भारत का बच्चा बच्चा ‘जय श्रीराम’ बोलेगा!

    28-Oct-2023   
Total Views |
Article on Indian Hindu Culture Ram Mandir

भारतीय समाज रामनामाच्या माळेत गुंफला गेला आहे. भारतीय समाजाला धर्मश्रद्धा, नीती आणि संस्कृतीच्या एकतेमध्ये संमेलित करणार्‍या प्रभू श्रीरामचंद्राबाबत देशविघातक समाजद्वेष्ट्या लोकांना आकस असणारच. प्रभू श्रीरामचंद्रांचे माहात्म्य कमी करता येत नाही, म्हणून मग रावणाला महात्मा ठरवण्याचे उद्योग काही जण करतात. कामानिमित्त देशभर फिरताना असले उद्योग निधर्मी, डावे आणि मुख्यतः नक्षल समर्थकांकडून होताना पाहिले आहेत. रावण दहनानिमित्त, त्या सगळ्याचा घेतलेला हा आढावा...

भोळ्याभाबड्या समाजाला चिथावणी देणार्‍या दोन-तीन संघटनांनी म्हणे मागे मागणी केली होती की, दसर्‍याच्या दिवशी रावणदहन करणार्‍यांविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा गुन्हा दाखल व्हावा. हे परमेश्वरा, अ‍ॅट्रोसिटी कायदा कशासाठी आहे? जातिभेद करत अन्याय, अत्याचार करणार्‍यांविरुद्ध, या कायद्याद्वारे गुन्हा दाखल करता येऊ शकतो. गोरगरीब आणि पीडित बांधवांच्या रक्षणासाठीचा हा कायदा. रावणाचा पुतळा जाळला, तर कोणत्या गोरगरीब, पीडित बांधवांवर अत्याचार होणार होता किंवा आहे? की रावण पीडित, शोषित, वंचित होता, असे या महाभागांना वाटते? देशाचा बहुसंख्य हिंदू प्रभू श्रीरामचंद्रांना मानतोे म्हणून त्याविरोधात आपण काही तरी केलेले दिसले पाहिजे, म्हणून यांचा हा प्रयत्न असतो. असे करून यांना काय साध्य होणार? काही मूर्ख मंडळींनी तर म्हणे मागणी केली होती की, नाशिकमध्ये शूर्पणखेचे नाक कापले होते.

त्यामुळे नाशिकची ओळख ’शूर्पणखा’ आहे आणि नाशिकमध्ये तिचे भव्य स्मारक हवे. या असल्या मागण्या करणार्‍या लोकांकडे पाहून वाटते की, माणसं इतकी मूर्ख आणि बिनडोक असू शकतात का? या सगळ्यांवर कडी म्हणजे अमोल मिटकरी नावाचा एक तर्कहीन बडबड करणारा माणूस काही लोकांना खुश करण्यासाठी म्हणाला की, ”येत्या अधिवेशनात रावणदहनावर शासकीय बंदी आणा.‘’ रावणाला आदिवासी लोक मानतात. रावणदहन करून आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्या जातात.” अर्थात, अमोल मिटकरी याच्या वैचारिकतेबद्दल काय बोलावे? खरे तर या लेखामध्ये त्याचे नावही, मला लिहावेसे वाटत नाही. पण, म्हातारी मेल्याचे दुःख नसते, तर काळ सोकावतो. या न्यायाने मिटकरीने जे विधान केले, त्यानुसार देशभरातल्या गोष्टींचा मागोवा घ्यायला हवा.

