नितीन गडकरी.... गेली कित्येक दशके महाराष्ट्राच्याच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील एक दिग्गज नेते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि अशा शेकडो हायवे, पुलांच्या निर्मितीचे जनक म्हणजे ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी! राजकीय सभा, मेळावे, नियमित बातम्या, विशेष मुलाखतींमधून गडकरी जनतेसमोर येतातच. पण, त्याहीपलीकडे त्यांचा आजवरचा प्रेरणादायी प्रवास, जनतेची प्रश्न सोडविण्याची त्यांची तळमळ, त्यांचे विकासाचे व्हिजन यांसारख्या बाबी प्रेक्षकांसमोर मांडणार्या ‘गडकरी’ या सिनेमाविषयी...
महापुरूष, दिग्गज राजकीय नेतृत्व किंवा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणार्या व्यक्तिमत्त्वांचे जीवन खरंच एका चित्रपटाच्या चौकटीत सामावणे अशक्य. पण, तरीही मोठ्या पडद्यावर अवघ्या दोन-तीन तासांत अशा व्यक्तिमत्त्वांचा जीवनपट उलगडण्याचे प्रयत्न आजही होतात. कारण, मुळातच राजकारण आणि राजकारणी हा भारतीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे या नेत्यांविषयी, त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांविषयी कायमच एक कुतूहल, उत्सुकता जनतेच्या मनात दिसून येते. राजकीय नेत्यांवरील चित्रपटांची प्रथा तशी नवीन नाही. अगदी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही असेच चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलेले दिसतात. असेच एक आजच्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील एक दिग्गज नेते म्हणजे केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी. त्यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात नितीन गडकरी यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते २०१४ साली केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधीपर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी नितीन गडकरी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना अगदी थोडक्यात, पण परिणामकारक पद्धतीने चित्रपटात मांडल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवेळी नितीन गडकरी आणि त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सहकार्यांनी नागरिकांपर्यंत सत्य परिस्थिती त्यावेळी कशी पोहोचवली आणि त्यासाठी प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खात तुरुंगवासदेखील भोगला, याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते. नितीन गडकरी यांनी कायम ‘राष्ट्र प्रथम’ या विचारसरणीतून देशाचा आणि नंतर संघ-भाजपचा विचार केला, हे चित्रपटांतील प्रत्येक प्रसंगांत अधोरेखित होते. आज महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री म्हणून ज्यांच्या कामगिरीचे कौतुक देशभरात होताना दिसते, ते नितीन गडकरी वैयक्तिक जीवनात कसे होते, त्यांचे त्यांच्या सहकारी मित्रांशी किती घनिष्ट ऋणानुबंध होते, समाजाप्रति त्यांना किती आपुलकी आहे, यांसारखे गडकरींच्या जीवनातील बारकावे टीपणारा हा चित्रपट.
नितीन गडकरी हे प्रारंभीपासूनच लोकांचे, लोकांमध्ये राहणारे, रमणारे नेते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कायमच प्राधान्य दिले. यांसह त्यांच्या आयुष्याशी संबंधित आणि फारसा यापूर्वी प्रकाशझोतात आलेल्या गोष्टी दिग्दर्शकांनी अगदी उत्कृष्टपणे या चित्रपटात मांडल्या आहेत. चित्रपटात एक प्रसंग खरंच मन हेलावून टाकतो. तो म्हणजे, नितीन गडकरींच्या घरी नागरिक आपल्या समस्या घेऊन आले असता, त्यापैकी एका आईचा १९ वर्षांचा कर्ता-धर्ता मुलगा रस्त्यांतील खड्ड्यांमुळे आपला जीव गमावतो आणि तेथे जमलेले बरेच जण केवळ रस्त्यांच्या दुरवस्थेमुळेच गडकरींकडे आलेले असतात. लोकांना त्यांची चूक नसताना जीवाला मुकावे लागत असल्याचे भयाण वास्तव गडकरींना सहन झाले नाही आणि पुन्हा एकदा केवळ समाजाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी त्यांनी २०१४ची लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णय घेतला आणि ते भरघोस मतांनी ती निवडणूक जिंकले.त्यामुळे नितीन गडकरी यांचे समाजाप्रति प्रेम, जिव्हाळा आणि जबाबदारी ही प्रत्येक प्रसंगातून दिसून येते.
याशिवाय चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारलेल्या राहुल चोपडा यांनी अगदी तंतोतंत ‘नितीन गडकरी’ साकारण्याचा केलेला प्रामणिक प्रयत्न मनाला भावतो. गडकरींचा मनमिळाऊ स्वभाव, आपुलकी, आत्मविश्वास आणि त्यांचे जेवणावरील प्रेम या सर्व महत्त्वाच्या बाबी राहुल चोपडा यांनी आपल्या अभिनयातून अगदी चपखलपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. परंतु, या सर्व घटना चरित्रपटात पाहताना एक गोष्ट मात्र जाणवते, ती म्हणजे नितीन गडकरी एक सच्चे नागरिक, राजकीय नेते असून चिकाटी, आत्मविश्वास, धैर्य या सगळ्यांचे अनोखे रसायनच! महाराष्ट्राच्या आणि आता देशाच्या पायाभूत सुविधांच्च्या विकासाचे ध्येय कायम समोर ठेवत वाटचाल करणार्या नितीन गडकरींच्या जीवनावरील हा चरित्रपट नक्कीच आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे.
चित्रपट : गडकरी
दिग्दर्शक : अनुराग भुसारी
कलाकार : राहुल चोपडा, अभिलाश भुसारी, ऐश्वर्या डोरले, तृप्ती काळकर, वेदांत देशमुख
रेटिंग : ३ स्टार
रसिका शिंदे-पॉल