’चे प्रमाणही अधिक धोकादायक अवस्थेत दर्शवित होते.

कोट्यवधी खर्चूनही शुद्ध हवा नाहीच!

देशात २०१७ साली मध्ये ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम’ सुरू करण्यात आला. देशात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १३१ शहरांत ‘पीएम १०’ची मात्रा अधिक आहे. त्यात महाराष्ट्रातील १९ शहरे आहेत. २०२४ पर्यंत ‘पीएम २.५’ आणि ‘पीएम १०’ दोन्हीचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे प्रयत्न आता सरकारकडून सुरू आहेत. राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरे व ‘पीएम १०’चे प्रमाण (२०२३ वर्ष) खालीलप्रमाणे नोंद दर्शवितात -
 
वसई-विरार (१५५),उल्हासनगर (१२८),मुंबई (११६), बदलापूर (१४६), चंद्रपूर (१२१), ठाणे (११५), नवी मुंबई (१०२), पुणे (९६), नागपूर (९७), संभाजीनगर (१०७), जालना (९३). यापैकी बर्‍याच शहरांमध्ये ‘पीएम १०’चे प्रमाण वार्षिक सरासरीपेक्षा दुपटीच्या जवळपास आहे. ‘पीएम’ची पातळी नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या ९२ दिवसांपैकी ६६ दिवसांची स्थिती शरीरात पाच ते सहा सिगारेट ओढल्यानंतर बनते, तशी बनली होती. २०१६ ते २०२१ या काळात ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी’ आजाराने (COPD) १४ हजार, ३९६ माणसे दगावली. म्हणजे दिवसाला सरासरी सहा माणसे या आजाराने मेली. याच काळात ‘ब्रॉन्कॉईटीक्स’ आजाराने १ हजार, २२० माणसे व दम्याने ६ हजार, ७५७ माणसे मेली. (‘सफर’ व ‘सीपीसीबी’ यांच्या माहितीवरून) एक दिवस आधी मुंबईच्या हवेचा सरासरी निर्देशांक १९१ होता, त्यावेळी दिल्लीचा निर्देशांक फक्त ८४ होता.

अंधेरी व माजगावचा निर्देशांक ३०० हून अधिक होता (निर्देशांक २००च्या वर गेला, तर हवेची स्थिती धोक्याची मानतात व ३००च्यावर गेली, तर हवेचा गुणवत्ता दर्जा अति धोक्याचा समजला जातो.) म्हणूनच मुंबईत हवा अतिधोक्याची बनली आहे.
या मुंबईच्या या श्वासकोंडीला पाच प्रकारचे प्रदूषक कारणीभूत ठरले आहेत.
बांधकामामुळे धूळ व डेब्रिज तयार होऊन हवेत मिसळतात.
रस्त्यावरील धूळ

बर्‍याच ठिकाणी घनकचरा जाळण्यात येतो. त्यामुळे धुराचे प्रदूषक हवेत मिसळतात
.
हॉटेल, धाबे इत्यादी खाण्याच्या अर्धवट सोडून दिलेल्या प्रदूषकांमुळे रेडी मिक्स काँक्रिट उद्योगधंद्यामुळे धोकादायक प्रदूषके हवेत सोडली जातात.

ही परिस्थिती लक्षात घेता, मुंबई शहराकरिता ६७ हवा गुणवत्ता दर्जा तपासण्याची केंद्रे असायला हवीत.पण, सध्या फक्त २१ म्हणजे, एक तृतीयांशपेक्षा कमी संख्येत अशी केंद्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी सर्वप्रथम या केंद्रांची संख्या ही वाढवायला हवी.
 
गेले दोन आठवडे मुंबईत सुरु असलेल्या तब्बल सहा हजार ठिकाणांच्या विकासकामांमुळे हवा प्रदूषित बनून धोकादायक अवस्थेला पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कंत्राटदारांना ही बांधकामे तात्पुरती थांबविण्याचे निर्देश दिले. तसेच बांधकाम स्थळावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मुंबईत जरी हवेच्या वहनासाठी समुद्रकिनार्‍यांची मदत मिळत असली, तरी दिल्लीपेक्षा मुंबईत प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी विकासकामांबरोबर प्रदूषण कमी करण्याची खबरदारी पण घ्यायला हवी.
 