मला ती घटना आठवली, छत्तीसगढच्या इतर भागांत फिरताना दिसले होते की, लोक एकमेकांना ‘राम राम’ करतात. प्रभू रामांची माता कौशल्या यांचे माहेर छत्तीसगढचेच. त्यामुळे राम राम केले, तर हा छत्तीसगढच्या जंगलातला माणूस आपल्याशी संवाद साधेल, असे मला वाटले. अतिशय गरीब आणि त्या दंतेवाडा छत्तीसगढच्या जंगलाच्या बाहेर, तो कधीच गेला नसेल, हे नक्की. त्याच्या हातातल्या द्रोणात लाल चटणी होती आणि त्याला आनंदाने निरखत तो चालला होता. ती मुंग्यांची चटणी होती. त्याला ‘राम राम’ केले, त्याने काहीच उत्तर दिले.

त्याच्याशी स्थानिक संस्कृतीबद्दल बोलावे म्हणून मी त्याला ‘राम राम’ केले होते, त्याने ऐकले नसेल, असे वाटून पुन्हा त्याला अभिवादन केले. ‘राम राम जी...’ मात्र, यावेळी डोळ्यात अंगार फुलवत आणि अतिशय हिंस्रपणे तो जवळ-जवळ ओरडला होता की, ”हम राम राम नही बोलते. आता आम्ही जागे झालोय. त्यांनी आम्हाला सगळा खरा इतिहास सांगितला आहे. जय रावण!” असे म्हणून तो चार ढेंगा टाकत पसारही झाला. त्याचा तो आविर्भाव पाहून आश्चर्यचकित झाले. घटना आहे-दोन वर्षांपूर्वीची. स्थळ आहे छत्तीसगढच्या दंतेवाडा परिसरातील जंगल. त्यावेळी माझ्यासोबत विश्व हिंदू परिषदेचा स्थानिक कार्यकर्ता आणि एक वनवासी कल्याण आश्रमचा कार्यकर्ता तसेच वाहनचालक होता. निबीड घनदाट अरण्य इतकी दाट वृक्षराजी की, दिवसाही तिथे अंधारच होता. पूर्ण जंगलात शुकशुकाट. या असल्या ठिकाणी याला ‘जय रावण’ शिकवणारे कोण आले होते? इथे रस्ता, पाणी, वीज, शाळा निर्माण होऊ नयेत, म्हणून नक्षलींनी बंदोबस्त केलेला.

सरकारने इथे कोणतीही सुविधा द्यायचा प्रयत्न केला की, विकाससामग्रींचा नाश करणे, पळवणे, विकासकामात गावातले कुणी सहभागी झाले, तर त्यांच्यावर भ्याड हल्ला करत त्यांचे अपहरण करणे, खून करणे, बाहेरून मजूर कामासाठी येऊन येत, यासाठी भयंकर दहशत माजवणे असे अनेक धंदे इथे नक्षली करत हाते. या अशा ठिकाणी समाजविघातक शक्तीने ’रावणा’ला पोहोचवले होते. नक्षल्यांनी गावात सज्जनशक्ती पोहोचू नये, यासाठीची पूर्ण हिंसात्मक तयारी करून ठेवलेली होती. पण, आश्चर्य म्हणजे, ज्या परिसरात ‘राम राम’ म्हणायला नकार दिला गेला होता, त्याच परिसरातील गावंच्या गावं ख्रिस्ती झाली होती. चर्चव्यवस्थेला तिथे संचार करण्यास पूर्ण मुभा होती.
 
