आपली प्रकृती समजून घेऊन, आपल्या केसांची नैसर्गिक व स्वाभाविक संरचना समजून घेतल्यास, आपल्या केसांवर काय व किती प्रयोग करावेत आणि ते किती यशस्वी होतील, याचा अंदाज येऊ लागतो. मागील लेखात वात प्रकृती असताना केसांची रचना कशी असते, याबद्दल विस्तृत जाणून घेतले. आजच्या लेखात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींच्या नैसर्गिक केशरचनांबद्दल माहिती करुन घेऊया.
प्रकृतीनुरुप केसांची रचना, रंग, पोत, वाढ इत्यादीमध्ये भिन्नता असते. काहींचे नैसर्गिकरित्या केस कुरळे असतात, तर काहींचे अगदी सरळ, काहींचे काळेभोर, तर काहींचे लांब. प्रत्येक व्यक्तीला आपल्यापेक्षा इतरांचेच केस आवडतात. ज्यांचे केस सरळ आहेत, त्यांना कुरळ्या केसांचे आकर्षण असते व तसे व्हावेत म्हणून विविध रासायनिक प्रक्रियाही बरेचदा त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. या प्रक्रियांचा काही वेळेस तात्पुरता गुण येतोसुद्धा. पण, बहुतांशी वेळा या प्रक्रिया वारंवार केल्याने केसांची दशा होते आणि त्यावर उपाय म्हणून पुन्हा रासायनिक प्रक्रियांचा भडिमार या सगळ्या दुष्ट चक्रामध्ये अडकल्यास केसांचा पोत, रंग, वाढ इ. सगळ्याच बाबींवर अनिष्ट परिणाम होतो, जो कायमस्वरुपी वरारसश इथपर्यंत होताना दिसतो.
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस सरळ असतात. त्यांचा स्पर्श मऊ, मुलायम असतो. केस धुवून बरेच दिवस झाले तरी अन्य प्रकृती पेक्षा या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये केसांमध्ये गुंता कमी होतो. एक प्रकारची नैसर्गिक तुकतुकी (Shine) या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींच्या केसांमध्ये असते. त्यांच्या केसांवरून हात फिरवासा वाटतो. (SILKY, SOFT, SHINY HAIR) या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये स्वाभाविक शरीरोष्मा अधिक असते. यांना घामही जरा जास्त येतो. त्याचप्रमाणे टाळू व संपूर्ण डोकं थोडं अधिक गरम असते आणि केसांमध्ये घामही अधिक येतो. बर्याचदा घामाला दुर्गंधी असते. मनुष्याला येणारा घाम थोडा तेलकट असतो (फक्त द्रवांश नसतो, स्निग्धांश ही असतो) म्हणून स्वेदाचे/घामाचे प्रमाण जास्त असल्यास अंग चिकटही जाणवते आणि स्वच्छता राखली नाही, तर अंगाला दुर्गंधी, खाज इ. येऊ लागते.
मनुष्याच्या वाढीच्या काही मुख्य Stages(अवस्था) असतात. बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्था स्वाभाविकत: कफाचे अधिक्य असलेली अवस्था असते. तारुण्यावस्थेत स्वाभाविकत: पित्ताचे प्रमाण मुनष्यात अधिक असते आणि वृद्धावस्थेत वाताधिक्य असते. म्हणजेच त्या-त्या अवस्थांमध्ये त्या-त्या विशिष्ट दोषाचे प्राबल्य असते. लहानपणी म्हणूनच कमी-जास्त प्रमाणात मुलांमध्ये सर्दी-पडसे-खोकला आणि अन्य कफजन्य तक्रारी अधिक असतात. तसेच, पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये तरुणाईत पित्ताच्या विविध तक्रारी भडसावत राहतात. वयात आल्यानंतर प्रत्येक व व्यक्ती बाह्य Appreance वर जरा जास्त लक्ष देऊ लागते. पित्त प्रकृतीची तरुणाई केसांमधील घाम, चिकटपणा, तेलकटपणा यापासून लांब राहण्यासाठी बरेच खटाटोप करताना दिसतात. रोज केस धुणे, केसांना तेल लावून मॉलिश न करणे, तेलकटपणा कमी व्हावा/दिसावा म्हणून व तुकतुकीत केस दिसावेत, म्हणून LEAVE-ON इ. सारख्या प्रसाधनांचा अत्याधिक वापर करताना दिसते. जीमला जाणारी तरुणाई तर दिवसातून दोन-दोन वेळा अंघोळ करते, केस धुते. प्रत्येक आंघोळीनंतर केसांना भरपूर शॅम्यू लावणे व धुतल्यानंतर हेअर ड्रायरने ओले केस वाळविणे इ. गोष्टी वारंवार करत राहते.या सगळ्याचा अनिष्ट परिणाम केसांवर कालांतराने होताना नक्कीच दिसतो.
पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे केस सरळ असतात. मऊ व मुलायम असतात. घामाचे प्रमाण अधिक असल्यास सकाळी धुतलेले केस दुसर्या दिवस मावळेपर्यंत तेलकट होतात. तसेच या केसांच्या हेअर स्टाईल करणे खूप कठीण असते. सिल्की केस असल्यामुळे केसांना संरचना/सजावट (DECORATIONS) लावल्या जागी टिकत नाहीत. HAIR , PINS/CLIPS घसरतात. तसेच, पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस खूप घनदाट नसतात व स्वाभाविकत: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची सहनशक्ती कमी असते, ते थोडे अधिक नाजूक असतात. परिणामी, केसांना खूप पिना लावणे, टोचणारी/बोचणारी केशभूषा करणे, त्यांना सहन होत नाही. डोकं जड होणे, दुखणं इ. तक्रारी उद्भवू शकतात. केसांची मुळे खूप भक्कम नसतात. वारंवार TIGHT HAIR STYES खूप सार्या HAIR PINS इ. लावल्या गेल्या, तर केसांचे गळणे, तुटणे, केसांची मूळं दुखणे इ. तक्रारी उद्भवतात.
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस काळेभोर नसतात. ब्राऊनच्या विविध छटा बघायला मिळतात. वरील पद्धतीप्रमाणे जर नैसर्गिक केस असतील- सरळ, ब्राऊन हेअर, मऊ-मुलायम, कमी जाडी व थोडे कमी भक्कम असे केस असतील आणि अशा व्यक्तींने CURLING, COLOURING, PERNING इ. HOT IRON TREATMENTS जर करून घेतले, (वारंवार) तर इतर प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस अधिक खराब होतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये स्वाभाविकत: अधिक उष्णता असते. याचा परिणाम त्यांच्या केसांवरही होताना बघायला मिळतो. जर पित्तवर्धक आहार-विहाराची त्यात भर पडली, तर हे परिणाम व लक्षणे लवकर उत्पन्न होताना दिसतात- जसे अकाली केस गळणे व पिकणे (PREMATURE BALDNESS & GREYING OF HAIR) इतरांना हवेहवेसे केस पित्त प्रकृतीचे जन्मतातच असतात, त्यांची फक्त निगा राखणे, याची गरज असते.
पण, वैविध्यतेचा अट्टाहास करून केसांचे आरोग्य पणाला लावले जाते, याचेच प्रमाण अधिक आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी केस धुवायला गरम पाणी अजिबात वापरू नये. इतर प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा व टाळू अधिक संवेदनशील असतो. याचाच अर्थ, सगळीच प्रसाधने या प्रकृतीला सूट होतीलच असे नाही. खूप सौम्य प्रकारात येतील अशीच सौंदर्य प्रसाधने वापरावीत. बाजारात नवीन आलयं म्हणून सगळं काही ट्राय करत बसू नये. प्रयोग करून पाहूयात-असे करू नये. त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यताच जास्त असते. शरीरात स्वाभाविक उष्णता अधिक असल्याने अधिक उष्णता वाढेल, असे राहणीमान टाळावे. जसे की, रात्री उशिरा झोपणे, खूप तिखट-चमचमीत खाणे, त्रागा करणे, चिडचिड-आरडाओरडा करणे, खूप उपाशी राहणे इ. टाळावे. टाळू थंड राहावा यासाठी शीत द्रव्यांनी सिद्ध तेलाने शिरोडभ्यंग (HEAD MASSAGE) व शिरोपिचू असे उपाय करून घ्यावेत.
व्यसनांमुळे ही अंगातील उष्णता वाढते. मद्यपान, तंबाखूचे व्यसन इ.चे प्रमाण हळूहळू शाळकरी मुलांमध्ये दिसू लागले आहे व त्या व्यसनांच्या अधीन होणे या कोवळ्या वयात सहज शक्य आहे. हे कटाक्षाने टाळणे अत्यंत गरजेचे आहे. या व्यसनांचा त्वचेच्या व केसांच्या आरोग्यावरही अनिष्ट परिणाम निश्चितपणे होताना दिसतो. जेवढ्या लहान वयात व्यसनाधीनता निर्माण होते, तेवढेच त्यातून बाहेर काढणे कठीण. ‘प्रयोग’, ‘गंमत’, ‘उस में क्या हैं’ असा अॅटिट्यूड ठेवून व्यसनाधीन होऊ नये. PEER PRESSURE मध्ये येऊनही व्यवसनांकडे वळू नये. ही जागरूकता शाळाशाळांमधून करायची वेळ येऊ लागली आहे. आरोग्य जतनासाठी केवळ उत्तम आहार व व्यायाम पुरेसा नाही; त्याचबरोबर सकारात्मक वृत्ती व व्यसनांपासून दूर राहणे, हेदेखील फार महत्त्वाचे आहे. (क्रमश:)
वैद्य कीर्ती देव