‘निरामय’ आरोग्य सेवा देताना...

    30-Oct-2023   
Total Views |
Article on Dr Kshama Deepak Nikam

‘निरामय हेल्थ फाऊंडेशन’च्या माध्यमातून वस्तीपातळीवरील गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणार्‍या विक्रोळीच्या डॉ. क्षमा दीपक निकम. त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...

चिखलात उभ्या असलेल्या, अंगावर एकही कपडा नसलेल्या त्या कृश बालकाच्या अंगावर खंडीभर मैल होता. तो आंबा खात होता. आंब्याचा रस त्याच्या अंगावर निथळत होता आणि त्या रसावर १००च्यावर माशा बसलेल्या. पण, त्या बालकाला जराही सोयरसुतक नव्हते. तो आनंदात होता, एखाद्याला स्वर्ग गवसावाइतक्या आनंदात. या दृश्याने डॉ. क्षमा निकम यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माणूस म्हणून जन्माला आलो, तर आपण आपले जीवन समाजासाठी कारणी लावावे, याची जाणीव करून देणारातो क्षण. डॉ. क्षमा यांनी ठरवले की, आपण आपल्या वैद्यकीय ज्ञान-कौशल्याचा उपयोग गोरगरिबांसाठीच करायचा. मोठ्या कष्टाने आणि संघर्षाने ‘बीए.एम.एस’पर्यंतचे वैद्यकीय शिक्षण आणि त्यापुढे हॉस्पिटल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणार्‍या क्षमा यांनी ठरवले आणि ते व्रत सत्यातही उतरवले.

 आज क्षमा ‘निरामय हेल्थ फाऊंडेशन’च्या ‘सीईओ’ आहेत. त्यांचे पती दीपक हेसुद्धा डॉक्टर असून समाजशील आहेत. त्यामुळे घरदार-कुटुंब सांभाळत क्षमा त्यांच्या सीईओपदाला यथेाचित न्याय देतात. तसे पाहायला गेले, तर वैद्यकीय शिक्षण आणि त्यापुढे वैद्यकीय शास्त्रातला अनुभव, या जोरावर क्षमा यांना डॉक्टर म्हणून कुठेही रूजू होता आले असते. तसेच, स्वत:चा दवाखाना उघडताही आला असता. पण, तळागाळातल्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचायचे आणि त्यांना आरोग्य सुविधा द्यायची, हा ध्यास क्षमा यांना आहे. ‘निरामय फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्या त्यांचे सेवामार्गक्रमण करत आहेत. मुंबईतल्या वस्त्यांवस्त्यांमधल्या युवक-युवतींनाआरोग्य आणि त्याद्वारे जीवनकौशल्य शिकवीत आहे. कुपोषणाबद्दल जागृती व्हावी,म्हणून ‘क्षमा निरामय फाऊंडेशन’तर्फे महाराष्ट्रात कुपोषणाबद्दल जनजागृती करतात. कुपोषित बालकांना आरोग्यदायी आहार उपलब्ध करून देणे, त्याला उपचार मिळूवन देणे त्यासंदर्भातला पाठपुरावा करणे, यासाठी त्या तत्पर असतात.

असो. कोरोना काळातही डॉ.क्षमा यांनी तन-मन-धन अर्पण करून समाजासाठी काम केले. गरजूंना रेशनकिट वाटप असू दे की उपचारासंदर्भात मदत असू दे, डॉ. क्षमा आणि त्यांचे पती डॉ. दीपक मागे हटले नाहीत. तेव्हा क्षमा यांनी ऑनलाईन वैद्यकीय सेवा देणे सुरू केले. या सगळ्याच प्रसंगात आपल्यालाही कोरोना होऊ शकतो,अशी भीती क्षमा यांना वाटली नाही. कारण, त्यांच्या आईबाबांचे संस्कार आणि सासरच्यांचे सहकार्य.