हा इतका सगळा घटनाक्रम सांगण्याचा उद्देश हाच की, भोळ्याभाबड्या आणि जंगलापुरतेच आयुष्य मर्यादित असलेल्या आदिवासींना राम नव्हतेच. पण, ‘रावण तुमचा बाप आहे. रावण तुमचा पूर्वज आहे, रावण महात्मा आहे’ हे सांगायला काही लोक तन-मन-धन देऊन काम करतात. अर्थात, त्यांचे संचलन करणारे दुसरेच आहेत. या लोकांना भारताला तोडायचे आहे. हिंदू समाज उभा राहू नये, यासाठी त्यांची सगळी धडपड. महाराष्ट्रातही दाट जंगलामध्ये वसणार्‍या बांधवांमध्येही रावणाची महानता सांगणारे लोक पोहोचून जमाना झाला आहे. गोंडी भाषेमध्ये ‘रावेन’ म्हणजे ‘राजा’ तसेच पूर्वजही मानले जाते. ज्यांना हिंदू समाज एक झालेला पाहवत नाही, अशा काही विद्वेषी लोकांनी ‘रावण’ आणि ’रावेन’ शब्दसाधर्म्यांचा वापर केला. वनवासी समाजबांधवांना चिथवण्यासाठी या लोकांनी कुभांड रचले. त्यांनी वनवासी बांधवांना सांगितले की, आपल्यामध्ये राजाला किंवा पूर्वजांना ‘रावेन’ बोलतात. तो ‘रावेन’ म्हणजेच लंकेचा रावण होय. मग लंकेचा रावण आणि वनवासी बांधव यांचे नाते शोधण्यासाठी या लोकांनी काय-काय तर्कहीन उपद्व्याप सुरू केले, याला तोड नाही.

आर्य-अनार्य सिद्धांत काय? राज्य सिद्धांत काय? एक ना अनेक. वनवासी समाजाला भडकवण्यासाठी हे लोक सांगतात की, राम हे आर्य होते आणि रावण अनार्य. रावण आपला पूर्वज होता. त्याचे राज्य तिन्ही लोकांमध्ये होते. रामाने वनवासाच्या नावाने अनार्यांचा राजा असलेल्या रावणाच्या प्रदेशावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आपल्या राज्यातील कुठच्याही भागात कुणी अतिक्रमण करत असेल, तर कोण सहन करेल? त्यामुळे रावणाने रामाला समज देण्यासाठी सीतेचे हरण केले. रावणाच्या या कृत्याचे समर्थन करण्यासाठी ’महात्मा रावण’ या पुस्तकाचा लेखक कोलते म्हणतो की, ”इंग्रजांनी भारताला पारतंत्र्यात ठेवले. त्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी विरोध केला. गांधीजी जितके देशभक्त होते, तितकाच रावण देशभक्त होता आणि त्याचे भाऊही तितकेच देशभक्त होते.” (यावर प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या राम मंदिरावर आक्षेप घेणार्‍या काँग्रेसींचे काही म्हणणे आहे की नाही?) राम उत्तर भारतातील आणि त्यातही बाहेरून आलेला माणूस आणि रावण हा मूळचा सत्ताधीश असलेला अनार्यांचा राजा, असे चित्र रंगवण्याचा हे लोक प्रयत्न करतात.

त्यात हे लोक खुशाल सांगतात की, राक्षस म्हणून रामायणात ज्यांचा उल्लेख होतो, तसे लोक दंडकारण्य ते पुढे श्रीलंकेपर्यंत होते. हे सगळे अनार्य होते. या अनार्यांना म्हणे रामायणात राक्षस म्हटले आहे. या लोकांच्या बोलण्याला काही तरी पुरावा आहे का? खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मान्य केले की, आर्य बाहेरून आलेले नाहीत. तसेच इतिहासाचा परामर्श घेताना कुठेही पुरावा सापडत नाही की, भारतखंडामध्ये कुणी आर्यबिर्य बाहेरून आले होते म्हणून. सज्जन आदर्श पुरुषाला ‘आर्य’ संबोधण्याची पद्धत असावी, असा निष्कर्ष मात्र काढला जातो. पण, तरीही गेले अनेक दशके हे लोक आर्य-अनार्य वगैरे म्हणत भोळ्याभाबड्या समाजावर रावणप्रेम लादण्याचा प्रयत्न का करत असावेत?

तर उत्तर सहज सोपे आहे की, भारत हा देश विविधतेतून एकता साधणारा आहे. इतकी विविधता असूनही भारत एकसंध आहे. त्याला बांधणारी त्याची संस्कृती आणि धर्मनिष्ठा आहे. या संस्कृतीचे बंधच नष्ट केले आणि समाजाची धर्मनिष्ठाच संपवली, तर भारताचे अखंडत्व विनासायास धोक्यात येईल. भारताचे तुकडे होण्यास कुणीही रोखू शकणार नाही, असे यांना वाटते. त्यामुळे रामनामाने एकत्र आलेल्या समाजात रावणप्रेम निर्माण करण्याचे, हे लोक कुटिल षड्यंत्र रचतात.

