‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेने गाठली शंभरी

    03-Oct-2023   
Total Views |
Majhe Shahar Love Jihad Mukt Shahar Initiative

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेअंतर्गत ‘संवाद आपल्या कन्यांशी’ या विषयाची १०० वी सभा मंगळवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी मुलुंड येथे झाली. १०० व्या सभेच्या निमित्ताने सभेंसदर्भातल्या अनेक आठवणी मनात रूंजी घालू लागल्या. ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभांच्या त्या आठवणी या लेखात मांडल्या आहेत.

'माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभा घ्यायच्या हे कसे ठरले? तर त्यापाठी एक अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना आहे. गेल्या वर्षी मुंबई चेंबूरमधील नागेवाडी येथे रूपाली चंदनशिवे या २३ वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या तिच्याच ३६ वर्षीय पतीने इकबालने केली. कारण काय तर बौद्ध धर्मीय रूपालीने बुरखा घालण्यास आणि एकंदर इकबालच्या धार्मिक परंपरांना स्वीकारण्यास नकार दिला म्हणून इकबालला राग आला. तत्कालीन महिला बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि कार्यकर्ते तसेच, पत्रकार म्हणून आम्ही घटनेनंतर रूपालीच्या घरी गेलो. ऑक्टोबर महिना असूनही पाऊस कोसळत होता. मुख्य रस्त्यापासून तिच्या घरी जाण्यासाठी २० ते २५ मिनिट चालावे लागेल इतका कच्चा रस्ता होता. गाडी किंवा रिक्षाही जाऊ शकत नाही, असा अरूंद रस्ता. एक छत्रीही उभी पकडू शकत नव्हतो.

इतक्या अरूंद गल्ल्या. त्यामुळे घनघोर पाऊस आणि गुडघाभर चिखलातून मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्यासोबत आम्ही चालत रूपालीच्या घरी पोहोचलो. घरात सगळे नातेवाईक. आईचे दुःख शब्दातीत. ती म्हणत होती रूपालीशी संबंध तोडले नसते, तर ती परत माहेरी आली असती आणि आज जीवंत असती. त्यांचे दुःख पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले. मंगलप्रभात लोढांनी त्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सगळे जण पुन्हा तितकेच चालत गल्लीच्या बाहेर आलो. इतक्यात कुणी तरी म्हणाले, “रूपालीसोबत ‘लव्ह जिहाद’च झाला.” यावर लोढा म्हणाले, “ ‘लव्ह जिहाद’चा बळी घेणार्‍याला शासन होणारच,” असे बोलून ते पुढे गेले. त्यानंतर रूपालीची छोटी बहीण करूणा म्हणाली, ताई मोठे मंत्री साहेब म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ करणार्‍यांना सजा होणार.

पण, माझ्या रूपालीदीदीच्या नवर्‍याचे नाव ‘लव्ह जिहाद’ नाही आणि आमच्या अख्ख्या झोपडपट्टीत ‘लव्ह जिहाद’ नावाचे कुणी राहत नाही. यावर सामाजिक कार्यकर्ता करिष्मा भोसले आणि एकदोघींनी तिला ‘लव्ह जिहाद’ कसा घडतो हे सांगितले. यावर करूणा म्हणाली, ”अरे बापरे हे माझ्या रूपालीदीदीला आधी सांगणारे कुणी असते, तर आज अशी कोंबड्यागत तिची मुंडी चिरली गेली नसती.” थोडक्यात, ‘लव्ह जिहाद’ काय हे त्यांना माहिती नव्हते. पुढे गेलो तिथे हनुमंताचे देऊळ होते. हनुमानजीची भक्त असल्याने दर्शन घेण्यासाठी आत गेले. पूजा करून बाहेर आले, तर गाभार्‍याच्या बाहेर मंदिरामध्ये ७० ते ८० खालाजान, आपाजान, चाचाजान उभे. त्यांचे म्हणणे ”ते मंत्री म्हणाले की, लव्ह जिहाद’ करणार्‍यांना सजा होणार. तुम्ही मीडियावाले आहात ना? खबरदार जर बातमीमध्ये ‘लव्ह जिहाद’ शब्द वापरला तर. असं लिहा की, हे फॅमिली मॅटर आहे. ‘लव्ह जिहाद’ शब्द वापरला, तर याद रखा.” त्यानंतर बराच गदारोळ झाला. तो जमाव अंगावर चालून आला. कसेबसे आम्ही तिथून निसटलो. मंगलप्रभात लोढांना ही घटना कळली आणि तत्काळ त्यांनी चेंबूर पोलीस स्थानकाला या गदारोळासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले.

