काश्मीरमध्ये स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी केली हत्या!

एका दिवसापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यावर ही दहशतवाद्यांनी केला होता हल्ला!

    30-Oct-2023
Total Views |
Labourer from UP shot dead by terrorists in Jammu and Kashmir’s Pulwama

नवी दिल्ली
: दक्षिण काश्मीरमधील पुलवामा भागात दहशतवाद्यांनी एका स्थलांतरित मजुराची हत्या केली आहे. मुकेश असे पीडित मजुराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. मजुराचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे. ही घटना दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. दहशतवाद्यांच्या शोधात पोलीस आणि निमलष्करी दलाने परिसराला वेढा घातला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पुलवामाच्या नौपोरा भागातील आहे. सोमवारी येथील तुची परिसरात एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीची ओळख मुकेश अशी केली. उत्तर प्रदेशातून मजूर म्हणून कामावर आलेल्या मुकेशवर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी जखमी मुकेशला सोबत घेऊन रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. वाटेतच मुकेशचा मृत्यू झाला. मुकेशची हत्या दहशतवाद्यांनी केली असण्याची शक्यता आहे. निमलष्करी दलासह पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून सखोल शोधमोहीम सुरू आहे.




याप्रकरणी काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, पोलिसांचे पथक हल्लेखोरांची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. तपास आणि कारवाईसाठी एडीजी स्तरावरील अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तपास पथकाला ठोस पुरावे सापडल्याचा दावा डीजीपी करतात.

दरम्यान उन्नाव जिल्ह्यातील मुकेशची दहशतवाद्यांकडून हत्या करण्याच्या एक दिवस आधी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलीस निरीक्षकाला लक्ष्य केले होते. ही घटना श्रीनगरच्या इदगाह भागात घडली जिथे पोलीस निरीक्षक मसरूर अहमद काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होते. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या मसरूर अहमद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.