राज्यभरात विविध गोशाळा गोवंशासाठी उत्तम कार्य करत आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील जांभुळवाडीतील गोशाळा ही डोंगरावरील एक आदर्श गोशाळा ठरली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि प्रदूषणमुक्त वातावरणात इथे पशुंची अविरत सेवा केली जाते. तीन गाईंपासून सुरू केलेली ही गोसेवा ५५०च्या गोवंशांच्या सेवेपर्यंत येऊन पोहोचली आहे. जमिनीपासून दीड किमी उंच डोंगरमाथ्यावरील ही पहिली गोशाळा असल्याचे विश्वस्त सांगतात. त्यानिमित्ताने या गोसेवेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख....
'श्रीवीरालयम् जैन अहिंसा तीर्थ’ या ट्रस्टच्यामाध्यमातून सन २००८ पासून तीन गोवंशांपासून ही गोशाळा सुरू झाली. डॉ. अरुण विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने ही गोशाळा सुरू करण्यात आली. गोशाळेसोबतच पशुपक्ष्यांसाठी चबुतरा आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गोवंश वाचवणे व ही चळवळ पुढे नेणे, हा मूळ हेतू डोळ्यांसमोर ठेवून या गोशाळेची वाटचाल सुरु आहे. राज्यभरात विविध ठिकाणी शेतकरी आपले पशुधन शुल्लक कारणासाठी कत्तलखान्यांना देतात. त्यांची विक्रीही केली जाते. याच पशुधनांना केवळ जीवनदान देणे नाही, तर त्यांची देखभाल करणे, त्यांचा सांभाळ करणे या प्रमुख हेतूसह ही गोशाळा कार्यरत आहे. येथून पुढेही असेच गोसेवेसाठी काम करत राहणार, असे या ट्रस्टचे विश्वस्त प्रकर्षाने अधोरेखित करतात.
ही गोशाळा जैन समाजाच्यावतीने चालवली जाते. संस्थेचा खर्च हा ८० टक्के संस्था व संघटनेच्या आर्थिक मदतीने तर, उरलेला खर्च हा येथे गोमूत्र, शेण यांच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून चालतो. या गोशाळेत २७ जण सेवा देतात. गोशाळेतील हे सर्व सेवेकरी गावातीलच रहिवाशी आहेत. त्यांना या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला आहे. तसेच, गोवंशाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुंचे वैद्यकीय तज्ज्ञ व त्यांच्या समवेत काही इतरही पथक २४ तास कार्यरत असते.
या गोशाळेत सर्वाधिक पशुधन कुठून येते? तर हे पशुधन कत्तलखान्यात नेण्यापूर्वीच आणलेले आढळते. त्यामुळे साहजिकच हे पशू अशक्त असतात. बरेचदा त्या गोवंशाची प्रकृतीही व्यवस्थित नसते. ते मुळातच घाबरलेले असल्याने पुन्हा मोकळ्या वातावरणाशी जुळवून घेण्यास त्यांना वेळ लागतो. म्हणूनच गोशाळेत नव्याने दाखल होणार्या गोवंशाला सात दिवस वेगळे ठेवण्यात येते. त्याला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात येण्यास वेळ लागतो. इतर गोशाळा आजारी,अशक्त अशा गोवंशाचा सांभाळ करण्यास सहसा पुढे यत नाहीत. अशा प्रकारच्या गोवंशांचा स्वीकार करीत नाहीत. मात्र, या गोशाळेत कुठलाही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या गोवंशांना आधार दिला जातो. एवढेच नव्हे, तर त्यांची रीतसर देखभालही केली जाते. त्यामुळे हीच खरी भेदभावविरहित गोसेवा म्हणता येईल. या गोशाळेत एकूण दहा गोठे आहेत. तसेच दोन चार्यांची मोठे गोदामे आहेत. गोरक्षकांना निवासासाठी घरेदेखील उपलब्ध आहेत, तर पक्ष्यांसाठी चार चबुतरे उभारण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून पशुपक्ष्यांसाठी एक रुग्णालयही इथेच उभारण्यात आले आहे. जमिनीपासून दीड किलोमीटर अंतरावर, डोंगरावर वसलेल्या या गोशाळेला वीज व आणि पाण्याची सेवा पोहोचण्यासाठी थोडा कालावधी लागला. म्हणूनच गुरांची पाण्याची गरज लक्षात घेता, ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’द्वारे सहा महिने त्यांची तहान भागवली जाते. आजघडीला या गोशाळेत ५५० गोवंश असून, देशी, जर्सी, म्हशी असे विविध पशुधन आहे, तर जवळपास तीन हजार पक्षी दररोज दाणे खाण्यासाठी येत असल्याचेही संबंधितांनी सांगितले. विशेष म्हणजे, कोणतीही सरकारी मदत ही गोशाळा स्वीकारत नाही. भगवान महावीरांचा ’जिओ ओर जीने दो’ हा उपदेश डोळ्यासमोर ठेवून सेवेचा प्रामाणिक प्रयत्न या गोशाळेतर्फे केला जातो.