रावण कसा मूळचा याच भूमीतला होता, हे दाखवण्यासाठीचा त्यांचा अट्टहासही मोठा हास्यास्पदे. अनेक वनवासी समाजगटांमध्ये मातृसत्ताक पद्धत आहे. (त्यात काही गैर आहे असे नाही) तर या मातृसत्ताक पद्धतीचा संबंध लावत काही लोक वनवासींना सांगतात की, ’रावणाची आई ही राक्षस कुळातली म्हणजे अनार्य म्हणजेच जंगलातली आदिवासी होती. तुम्ही मातृसत्ताक पद्धत मानता. त्यादृष्टीने अनार्य असलेल्या कैकसीचा पुत्र रावण हाच तुमचा पूर्वज.’ इतकेच काय, रावण हाच या देशाचा भूमिपुत्र होता, हे ठसवण्यासाठी ते कधी सांगतात, रावणाचा जन्म दिल्लीच्या नोएडा जवळचा, तर कधी सांगतात, विंध्य पर्वतावरचा. नोएडाजवळ सांगताना पुरावा काय देतात, तर इथे बिसरख नावाचे गाव आहे आणि रावणाच्या पित्याचे नाव होते ऋषी विश्रेवा, तर या विश्रेवा यांच्या नावावरून गावाचे नाव बिसरख पडले. त्यामुळेच या गावी रावणाचा जन्म झाला, असे हे लोक सांगतात, तर रावण मूळचा विंध्य पर्वतावरचा सांगताना हे लोक महायान बौद्ध पंथातील ’लंकावतार सुत्ता’चा दाखला देतात. या सुत्तात म्हणे असे लिहिले आहे की, ”बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर नऊ महिन्यांनी नंतर पाच वर्षांनी आणि नऊ वर्षांनी तथागत गौतम बुद्ध लंकेत गेले होते.” त्यांचा उपदेश ऐकून रावणाने ठरवले की, बुद्धांना लंकेत आमंत्रित करायचे.

त्यानंतर बुद्धांनी रावणाला धम्मोपदेशही केला. रावण हा अहिंसक आणि न्यायी होता, असे या सुत्तातील १०८ प्रश्नोत्तरांवरून दिसते. या सुत्ताचा अधार घेत, मग हे लोक त्यांचा सिद्धांत मांडतात की, लंकावतार सुत्तामध्ये बुद्ध श्रीलंकेत गेल्याचा हा काळ होता-इसवी पूर्व ५२८ ते ५१९. हा काळ श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार होण्याआधी २७९ वर्षांपूर्वीचा. मग बुद्धांनी कोणत्या लंकेत कोणत्या रावणाला धम्मोपदेश केला? आणि कोणत्या अहिंसावादी रावणाने बुद्धांचे स्वागत केले? हा प्रश्न मांडून हे लोक स्वतःच उत्तर देतात की, आता जी रावणाची श्रीलंका समजली जाते, ती श्रीलंका नाहीच. तिथे रावणाचा जन्म झाला नाहीच. तिथे रावण राहतच नव्हता, तर तथागत बुद्धांनी जो धम्मोपदेश केला, तो विंध्य पर्वतावरील लंकेत राहणार्‍या रावणाला. विंध्य पर्वतावर म्हणजे गुजरात-राजस्थान-मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश वगैरे पट्ट्यांमध्ये लंका अस्तित्वात होती. त्यामुळे रावण विंध्य पर्वताचा भूमिपुत्र आणि या पट्ट्यातल्या तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील (त्यात महाराष्ट्राचा सातपुडा पर्वतभागही आला) गिरीपर्वतावर जंगलात राहणार्‍या सगळ्यांचा रावण पूर्वज आहे. यावर अभ्यासकांचे म्हणणे आहे की, लकांवतार सुत्ताचे तीनवेळा भाषांतर झाले. इसवी ४३३ मध्ये गुणभद्राने, ५१३ मध्ये बोधिरुचीने आणि इसवी सन ७०० ते ७१४ मध्ये शिक्षानंदाने भाषांतर केले. यात इसवी सन ४३३ मध्ये गुणभद्राने जे भाषांतर केले होते, त्यात रावण आणि त्याचे महिमामंडन केलेले नव्हते. मात्र, पुढे जी भाषांतरे झाली, त्यामध्ये लंका आणि रावण या दोघांचेही महिमामंडन केलेले होते.

