‘सरदार ऑफ द स्पिन’ पॅव्हेलियनमध्ये परतला!

    29-Oct-2023
Total Views |
Article on Cricket Legend Bishan Singh Bedi

सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे स्वतः हिमाचल प्रदेशातील धरमशाळा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ‘एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धे’तील महत्त्वपूर्ण, अशा साखळी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करत होते. एकीकडे धरमशाळा येथे सारे असे आनंदात असताना क्रिकेटविश्वात दुसर्‍या बाजूला भारताचे दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाल्याची निधनवार्ता येऊन धडकली. ‘सरदार ऑफ द स्पिन’ पॅव्हेलियनमध्ये कायमचा परतला! त्यानिमित्ताने बेदी यांच्या क्र्रिक्रेटमधील कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...

२५ सप्टेंबर १९४६ला अमृतसरला जसा हा ‘पंजाबदा पुत्तर’ जन्माला आल्यावर मोठा होत गेला, तसतसे त्याचे आणि चेंडूचे नात शेवटच्या क्षणापर्यंत घट्टच राहिले होते. देश-विदेशातील त्यांच्या चाहत्यांच्या भाषेत सांगायचे झाले, तर ’मास्टर ऑफ फ्लाईट, लूप अ‍ॅण्ड स्पिन’ असलेला जगन्मित्र आज आता आपल्यात नाही. भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे बेदींची आठवण काढत, त्यांना आदरांजली जेव्हा वाहत होते, तेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीची तसेच धरमशाळा येथील स्टेडियमचीही आठवण येत होती. त्यात ते सांगत होते की, ”बिशनसिंग बेदी जेथे स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अथवा (कॅम्पसाठी) प्रशिक्षण वर्गांसाठी जात, तेव्हा बेदी स्वतःदेखील स्टेडियमच्या ड्रेसिंग रुममध्येच निवासाला प्राधान्य देत असत.” अनुराग ठाकूर हे ज्या पंजाबच्या संघाकडून ‘रणजी’सारख्या स्पर्धेत खेळत, त्या चमूलाही बेदींनी मार्गदर्शन, प्रशिक्षण दिलेले त्यांना आठवत होते.

’पॅव्हेलियन’मध्ये परतलेले सरदार

बलबीर सिंग (थोरले), मिल्खा सिंग या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांतल्या ’पाजीं’ची नावं आजच्या पिढीच्या कानावर फार कमी वेळा पडली असतील. या सरदारांपैकी बलबीर सिंग (थोरले) हे मेजर ध्यानचंद यांच्यानंतर लोकप्रिय झालेले भारतीय हॉकीचे तत्कालीन कर्णधार तसेच त्यांच्या स्वतःच्या तीन सुवर्णपदकानंतर भारताला पुन्हा एकदा सुवर्ण मिळवून देणार्‍या संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक. त्या नावापाठोपाठ येणार्‍या ’पाजीं’च्या क्रीडा नामावलीत नाव होतं-मिल्खा सिंगचे. बलबीर सिंग आपल्याला दि. २५ मे २०२० रोजी, तर मिल्खा सिंग दि. १८ जून २०२१ रोजी सोडून गेले. हॉकी, धावणे या क्रीडा प्रकारांनंतर आता पाळी आली होती ती क्रिकेटची. आता नुकतेच दि. २३ ऑक्टोबर २०२३ला पॅव्हेलियनमध्ये गेलेले ’पाजी’ बिशन सिंग बेदी. या बेदी ’पाजीं’ना असलेल्या चार अपत्यांपैकी एकही जण क्रिकेटच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रात उतरलेले नाही. थोरला पुत्तर अंगद आणि अंगदची पत्नी नेहा धुपिया ही जोडी तेवढी चित्रपट क्षेत्रातच असल्याने लोकांना सुपरिचित आहे. अशा भारतीय क्रीडाक्षेत्रातला एक सरदार अर्थात आत्मचरित्रकार असलेल्या ’सरदार ऑफ द स्पिन’च्या भारताचा महान खेळाडू असलेल्या भारतीय फिरकी गोलंदाजीच्या सुवर्णयुगातील अग्रणी असलेल्या सरदाराचे बिशनसिंग बेदींचे आपण आज स्मरण करत आहोत.