शेतकर्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस
गोवंशाची गरज आणि त्याचे महत्त्व याची माहिती सर्वांनी व्हावी, यासाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. शेतकरी, पशुपालकांना हे प्रशिक्षण दिल्यास त्यांना नक्कीच त्याचा दीर्घकालीन लाभ होईल. गोमूत्र आणि शेणापासून नैसर्गिक शेतीची प्रशिक्षणार्थींना शास्त्रोक्त माहिती दिली जाईल. तसेच दोन ते पाच एकर शेतात बैलांचा वापर कसा करावा, बैलांच्या वापरामुळे मातीचा पोत कसा सुधारतो, जमिनीखालचा पाण्याचा स्थर कसा वाढतो, याविषयी देखील माहिती दिली जाईल. यामुळे नैसर्गिक शेतीलाही चालना मिळेल. यामुळे सध्या होणारे विविध प्रकारचे रोग, कॅन्सर, किडनी, हृदयरोगांचे विकार कमी होऊ शकतात. कारण, आजच्या धकाधकीच्या जीवनात या रोगांचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याने त्यासंबंधीची शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याचा असल्याचा गोशाळेचा विचार आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकर्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. शेतकर्यांना, पशुपालकांना अशा प्रकारे नैसर्गिक शेतीचे ज्ञान देऊन पशुधनाचे महत्त्व पटवून देणार आहोत, असे या संस्थेचे विश्वस्त विनोद राठोड, नरेश मेहता यांनी सांगितलेे. सध्या राज्य सरकारने गोसेवा आयोग कार्यान्वित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून चांगले काम होत आहे. राज्यस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश यात यापूर्वीच आयोगाकडून उत्तम काम झाले आहे. त्यात बर्याच सुधारणादेखील झाल्या आहेत. देशी गाईंपासून जे उत्पन्न मिळते, त्याकडे एकूणच शासनाचे विविध पशुसंवर्धन संबंधित विभाग आणि शेतकरी, नागरिक हे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आज गोमातेची दयनीय अवस्था आपल्या सगळ्यांनाच पाहण्यास मिळते. गेल्या दहा वर्षांपासून ट्रस्टतर्फे वृक्षारोपणदेखील करण्यात येते. एकूणच आदर्श गोशाळा उभारुन गाईंचे महत्त्व आणि जीवदयेचा प्रचार करणे, हाच ट्रस्टचा प्रमुख उद्देश आहे.
गोरक्षक तयार व्हावेत
राज्यभरात मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांचे काम अतिशय उत्तम आहे. गोवंशाची तळमळ त्यांच्यात प्रामुख्याने दिसून येते. त्या माध्यमातून स्वामी यांना बळ देण्यासाठी विविध जिल्ह्यांत, तालुक्यांत अशा प्रकारे गोरक्षक तयार व्हावेत व राज्यातील हे पशुधन वाचवावे,असे आवाहन गोशाळेचे विश्वस्त आणि शेतकर्यांनी केले आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क : देहुरोड कात्रज बायपास, आंबेगाव (खुर्द), मु. पो. जांभुळवाडी, कोळेवाडी, ता. हवेली, जि. पुणे)
विश्वस्त : विनोद राठोड