मालमत्तेच्याबाबत महिलांना कोणते अधिकार आहेत? वाचा सविस्तर

    03-Oct-2023
Total Views |

law

मुंबई : पती-पत्नीच्या मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणात कोलकत्ता उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाचे म्हणणे आहे की, महिलेला तिची मालमत्ता विकण्यासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही. जर मालमत्ता पत्नीच्या नावावर असेल, तर पतीच्या संमतीशिवाय ती मालमत्ता विकू शकते.

कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हरीश टंडन आणि प्रोसेनजीत बिस्वास यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'पती आणि पत्नी दोघेही सुशिक्षित व्यक्ती आहेत. जर पती पत्नीच्या संमतीशिवाय आपली कोणतीही मालमत्ता विकू शकतो, तर पत्नी देखील पतीच्या संमतीशिवाय तिच्या नावावर असलेली मालमत्ता विकू शकते. त्यामुळे ते क्रौर्याच्या कक्षेत येत नाही.'

महिलांचे मालमत्तेवर काय अधिकार आहेत याबद्दल जाणून घेऊया…
पतीच्या स्वनिर्मित संपत्तीवर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो.

हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम ८ नुसार, पती किंवा सासरे जिवंत असेपर्यंत महिलेला तिच्या सासरच्या वडिलोपार्जित मालमत्तेत कोणताही अधिकार नाही. मात्र पतीच्या निधनानंतर सासरच्या  वडिलोपार्जित मालमत्तेत पत्नीला पतीचा वाटा मिळण्याचा हक्क आहे.

२००५ मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत मुलाप्रमाणे समान अधिकार दिला आहे. तसेच २०२०मध्ये झालेल्या कायदे दुरुस्तीनंतर महिलांना वडिलोपार्जित संपत्तीतही समान अधिकार मिळाले आहेत.

जर आईने स्वत: कोणतीही मालमत्ता घेतली असेल किंवा ती मालमत्ता तिच्या पतीची म्हणजेच मुलीच्या वडिलांची असेल तर ती आईच्या नावावर असते. त्यामुळे जोपर्यंत आई ती संपत्ती मुलीला हस्तांतरित करत नाही तोपर्यंत त्या मालमत्तेवर मुलीचा हक्क राहणार नाही. तर आईच्या मृत्यूनंतर, मुलांना मालमत्तेचा कायदेशीर वारसा मिळेल.
 
जर मुलगी प्रौढ असेल आणि वडिलांशी संबंध ठेवू इच्छित नसेल तर तिच्या खर्चाची जबाबदारी वडिलांची नसते. पण वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा पूर्ण कायदेशीर हक्क आहे. याप्रमाणेच आई-वडिलांच्या विभक्त होण्याने मुलींचे हक्क बदलत नाहीत. उलट वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क सर्व परिस्थितीत संरक्षित आहे.