अरे देवा! किती तो द्राविडी प्राणायम.! नशिबी श्रीलंकेमध्ये पिढ्यान्पिढ्या गाथा-कथातून मांडले गेले की, रावण त्यांच्याच भूमीतला. श्रीलंकेमध्ये पूर्वी कधीही कुणीही रावणाची पूजा करत नसत आणि त्याला पूर्वजही मानत नसत. त्याला बलशाली विद्वान राज्यकर्ता म्हणून तिथे ओळखतात. श्रीलंकेमध्ये १९८०च्या दशकात रावणनाम ऐकू येऊ लागले. कारण, श्रीलंकेमध्ये १९८० साली सिंहली आणि तामिळ गृहयुद्ध सुरू झाले. त्यावेळी तामिळी हे मूळचे भारतीय हिंदू आणि ते रामाला मानतात, असे श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहलींचे मत. त्यामुळे तामिळींना आणि त्यांच्या धर्मश्रद्धेला विरोध करण्यासाठी रामाला नव्हे, तर रावणाचा उदोउदो करण्याचा पायंडा इथे सुरू झाला आणि १९८० नंतर श्रीलंकेमध्ये रावणाचे नाव ऐकू येऊ लागले. श्रीलंकेचे नागरिक रावणाला पूर्वज मानत नाहीत, बाप मानत नाहीत. मात्र, आपल्याच देशातले काही लोक केवळ हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर आघात करावा म्हणून रावणाला बाप मानतात.

दुसरे असे की राम होते की नव्हते? अयोध्येतच रामाचा जन्म झाला का? रामसेतू आहे तरी का? रामायण काल्पनिक आहे, असे म्हणत सारखे कंठशोष करणारे हे लोक रावण होता, हे मात्र मान्य करतात. तसेच रामापेक्षा रावण किती चांगला होता, असे सारखे यांचे पालुपद असते. पण, रावण तर जन्माने ब्राह्मण होता. हिंदूंच्या रामनिष्ठेला विरोध करताना यांना ब्राह्मण रावणाचे वावडे वाटत नाही. उलट ब्राह्मण रावण यांचा प्रेरणास्रोत होतो. या रावणप्रेमी लोकांचे नैतिक आणि मानसिक गोंधळलेपण स्पष्ट आहे. आता तर काय, राममंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीखच जाहीर झाली आहे. दि. २२ जानेवारी २०२४. त्यामुळे अनैतिकतेचे, हिंसेचे आणि अन्यायाचे समर्थन करणारे हे रावणप्रेमी लोक अक्षरशः सैरभैर झाले आहेत. देश, समाज, संस्कृती तोडण्याासाठी चालवेल्या प्रयत्नांना राममंदिर निर्मितीमुळे मूठमाती मिळत आहे, हे पाहून हे लोक ठार वेडेपणा करत आहेत. पण, त्याने काय होणार? देशात सध्या एकच वातावरण आहे,
हर घर मे अब एक ही नाम
एकही नारा गुंजेगा
मेरे भारत का बच्चा बच्चा
जय जय श्रीराम बोलेगा!!!
 
९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.