फिरकीच्या सरदाराचा धावता जीवनपट

एरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस वेंकटराघवन या तीन दाक्षिणात्यांबरोबर नावारुपाला आलेला बिशनसिंग बेदी हा उत्तर भारतीय पंजाबी सरदार, अशी ही भारतीय फिरकी गोलंदाजीची महान चौकडी क्रीडाक्षेत्रात १९६०-७० सालापासून एकत्र खेळत सुप्रसिद्ध झाली. अमृतसरमध्ये १९४६ला जन्मलेल्या फिरकीपटू बेदी यांनी देशांतर्गत दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. बिशनसिंग बेदींनी १९६६च्या डिसेंबरात कोलकात्त्याच्या ईडन गार्डन्स येथे आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली, तर १९७९च्या ऑगस्ट-सप्टेंबर या काळात ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. दुसरीकडे बेदींचा पहिला एकदिवसीय सामना १९७४च्या जुलैत लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध खेळला गेला, तर शेवटचा एकदिवसीय सामना १९७९च्या जूनमध्ये मँचेस्टर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला. भारतीय क्रिकेट संघ आज तिसर्‍यांदा ‘विश्वचषका’वर नाव कोरण्यासाठी खेळत असताना, त्यावेळी भारताच्या पहिल्या एकदिवसीय विजयात बिशनसिंग बेदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे आपण ध्यानात ठेवायला हवे.
 
या सरदाराने इंग्लंड, पाकिस्तानच नव्हे, तर अनेक देशांचे (क्रिकेटच्या)युद्धात बळी मिळवत भारताचा तिरंगा फडकवत ठेवला आणि असे असूनदेखील पाकिस्तानसकट त्यांच्यापैकी कोणीच बेदींचे शत्रू झाले नाहीत, तर उलटपक्षी सगळेचजण त्या सरदाराचे चाहते, प्रेमी, स्नेही होत राहिले. गेल्याच वर्षी बेदी सहपरिवार पाकिस्तानातील करतारपूरच्या शिखांचे धर्मस्थान असलेल्या गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी तसेच फाळणीमुळे ताटातूट झालेल्या त्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रपरिवाराची भेट घेण्यासाठी आजारपणातही डॉक्टरांची परवानगी घेऊन व्हिलचेअरवर एक दिवसासाठी पाकिस्तान व्हिसा घेऊन जाऊन आले होते. बेदी हे तिथे आल्याचे समजताच, पाकिस्तान क्रिकेटमधील त्यांचे समवयस्क त्यांना भेटायला आले होते. त्या भेटीच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या पाकिस्तानी चाहत्याने की, जो तिकडचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे, त्यानेदेखील पाकिस्तानी चाहत्यांच्यावतीने बेदींच्या आठवणींखातर पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे की, “खुदा हाफिज दोस्त. मीदेखील तिकडे येतोच आहे. तोपर्यंत माझ्यासाठीदेखील तिथे सरबताचा एक पेला भरून राखून ठेव. जल्द ही मिलते हैं.”

क्रिकेटपटूंना भावलेला बेदी
 
भारतीय क्रिकेटचा दिग्गज काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी बेदी यांना विविध माध्यमांतून श्रद्धांजली वाहिली. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील खास चारोळ्या लिहित, या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. सचिन तेंडुलकरने पदार्पण केल्यानंतरच्या न्यूझीलंड व इंग्लंड दौर्‍याचे बेदी संघ व्यवस्थापक होते, ते त्याच्याशी स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवत असत. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, कपिल देव, रवी शास्त्री, कृष्णाम्माचारी श्रीकांत या ’विश्वचषक’ विजेत्या क्रिकेटपटूंनी जेव्हा बिशनसिंग बेदींला आदरांजली वाहिली, तेव्हा त्यात दिलीप वेंगसरकर हेदेखील नाव होते. वेंगसरकर जेव्हा भारतातर्फे न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार्‍या १९७६च्या संघात निवडला गेला होता, तेव्हा वेंगसरकर १९ वर्षांचा होता आणि त्या संघाचे कर्णधार होते-बिशनसिंग बेदी. बेदींच्या कर्णधारपदाखाली खेळणार्‍या वेंगसरकरचा, तो पहिलाच विदेश दौरा होता. त्याबद्दल तेव्हा बेदींचे विचार प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंची नाव ऐकूनच अनेकांना घाबरायला होतं. पण, आपण बिलकूल घाबरायचे नाही. हेडली बंधू, ग्लेन टर्नर, विव्हियन रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉईड अशा नावांच्या कोणाचेही दडपण घ्यायचे नाही. एक लक्षात ठेव की, मैदानात उतरले की सगळे एकसमानच असतात. आपली तुलनादेखील त्यांच्याशी करायची नाही. आपली तुलना आपल्याच खेळाशी करायची, असे होते. आपल्या पुरुषांसाठी बेदी जेवढ्या पद्धतीने गुरुमंत्र देत संघाला धीर देत असत, तसेच बेदी महिला संघातील खेळाडूंचाही उत्साह वाढवित असत. तत्कालीन महिला क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या डायना एडल्जी हिनेदेखील बेदींला आदरांजली वाहताना, असे सांगितले आहे.

