डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपयाची होणारी घसरण रोखण्यासाठी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने मागच्या एका वर्षांत मोठ्या प्रमाणात डॉलर्सची विक्री केली. तरीही भारतीय रुपयाने डॉलर्सच्या तुलनेत ८३ रुपयांचा निच्चांक गाठला. याउलट तालिबानच्या अधिपत्याखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या अफगाणी चलनाने सप्टेंबरच्या तिमाहीत जगातील सर्वांत चांगली कामगिरी करणार्या चलनाचा चक्क मान मिळवला. मागच्या तीन दशकांपासून गृहयुद्ध सुरू असलेल्या या देशाने केलेली ही कामगिरी नक्कीच आशादायक आहे की नुसती आकडेबाजी, हे यानिमित्ताने पाहणं गरजेचे ठरावे.
आजही जगातील जवळपास ९० टक्के आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये चलन म्हणून अमेरिकन डॉलर्सचेच वर्चस्व. कोरोनानंतर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे अमेरिकन डॉलर्सच्या मूल्यात गरजेपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळे जगभरातील गरीब आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना याचा फटका बसला. पण, अफगाणिस्तानचे अफगाणी हे चलन याला अपवाद ठरले. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत अफगाणी हे चलन जगभरातील अन्य चलनांपेक्षा चांगली कामगिरी करणारे चलन ठरले. दि. २६ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, सध्या अफगाणीचे डॉलरच्या तुलनेत मूल्य ७८.२५ इतके आहे, म्हणजे एक डॉलर आणि ७८.२५ अफगाणिस्तानची किंमत समान.
याचवेळी भारतीय चलनाबद्दल बोलायचे झाल्यास, डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य ८३.२७ इतके. याचा अर्थ अफगाणी चलन आजघडीला भारतीय रुपयापेक्षा सुस्थितीत आहे. विनिमय दरानुसार एक अफगाणी १.०६ रुपयाला मिळत आहे. सप्टेंबर तिमाहीत अफगाणीचे मूल्य नऊ टक्क्यांनी वाढले आहे, जे जगातील इतर कोणत्याही चलनापेक्षा जास्त आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यापासून अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तानवर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले. या आर्थिक निर्बंधांमुळे अफगाणिस्तानचा परकीय चलनसाठा देखील अमेरिकेने गोठवला. याचा मुख्य उद्देश हा तालिबानचा वित्त पुरवठा रोखण्याचा आहे. पण, अफगाणिस्तानच्या परकीय चलन गोठवणार्या पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवीय मदतसुद्धा केली आहे.
सध्या अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी परदेशी मदत हा सर्वांत मोठा घटक ठरताना दिसतो. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. तेव्हापासून, एकट्या संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानला ५.८ अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. त्यापैकी चार अब्ज डॉलर्स फक्त २०२२ साली देण्यात आले. त्यासोबतच अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्मीळ खनिजांचा खजिना आहे. या खनिजांच्या व्यापारातूनही अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते. त्यामुळे अफगाणी हे जगातील सर्वांत चांगली कामगिरी करणारे चलन ठरले आहे.
परंतु, याचा अर्थ अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारली, असा अजिबात नाही. तालिबानी राजवट आल्यापासून अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावलेलीच. चार कोटी लोकसंख्येच्या अफगाणिस्तानमधील तीन कोटी नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या विविध आंतराराष्ट्रीय संघटना अफगाणिस्तानमधील ९० लाख लोकांना आर्थिक मदत देत आहेत. २०२३ मध्ये अफगाणिस्तानच्या काही भागात पूरजन्य परिस्थितीही उद्भवली, तर काही भागात लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.
पण, इस्लामिक कट्टरपंथी तालिबानला अफगाणिस्तानच्या सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. अफगाणिस्तानमधील तालिबानी शासन सध्या अमानवीय अशा ‘शरिया’ कायद्याची कठोर अंमलबजावणीत मश्गूल दिसते. सप्टेंबर २०२१ ते मे २०२३ या कालावधीत तालिबानने केवळ महिलांविरोधात सुमारे ५० फतवे जारी केले आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान दहशतवादी संघटनांचे सुरक्षित आश्रयस्थान ठरताना दिसते. इस्लामिक कट्टरवाद किती धोकादायक ठरू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान. म्हणूनच वेळीच अफगाणिस्तानकडे लक्ष न दिल्यास तालिबान जगासाठी दहशतवादाचा भस्मासूर ठरू शकतो.