पाकिस्तानी लष्कराचा कठपुतळीचा खेळ

    28-Oct-2023
Total Views |
Nawaz Sharif PM political triumph only if the country’s military establishment

नवाझ शरीफ यांच्याकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. अर्थात, नवाझ शरीफ पंतप्रधान झाल्यावर त्यांचा लष्कराशी किती काळ मधुचंद्र चालतो, यावर बरेच अवलंबून आहे. लष्कराने कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानाला त्याचा पूर्ण सत्ताकाळ लाभू दिलेला नाही. पंतप्रधानाने थोडेही धोरण स्वातंत्र्य घेतले की, त्याला लष्कर पदच्च्युत करते. त्यामुळे नवाझ शरीफ हे लष्कराला उसंत मिळण्यापुरते पंतप्रधान असू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

पाकिस्तानात लष्कराचा कठपुतळीचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. ज्या नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून हाकलण्यासाठी इमरान खान यांना आणले होते, त्याच इमरान खान यांना हाकालण्यासाठी आता नवाझ शरीफ यांना आणण्यात येत आहे. नवाझ शरीफ हे पाकिस्तानात आतापर्यंत एक आरोपी होते. पण, आता त्यांना आरोपमुक्त करण्याची तयारी चालू आहे, तर जे इमरान खान लष्कराची लाडके होते, त्यांना आता आरोपी करण्यात आले आहे. लवकरच पाकिस्तानात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी लष्कराची इच्छा नसली तरी त्याला हे लोकशाहीचे नाटक करावे लागते व निवडणुका घ्याव्या लागतात, त्यामुळे निवडणुकांचे हे नाटक ठरल्याप्रमाणे पार पडेल. इमरान खान यांना या निवडणुकीसाठी अपात्र ठरवावे लागेल. कारण, ते बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत व निवडणुकीला उभे राहिले, तर निवडून येण्याची खूपच शक्यता आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर आतापर्यंत अपात्र असलेल्या नवाझ शरीफ यांना निवडणुकीसाठी पात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे यथावकाश निवडणुका होऊन नवाझ शरीफ पंतप्रधान होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

लोकशाही नको, नवाझ, इमरान किवा झरदारी हे पंतप्रधान नकोत, असे लष्कराला वाटत असले तरी त्यांची मदत घेतल्याशिवाय लष्कराला देश चालवता येत नाही. लष्कराने आपली सत्ता स्थापण्याचे दिवस आता सरले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय समुदाय लष्करी सत्तेला नैतिक मान्यता देत नाही. शिवाय पाकिस्तानी लष्कराला देशाचा कारभार चालवता येत नाही आणि त्यात रसही नाही. लष्कराला फक्त देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण आणि लष्करी अधिकार्‍यांच्या सेवेत असताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरचे ऐषोरामी जीवन यात रस आहे. पाकिस्तानसाठी लष्कर नाही, तर लष्करासाठी पाकिस्तान आहे, असे कुणीतरी म्हटले आहे, ते सत्य आहे.

त्यातच सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती तोळामासा झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे. लोकांची सहनशीलता संपून कधी क्षोभ होईल, सांगता येत नाही. इमरान खान यांना पदच्च्युत केल्यानंतर जो लोकक्षोभ झाला, तो पाकिस्तानी लष्करासाठी एक धक्का होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लष्कराने थेट सत्ता हाती घेणे, म्हणजे बैलाला अंगावर घेण्यासारखे आहे. त्यामुळे लष्कराने अगदी विचारपूर्वक नवाझ शरीफ यांना गादीवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाझ शरीफ हेही लोकप्रिय राजकारणी आहेत. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. अरब जगताशी विशेषतः सौदी अरबी नेत्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सौदीने अलीकडे पाकिस्तानला आर्थिक मदत देणे बंद केले आहे. शरीफ सत्तेवर आले, तर तेही मदत सुरू करू शकतील.

पाकिस्तानी लष्कराचे अफगाणिस्तानशी संबंध बिघडलेले आहेत. शरीफ सत्तेवर आल्यास, ते सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे. गेली काही वर्षे भारताने पाकिस्तानशी अत्यंत जुजबी संबंध ठेवले आहेत. दोन्ही देशांतील संवाद पूर्णपणे बंद आहे. इमरान खान प्रशासनाशी संबंधच ठेवायचे नाहीत, असा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. पण, नवाझ शरीफ व मोदी यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. शिवाय शरीफ यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत भारतीय नेत्यांशी उत्तम संवाद ठेवला होता. विशेषतः भाजप सरकारचे पंतप्रधान वाजपेयी व मोदी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत. शरीफ पुन्ह सत्तेवर आले तर भारताशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकेल. पाकिस्तानी लष्कराला सध्या भारताशी सुसंवाद ठेवणे आवश्यक वाटते. याचे एक कारण म्हणजे, भारताशी निर्माण होऊ शकणार्‍या तणावाला तोंड देण्याची क्षमता लष्करामध्ये सध्या नाही. देशच आर्थिक अडचणीत असल्यामुळे पाकिस्तानला युद्ध परवडणारे नाही. भारताने उद्या एकतर्फी सीमेवर गोळीबार सुरू केला, तर ते लष्कराला परवडणारे नाही.
 
दुसरीकडे देशातच बलोच बंडखोर, पाकिस्तानी तालिबान यांनी दहशतवादी हल्ले सुरू केले आहेत व त्यात अनेक सुरक्षा सैनिकच नाही, तर पाकिस्तान-चीन आर्थिक महामार्गावर काम करणारे चिनी कर्मचारीही ठार होत आहेत. अफगाणिस्तानबरोबर सीमासंघर्षही अधूनमधून उफाळून येत असतो. त्यामुळे लष्कर अंतर्गत समस्यांमध्ये गुरफटले आहे. परिणामी, लष्कराला सध्या भारताबरोबर सीमेवर तरी संघर्ष नको आहे.
 
