धूळ प्रदुषण रोखण्यासाठी लाखो लिटर पाण्याची फवारणी करणार
29-Oct-2023
Total Views |
मुंबई : दादर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. या प्रदुषणावर मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील ३५ रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी दररोज या मैदानावर फवारण्यात येणार असून धुळीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यामुळे हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण कमी होईल.
२०२१ मध्ये पालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये तुषार सिंचन प्रणाली प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत पर्जन्य जल पुनर्वापर प्रणालीच्या माध्यमातून ३५ नवीन रिंग विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. तरी, मैदानामध्ये प्रतिदिन पाणी फवारण्याकरीता सुमारे २ लाख ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. याकरता ३५ रिंगवेलमधील पाण्याचा वापर करुन संपूर्ण मैदानात पाणी फवारण्यात येणार आहे. त्यासोबतच मैदानावरील हिरवळीचे प्रमाण वाढवण्यासाठी महानगरपालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.
तसेच धुळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी लवकरच तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करणार आहेत. ही समिती पर्यावरण, इमारत बांधकाम, पावसाचे पाणी साठवणे आणि वारसा जतन यांसारख्या गोष्टींमधून प्रदुषण कमी होण्यासाठी प्रयत्नशील असतील.