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयात ही घटना समजली होतीच. संपादक किरण शेलार यांनी माझ्याशी या घटनेविषयी सविस्तर चर्चा केली. रूपाली चंदनिशवेची हत्या ही घटना एकच पण तिच्या घरच्यांना आपली मुलगी ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरली हे माहिती नव्हते. नव्हे, हा शब्दही त्यांना माहिती नव्हता. दुसरीकडे रूपालीच्या मारेकर्‍याचा -इकबालच्या समाजाचे तिथले काही लोक संघटितपणे ‘लव्ह जिहाद’ शब्दाला विरोध करत होते. त्या झोपडपट्टीत हातावरचे पोट घेऊन जगतानाही ते सजग होते. ‘लव्ह जिहाद’ हा शब्द मीडियामध्ये येऊ नये, पोलीस तक्रारीत येऊ नये म्हणून आक्रमक झाले होते. आपल्या समाजात ‘लव्ह जिहाद’बद्दल जागृती नाही हे या घटनेतून समोर आले होतेच. कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिकाचे संपादक किरण शेलार यांनी विचार मांडला की, ”समाजामध्ये ‘लव्ह जिहाद’संदर्भात जागृती झालीच पहिजे. कुणी तरी जागृती करेल आणि आपण त्याची बातमी छापू, लेख छापू यापेक्षा आपणचयासाठी पुढाकार घेतला पाहिजे.” मी विचारले कोण करणार? तर ते म्हणाले कोण म्हणजे तू करणार.

त्यांनतर ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या उपक्रमांची सुरुवात झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, नवी मुंबई या सात शहरांमध्ये किमान २०० सभांचा संकल्प करण्यात आला. दि. ७ जानेवारी रोजी मालवणी मालाड येथे ‘आधारिका महिला’ संस्थेच्या अंतर्गत पहिली सभा झाली. माझ्यासोबत व्याख्यात्या होत्या शीतलताई निकम. त्यानंतर मग सभा होतच राहिल्या. महिन्याला सरासरी दहा या गतीने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत आपल्या १०० सभा झाल्या. प्रत्येक सभेत मी लोकांना विचारले की, ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय माहिती आहे का? तर शेकडो उपस्थितांपैकी चारपाच हात वर झालेले आहेत.

झोपडपट्टी ते कॉर्पोरेट क्षेत्र, तसेच अनेक समाजमंडळांमध्येही हा विषय मांडणी करताना जाणवले की, आताहीलोकांना ‘लव्ह जिहाद’बद्दल जागृती नाही. समाजात फिरताना मला एकच जाणवले की, खरेच आपला समाज भोळा आहे सहिष्णू आहे. आपल्यासोबत काही वाईट होणार नाही या आशेतच जगतोय. मात्र, प्रत्येक गावात किमान सहा ते आठ घरी ‘लव्ह जिहाद’चा बळी गेलेली मुलगी आहेच आहे. असे जरी असले तरी प्रत्येक सभेत किमान आठ ते दहा महिला माझ्यासोबत जोडल्या गेल्या. ज्यांना ‘लव्ह जिहाद’विरोधात काम करायचे आहे. सभेनंतर अनेक किशोरवयीन मुली किंवा पालकांनी ‘लव्ह जिहाद’च्या घडलेल्या घटनांची माहिती दिली आहे. या सभा घेतल्यामुळे महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात समाज सोबत आला आहे. लोकांनी दिलेले प्रेम, घेतलेली काळजी याबद्दल तर माझ्याकडे शब्दच नाहीत.

असो, सभा घेताना अनेकदा विपरित अनुभवही आले. एकदा काय झाले? तर नाशिकमध्ये ज्यांनी सभा ठेवली होती त्यांना संभाजी ब्रिगेडवाल्यांच्या नावाने फोन आला होता की तुम्ही ही सभा घेऊ नका. त्याने दंगल माजू शकते. मात्र, सभा का आवश्यक आहे हे मी त्या आयोजकांना समजावले आणि सभा झाली. नवी मुंबई येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभा आयोजित केली. पहिल्याच ६०-७० खुर्च्यांवर बुरखाधारी महिला. ‘हमको भी सुनना हे’ म्हणत तिथेच बसून राहिल्या. विशेष म्हणजे त्यांना कुणीही बोलावलेले नव्हते.त्या का आल्या होत्या? सगळ्यांनाच प्रश्न पडला. सभा व्हायलाच पाहिजे म्हणून मी विषय मांडला. ”मुली सगळ्यांना असतात. हिंदूंची असो की मुस्लीमची. ती बापाच्या काळजाचा तुकडा असते. आफताब पुनावाल्याने ज्या श्रद्धा वालकरचे ३६ तुकडे केले ती पण कुणाची तरी मुलगी होती. श्रद्धाच्या जागी सलमा असती आणि आफताबच्या जागी अक्षय असता तरी आम्ही हेच म्हणालो असतो की, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे जीवन बरबाद करणार्‍यांना शिक्षा व्हायला पाहिजे. ‘बेहनो आप क्या बोलते हो.” यावर समोर बसलेल्या बुरख्याधारी महिलांनी टाळ्या वाजवल्या.