गावसिंदरसिंग

बिशनसिंग बेदींना सुनील गावसकरांची फलंदाजी प्रचंड आवडायची, तो त्यांच्यावर सदा खुश असे आणि एवढेच नव्हे, तर बेदी हे गावसकरांचा आदर करत असे. त्याचे उदाहरणच द्यायचे झाले, तर ऑस्ट्रेलियन असलेल्या बिशनसिंग बेदींच्या त्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या पुत्राचे नाव गावसकरच्या नावावर ठेवत ’गावसिंदरसिंग असे ठेवले होते,’ हे देता येईल.

फलंदाज बेदी
 
गोलंदाजीचा सरदार असलेल्या बेदींचा फलंदाज म्हणून दबदबा कधी आढळून आला नसला तरी न्यूझीलंड विरुद्धच्या कानपूर कसोटीत अर्धशतक झळकाविण्याचा पराक्रम त्यांनी केला. कसोटी क्रिकेटमध्ये बेदींसह इतर फिरकीपटू तळाला खेळायला येत असत. साहजिकच त्यांच्याकडून धावांची फारशी अपेक्षा कोणाचीच नसे.

बेदींचा स्पष्टवक्तेपणा
 
शांत चित्ताने प्रतिस्पर्धी फलंदाजाला घाम फोडणारे बेदी हे स्पष्टवक्तेपणाबद्दलही प्रसिद्ध होते. जे पटत नाही, ते ताडकन बोलून मोकळे व्हायचे किंवा इतरांना पटो न पटो, स्वतःला योग्य वाटणारा निर्णय तडकाफडकी घेऊन टाकायची त्यांची कार्यपद्धती होती. १९७८च्या पाकिस्तान दौर्‍यात पाकिस्तान संघासह पंचांचा रडीचा डाव पाहून त्यांनी सामना अर्ध्यावर सोडून देण्याचे धारिष्ट्य दाखविले होते. पाकिस्तानी सर्फराज नवाझने एका मागोमाग एक असे चार उसळी घेणारे चेंडू (बाऊन्सर) टाकूनही पंच मख्ख राहिल्याने १४ चेंडूंत अवघ्या २३ धावांची गरज आणि हातात आठ विकेट्स असताना आपल्या फलंदाजांना माघारी बोलावून बेदी यांनी तो सामना पाकला ‘भेट’ दिला. यावर बरेच काहूर माजले होते. परंतु, आपण घेतलेला निर्णय तत्कालीन परिस्थितीला अनुरूप होता, असे बेदींनी ठणकावून सांगितले होते.

एक सुमधूर सरगम...

चाहत्यांच्या पिढ्या बदलल्या. पण, क्रिकेटवरचे भारतीयांचे प्रेम मात्र पिढ्यान्पिढ्या वाढते राहिलेले आहे. हल्ली भारतातच क्रिकेटचे सामने होत असतात, त्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद प्रत्येक सामन्यागणिक पाहायला मिळत असतो. पूर्वी कुठल्याही देशाचा कुठलाही फलंदाज असो, बेदी-चंद्रा-प्रसन्ना-व्यंकटराघवन ही चौकडी त्यांच्या नाकी नऊ आणत असे. डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि त्यात फ्लाईट, हळूच फसवे चेंडू टाकणे ही बेदींची खासियत होती. लयबद्ध पावले टाकत ’राऊंड द विकेट’ गोलंदाजी करताना बेदींला बघणे, हा अनुभव घेणे म्हणजे सुमधूर सरगम ऐकण्यासारखे असे. बेदींच्या उमेदीच्या काळात संघातला जबाबदार घटक म्हणून असो अथवा खेळातून निवृत्ती घेतल्यावर पुढची पिढी घडवण्यासाठी संघ प्रशिक्षक म्हणून, संघ व्यवस्थापक म्हणून, सल्लागार म्हणून शेवटपर्यंत क्रिकेटशी तो समर्पितच राहिला. बेदींसारख्या व्यक्तीमुळे भारत आज विजेता दिसत आहे. बेदींनी फक्त गोलंदाजच घडवले नाहीत, तर वेंगसरकरसारख्या फलंदाजांनाही घडवले.

कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, हरभजनसिंग, प्रज्ञान ओझा, अनिल कुंबळे हे आजकालसारखे फिरकी गोलंदाज आपल्याकडे आहेत. असे गोलंदाज असले तरी बेदींची तुलना इतर फिरकी गोलंदाजांशी होणे अवघडच आहे. खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी फलंदाजांना बेदींची गोलंदाजी ओळखताच येत नसे. हातामध्ये सुटलेला चेंडू कोणत्या दिशेने जाईल, हे त्यांना समजत नसे. त्यामुळे स्वीप खेळायचे की, सामान्य फटका मारायचा अशा द्विधा मनस्थितीत ते असत. त्यामुळे फलंदाजांची उडणारी तारांबळ बघायची असेल तर, त्यासाठी बेदींसारखीच गोलंदाजी बघायला मिळाली पाहिजे आणि असे गोलंदाज भारतात सदा दिसले, तर बेदींवरती देखील खुश होईल.

बेदींनी घेतले होते आक्षेप

बिशनसिंग बेदी हे १९७६-७७ साली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते, तेव्हा इंग्लंडचा क्रिकेट संघ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यातील एक गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत होता. तो गोलंदाज स्वतःच्या भुवयांना व्हॅसलिन लावत असे. तसेच तो व्हॅसलिन चोपडलेली पट्टी लावून तेथील व्हॅसलिन चेंडूला लावत असे की, जेणेकरून त्याच हाताने केलेल्या गोलंदाजीने तो चेंडू आपल्याला हवा तसा स्विंग (फिरकी) करताना सोपे होत असे. असेच अजून एक प्रकरण होते, त्यात बेदींनी इंग्लिश गोलंदाजांवर ‘चेंडू कुरतडल्याचा’ अर्थात ‘बॉल टेम्परिंग’चा आरोप केला होता. हे जेव्हा बेदींच्या ध्यानात आले, तेव्हा त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि जगभर ते प्रकरण प्रसिद्ध झाले होते. बेदी यांच्या सजगपणामुळे ’बॉल टेम्परिंग’सारखं काही असतं, हेदेखील सगळ्यांना समजायला लागले. बेदींची गोलंदाजी माझ्यासारख्या पिढीला बघायला मिळणे, हे क्रीडा रसिकांचे भाग्यच म्हणायला लागेल.

स्वयंशिस्त व व्यायामप्रिय

शिस्त आणि स्वावलंबन यांचा भोक्ता असलेला बेदी हे रोज स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. त्याबद्दल बेदी हे अभिमानाने सांगत असे की, ”फिरकी गोलंदाजांची बोटे ही लवचिक असावीत, म्हणून कपडे धुण्याचा हातांना मिळणारा व्यायाम महत्त्वाचा आहे.” एका कसोटी सामन्यात पाऊस पडत असताना, जर खेळ बंद पडत असे म्हणून संघ व्यव्यवस्थापक नसलेल्या बेदींनी खेळाडूंना स्वस्थ बसून न देता त्यांनी कार्यरत राहावे म्हणून स्टेडियममधून बाहेर काढत सगळ्यांना धावण्याचा सराव करायला भाग पाडले होते. असे ते व्यायामप्रिय होते.

सध्या क्रिकेटचे सामने चालू आहेत. षटके टाकलेली बघताना सगळ्यांनाच चंद्रा-बेदी-प्रसन्ना व वेंकटराघवन या चौकडीची आठवण येत राहणारच. त्यातील क्रिकेटविश्वातला सरदार बेदी व्यंकटेशाचरणी प्रसन्न चित्त राहो आणि आमच्या मनात सतत चंद्राप्रमाणे कोजागरीच्या पौर्णिमेसारखा वास करत राहो, ही आपण वाहे गुरूंकडे प्रार्थना करत म्हणू ’सत् नाम वाहे गुरू की...’

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी हॉकीपटू आणि खेलकूद आयाम प्रमुख, जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आहेत.)
९४२२०३१७०४