मराठा आंदोलनाच्या नावे हिंसाचार माजवणाऱ्यांना गृहमंत्र्यांचा गर्भित इशारा

हिंसेला थारा नाही! घरं जाळणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार

    31-Oct-2023
Total Views |
DCM Devendra Fadnavis On Violence

मुंबई :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असताना बीड-जालना आणि राज्यातील इतर भागात जाळपोळ झाली. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अशाप्रकारे माणसं घरात असताना त्यांना घरं जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्याविरोधात ३०७ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत पोलीस प्रशासन असल्याचा स्पष्ट इशारा फडणवीसांनी यावेळी दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणप्रकरणी राज्यात विविध भागांत याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यातच आता गृहमंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत या आंदलोनाला भडकवणाऱ्यांचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार असून दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच ते म्हणाले, ज्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत आंदोलन सुरू ठेवले आहे, सरकार त्यांच्या पाठिशी आहे, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, "मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल राज्य सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रिमडळातील निर्णयही यादृष्टीने घेण्यात आले. मात्र, काही लोक या आंदोलनाच्या आड काही जण हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी शक्यतादेखील त्यांनी वर्तविली. तसेच, हिंसक प्रवृत्तींविरोधात पोलीस बघ्याची भूमिका कदापिही घेणार नाहीत तर त्या ठिकाणी पोलीस ३०७ अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत, असेही ते म्हणाले.

हिंसाचाराच्या कटात राजकीय व्यक्तीही सामील!

"दुर्दैवाने अशा प्रकारे सुरू असलेल्या आंदोलनात काही राजकीय पक्षांचे नेतेही या हिंसाचाराच्या कटात सामील असल्याचेही निष्पन्न झालेले आहे. याचे व्हीडिओ मिळाल्यानंतर याबद्दल माहितीही दिली जाईल. या प्रकारच्या घटनांचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात क्युरिएटीव्ह याचिका दाखल

राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका राज्य सरकारतर्फे दाखल केली जाणार आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.