‘सही है सही है’ असे त्या म्हणू लागल्या. तर चेंबूरच्याच आचार्य महाविद्यालयामध्ये ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभा घेण्याचे ठरले त्यावेळी प्राचार्य विद्यागौरी लेले म्हणाल्या, “आमच्या इथे मुस्लीम समाजाच्या मुलीही आहेत. त्यांनीही हा विषय ऐकायला हवा. त्यासाठी विषयाचे नाव थोडे बदलूया का?” मग ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ नावाऐवजी ‘संवाद आपल्या कन्यांशी’ हे नाव घेऊन काही मजकूर बदलत त्या महाविद्यालयात सभा सुरू झाली. व्याख्यानाला उभे राहिले समोर पाहिले, तर २०० मुलींपैकी १०० एक तरी बुरखा परिधान केलेल्या मुली. हॉलच्या खिडकीतून बाहेर पाहिले, तर दाढी आणि टोपी घातलेलेत्यांचे पालक बाहेर उभे राहून सभा एकत होते. मी प्रश्न उपस्थित केला, ”मुलगी मग कुणाचीही असो कुणी तिचे तुकडे करून सुटकेस किंवा फ्रिजमध्ये टाकण्यासाठी किंवा दिल्लीतल्या साक्षीसारखे २० वेळा पाठीपोटात चाकू खूपसून क्रूरपणे मरण्यासाठी तिचे आईबाप तिला जन्माला घालत नाहीत. मुली आईबाबांच्या राजकुमारीच असतात. नाव लपवून,धर्म लपवून मुलींची फसवणूक करून त्यांचे जीवन बरबाद करणारे सैतानच आहेत. या सैतानांपासून रोखण्यासाठी मुलींमध्ये जागृती असणे गरजेचे आहे की नाही?”

या प्रश्नावर सगळ्याच धर्माचे आईबाबा काय उत्तर देणाार‘? हो, गरजेचे आहे हे प्रत्येक आईबाबाचे उत्तर असणार आणि आहेच. तर ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभा ठरलेल्या सात शहरांव्यतिरिक्त रत्नागिरी, धुळे, अहमदनगर आणि जळगावलाही झाल्या. रत्नागिरी येथे १५ हजार लोक उपस्थित होते, तर जळगावमध्ये सकल जैन समाजाने ठेवलेल्या सभेत जवळजवळ तीन हजार जैन बंधु भगिनी उपस्थित होते. १०० सभांच्या माध्यमातून आपण आजपर्यंत लाखो माणसांपर्यंत पोहोचलो. येत्या काही महिन्यात आणखीन १०० सभा होतील आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चा २०० सभांचा संकल्प पूर्ण होईल. आपल्या शहरातच नव्हे, तर ज्ञातअज्ञात कुठेही कोणाचीही लेक ‘लव्ह जिहाद’चा बळी होऊ नये, हीच इच्छा!

Majhe Shahar Love Jihad Mukt Shahar Initiative

१०० सभा घेऊन लाखो लोकांपर्यंत लव्ह जिहाद या विषयाचे गांभिर्य पोहचवू शकले याची श्रेय दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सगळ्या टीमला आहे. माझे संघ स्वयंसेवक बंधु सुमंत दादा आमशेकर, विठ्ठल दादा कांबळे आणि संजय दादा नगरकर यांचे पाठबळ मी विसरू शकत नाही. मंगल प्रभात दादा लोढा यांचेही सहकार्य तर शब्दातीत. कारण लव्ह जिहाद विरोधात बोलते म्हणून काही समाजकंटक व्यक्ती आणि संघटना यांनी छुप्या तर उघड उघड धमक्या दिल्या होत्या. मात्र सभा सुरक्षित आणि वेगात व्हायला हव्यात, यासाठी मोठ्या भावाच्या मायेने मंगल प्रभात दादांनी मसुरक्षिततेसाठी मला महिला अंगरक्षक आणि प्रवासासाठी वाहन व्यवस्था म्हणून चालकसह कार उपलब्ध करून दिली. त्यामुळे एकाच दिवसात मुंबई, नवी मुंबई ते नाशिक अशा तीन ते चार सभा मी करू शकले. दै. मुंबई तरूण भारतचा माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर अभियान हे आता लोकअभियान झाले आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाचेही आभार!

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.