कंत्राटदारानी त्यांच्या बांधकाम स्थळांवर खालील उपाययोजना अंगीकाराव्यात.

बांधकामाच्या वा विकासकामाच्या प्रत्येक साईटवर दिवसाकाठी चार-पाच वेळेला पाण्याचे फवारे मारावे. त्यातून धूळ खाली बसेल. साईटवर हवेचा निर्देशांक नोंदवला पाहिजे. रस्ता खणणे, मार्बल कापताना ती बंद राहून धूळ बाहेर पसरणे बंद झाले पाहिजे. कामगारांना मास्क व गॉगल्स वापरणे बंधनकारक करावे. धूळ व कचरा ज्या ट्रकमधून शहराबाहेर क्षेपणभूमीत नेताना टॉपॉलेननी बंद करायला हवा. एकदा वापरून झाल्यावर ट्रकची चाके स्वच्छ करावीत व धुवावीत. प्रत्येक साईटवर ‘सीसीटीव्ही’ वापरावे, जेणेकरून ट्रकच्या वा कोणत्याही वाहनात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान भरू नये, भरले तर ते ‘सीसीटीव्ही’मध्ये लक्षात येईल.

बांधकामाचा वा तोडकामाचा मलबा कंत्राटदारांनी तेथेच जवळपास पसरावा व लांब नेत असल्यास त्या कामाची संपूर्ण माहिती रेकॉर्ड करून ठेवावी. मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामे वा विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत प्रदूषके जमून हवेचा दर्जा धोकादायक बनला आहे, हे खालील काही ठिकाणच्या उदाहरणांवरुन अधिक स्पष्ट व्हावे.

ठिकाण १. वांद्रे-कुर्ला संकुल - बुलेट ट्रेन प्रकल्प
 
दि. १४ ऑक्टोबरला हवेचा निर्देशांक २२९. या साईटवर धुळीचे प्रमाण वाढले आहे. येथे पाण्याचे फवारे मारण्याचे काम होणार आहे व मिन्ट गन लवकरच उभारली जाणार आहे. यातून धुळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ठिकाण २. पूर्व महामार्ग घाटकोपर. जुना पूल तोडण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. कामामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. येथे २० फूट उंचीचे पत्रे बांधले, तर जेसीबी व क्रेनचे काम थांबवावे लागेल. कंत्राटदाराला डेब्रिज काढण्याचे काम रात्री करण्यास सांगितले आहे. ते रात्रीच्या वेळी बंद ट्रकमधून लांब नेले जाईल.
 
दि. १८ ऑक्टोबरला चेंबूरकडील हवेचा निर्देशांक२१२.

ठिकाण ३. वरळीला इमारतीचे बांधकाम विकासकांनी सुरूच ठेवले आहे. पाच ’जेसीबी’ वापरून काम केले जात आहे. त्यातून आसपासच्या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. २० फूट उंचीचे बॅरिकेड वापरले जात आहेत. पण, टॉपॉलिनचा वापर दिसण्यात येत नाही. पाण्याचा फवारा मारला जात नाही. काम करणार्‍या कामगारांना मास्क वापरण्यास दिलेले नाहीत. ही स्थिती धोकादायक आहे व कंत्राटदाराला खबरदारी म्हणून योग्य त्या सूचना द्यावयास हव्यात.

दि. १८ व १९ ऑक्टोबरला हवेचा निर्देशांक १९९ नोंद झाला आहे. हवेतील या प्रदूषणात सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के वाटा उद्योगाचा आहे, २७ टक्के वाटा वाहनांचा आहे आणि १७ टक्के वाटा पिके जाळण्यातून वा कचरा जाळण्यातून होत आहे. मुंबईतल्या या धोकादायक अवस्थेकडे सरकारने गंभीरपणे लक्ष देऊन, त्यावर पालिकेच्या व इतर संबंधित संस्थांच्या मदतीने जरूरीच्या दीर्घकालीन उपाययोजना केल्यास मुंबईची या श्वासकोंडीतून मुक्तता होऊ शकेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.