ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शना खाली, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नजीब मुल्ला यांचा वावर, तळागाळातील माणसांशी जोडलेली नाळ, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटी, यामुळे नजीब मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचावण्याच्या अपेक्षेसह पुढील प्रगतीशील वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.