यंदाचा गंधार गौरव पुरस्कार "मराठीतील सुपरस्टार" महेश कोठारे यांना जाहीर

गंधार बाल कलाकार पुरस्कार खुशी हजारेला जाहीर

    28-Oct-2023
Total Views |
Gandhar Gaurav Puraskar Announced
 
ठाणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असामी महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी शनिवारी गडकरी रंगायतन येथे दिली.यावेळी गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आदी उपस्थित होते. तसेच, यावर्षी पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे.

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे तर गेल्यावर्षी अभिनेते सचिन पिळगावकर यांना गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते "महेश कोठारे" यांना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आ. आशीष शेलार यांच्या हस्ते महेश कोठारे याना पुरस्कार देण्यात येणार आहे.