‘पलावा’तील रहिवाशांना दिवाळी भेट

मालमत्ता करात ६६ टक्के सूट

    31-Oct-2023
Total Views |

palava

डोंबिवली :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पलावा वसाहतीतील रहिवाशांच्या करात ६६ टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २६ हजार सदानिकाधारकांना दिलासा मिळाला असून त्यांची दिवाळी गोड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मौजे निळजे, काटई, घेसर, उसरघर, माणगाव आणि हेदुटणो या मनपा हद्दीत मे. लोढा डेव्हलपर्स यांनी पलावा येथे एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प करण्यास नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वेळोवेळी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि पूर्ण झालेल्या इमारतीस बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले आहेत. एकात्मिक नगर वसाहतप्रकल्पातंर्गत सर्व पायाभूत सुविधा जसे रस्ते, अंतर्गत दिवाबत्ती व्यवस्था, जलनिसारण, मलनिसारण व्यवस्था विकासामार्फत विकसित केले जाते. यात अग्निशमन व्यवस्था, शाळा आणि पोलीस चौकी यांचाही समावेश असतो. या प्रकल्पांतर्गत सर्व पायाभूत सुविधा आणि इतर सोईसुविधा विकासामार्फत उपलब्ध करून दिल्या असल्याने महानगरपालिकेकडून अशा इमारतीतील सदनिकाधारकांकडून संपूर्ण मालमत्ता कराची मागणी केली जात होती.

४ हजारांची कर सवलत
पालिका या गृहसंकुलातील सदानिकाधारकांकडून प्रतिवर्ष प्रति सदनिकेस सहा हजार रुपये मालमत्ता कराची मागणी करीत आहे. शासन अधिसूचनेनुसार कर सवलतीची अंमलबजावणी पालिकेकडून केल्यास प्रतिवर्ष प्रति सदनिका चार हजार रुपयांची कर सवलत सदानिका धारकास मिळणार आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी सातत्याने दिलासा देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सकारात्मक भूमिका घेत ६६ टक्के कर सवलतीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.

आ. राजू पाटील यांनी केले अभिनंदन
पलावा ‘आयटीपी’ प्रकल्पामधील नागरिकांच्या मालमत्ता करात 66 टक्के सवलत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.