श्रीकृष्ण तोडणकर आणि कविता तोडणकर यांना दोन कन्यारत्ने. त्यापैकी एक क्षमा. श्रीकृष्ण हे मिल मजदूर तर कविता या गृहिणी. मुलींच्या बुद्धिमत्तेचा श्रीकृष्ण यांना खूप अभिमान होता. “मुलगा नसला म्हणून काय झाले, माझ्या मुलीच माझ्यासाठी मुलगा आहेत,” असे श्रीकृष्ण म्हणायचे. वडिलांचा हा विश्वास क्षमा यांना नेहमीच प्रेरणा देई. मात्र, क्षमा इयत्ता नववीत असताना श्रीकृष्ण ज्या मिलमध्ये काम करत, ती मिल बंद पडली. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. इज्जतीने जीवन जगणार्‍या तोडणकर कुटुंबाने या परिस्थितीशी संघर्ष केला. अशावेळी कधीही घराच्या बाहेर न पडलेल्या कविताबाईंनी पदर खोचला आणि त्या गारमेंटमध्ये काम करू लागल्या. आजपर्यंत घरात सगळीच सुबत्ता होती.

आता घरात प्रत्येक गोष्टीला मोजमाप आले. तोडणकर दाम्पत्याने मुलींना कोणतीही झळ लागू दिली नाही. क्षमा यांनीही दहावीला उत्तम गुण मिळवत विज्ञानशाखेत प्रवेश मिळवला. क्षमा यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी श्रीकृष्ण यांनी लग्नात कविताबाईंना मिळालेला पारंपरिक वारश्याचा सोन्याचा हार मोडला. हे पाहून क्षमा यांना खूप वाईट वाटले.त्यावेळी श्रीकृष्ण क्षमाला म्हणाले, ”तुला डॉक्टर व्हायचे आहे. तू मोठी हो, आम्ही रक्ताचे पाणी करू. पण, तुझ्या शिक्षणात कमी पडू देणार नाही.” या घटनेने क्षमा यांना खूप काही शिकवले. इतरत्र कुठेही लक्ष न देता केवळ अभ्यास आणि अभ्यासच करायचा, असे त्यांनी ठरवले.

पुढे क्षमा यांनी ‘बीएएमएस’ला प्रवेश घेतला. या शिक्षणासाठी साडेपाच वर्षं शिकावे लागते. हे शिक्षण घेत असतानाही क्षमा यांना सारखे वाटे की, त्यांच्यासोबतच्या मुली पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन कामाला लागल्या. कुटुंंबाला आर्थिक मदत करत आहेत. मी मात्र अजूनही शिकतेच आहे. याही परिस्थितीमध्ये आईबाबांचे कष्ट पाहून डॉक्टर होण्याची त्यांची जिद्द आणखी वाढे. क्षमा यांनी प्रतिकुल आर्थिक परिस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले पुढे हॉस्पिटल मॅनेजमेंटही शिकल्या. त्यानंतर त्यांना चांगल्या चांगल्या रुग्णालयातून नोकरीसाठी बोलावणे येऊ लागले. काही वर्षं त्यांनी तसे काम केलेही.

पण, त्यांना कळून चुकले की चार भिंतीत बसून रुग्णांना तपासण्यापेक्षा वस्तीपातळीवरील गोरगरीब गरजूंना आरोग्य सेवा देणे यातच त्यांना आत्मिक समाधान मिळते. त्यातूनच त्या ‘निरामय फाऊंडेशन’शी जोडल्या गेल्या. क्षमा म्हणतात, ”वंचित आणि प्रवाहाबाहेरच्या खर्‍या अर्थाने गरजूंची मला आरोग्यसेवा करायची आहे. माझ्या एकटीने काय होणार म्हणून अशा गरजू रुग्णापर्यंत पोहोचणारेअगणित हात उभे करायचे आहेत.” समाजाचे आरोग्य हित साधणार्‍या डॉ. क्षमा निकम यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्या समाजासाठी कार्य करणार्‍या सज्जनशक्तीच्या प्रेरणास्रोत आहेत.
 
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.