नवाझ शरीफ हे भारताशी आर्थिक व व्यापारी संबंध स्थापावेत, या मताचे आहेत. त्याशिवाय पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही, असे त्यांचेच नाही, तर अनेक पाकिस्तानी तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करावे, असा सौदी अरब व अमेरिका यांचाही पाकवर दबाव आहे. हे दोन्ही देश भारत, आखाती देश, इस्रायल व युरोप अशा आर्थिक महामार्गाचे प्रमुख भागीदार आहेत. हा मार्ग अधिक सुकर करायचा असेल, तर त्यात पाकिस्तान असला पाहिजे, असे या देशांना वाटते व ते भारताच्याही फायद्याचे आहे.

पाकिस्तानचे याआधीचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी भारताशी व्यापारी संबंध स्थापण्याचे सूतोवाच केले होते. पण, इमरान खान यांनी त्याला विरोध केला व ते प्रयत्न हाणून पाडले होते. त्यामुळे बाजवा त्यांच्यावर नाराज होते. पण, आता इमरान खान यांचा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे लष्कराची इच्छा असेल तर नवाझ शरीफ भारताशी आर्थिक संबंध स्थापित करण्यात नक्कीच पुढाकार घेतील. नवाझ शरीफ देशात परतल्यानंतर त्यांनी जी पहिली जाहीर सभा लाहोरमध्ये घेतली, तिला तुफान गर्दी झाली होती, या सभेत त्यांनी शेजारी देशांशी संबंध सुधारल्याशिवाय आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही, असे जाहीर विधान केले होते. ते पाक लष्कराची संमती असल्याशिवाय केले नसणार, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
 
थोडक्यात, नवाझ शरीफ यांच्याकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. अर्थात, नवाझ शरीफ पंतप्रधान झाल्यावर त्यांचा लष्कराशी किती काळ मधुचंद्र चालतो, यावर बरेच अवलंबून आहे. लष्कराने कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानाला त्याचा पूर्ण सत्ताकाळ लाभू दिलेला नाही. पंतप्रधानाने थोडेही धोरण स्वातंत्र्य घेतले की, त्याला लष्कर पदच्च्युत करते. त्यामुळे नवाझ शरीफ हे लष्कराला उसंत मिळण्यापुरते पंतप्रधान असू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे भारतीय नेत्यांशी चांगले संबंध असले तरी लष्कराच्या संमतीविना ते काहीच करू शकणार नाहीत. त्यामुळे भारताला शरीफ यांच्यावर एका मर्यादेपलीकडे विसंबून राहता येणार नाही. त्यांनी दोन वेळा भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले व त्यामुळे दोन्ही वेळा त्यांना सत्ता गमावावी लागली. तिसर्‍यांदा या कारणामुळे ते सत्ता गमावण्याचा धोका पत्करणार नाहीत.

शरीफ हे यापूर्वी तीन वेळा पंतप्रधान राहिले आहेत. आता चौथ्यांदा ते पंतप्रधान होऊ शकतात. लष्कराची खप्पामर्जी झाली, तर कार्यकाळ संपण्यापूर्वी सत्ता सोडावी लागू नये, यासाठी त्यांना काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील. आतापर्यंत ते सौदी अरबच्या मदतीने फाशी टाळू शकले आहेत. चौथ्यांदा ते पुन्हा अशी जोखीम घेण्याची शक्यता कमी वाटते. त्यांना लष्कराला खुश ठेवूनच कारभार करावा लागणार आहे. त्यांची प्रकृती बरी असली तरी वाढत्या वयाचे त्रास सुरू झाले आहेत. शिवाय आता त्यांना त्यांच्या कन्येसाठी सत्तेचा मार्ग सुकर करायचा आहे. त्यामुळे ते लष्कराशी दोन हात करण्याची शक्यता आता कमी आहे. पण, शेजारी देशांशी संबंध सुधाल्याशिवाय पाकिस्तानची परिस्थिती सुधारणार नाही, हे त्यांना सतत लष्कराला सांगावे लागेल. ते सत्तेवर आल्यानंतर वर्षभरात परिस्थितीत फरक पडला नाही, तर त्यांना लोकक्षोभाला तोंड द्यावे लागेल व त्यात लष्कर त्यांचा सहज बळी देईल.

नवाझ शरीफ यांचा मुस्लीम लीग पक्ष व झरदारी- भुत्तो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी यांचे संबंध सध्या चांगले आहेत. ते येत्या निवडणुकीच्या काळात व नंतर कसे राहतील, यावरही बरेच काही अवलंबून आहे. लष्कराचा व इमरान खान यांचा उपद्रव या दोन्ही पक्षांना झाला आहे, त्यामुळे ते सध्या एकत्र आहेत. निवडणुकीनंतरही ते एकत्र राहिले, तर नवाझ शरीफ यांचे सरकार स्थिर राहू शकेल.

नवाझ शरीफ यांनी येत्या वर्षा-दीड वर्षात पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारली, तर त्यांची सत्ता बर्‍यापैकी बळकट होईल व लष्कराला त्यांना हलवणे अवघड होईल. त्यामुळे शरीफ यांना सत्तेवर येताच आर्थिक सुधारणा हाती घ्याव्या लागतील. भारताशी संबंध सुधारल्याशिवाय ते शक्य नाही. पण, त्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती त्यांना दाखवावी लागेल. ते हे कसे करतात, याची उत्सुकता आहे.

दिवाकर देशपांडे