सध्या मनोरंजनसृष्टीत ‘बायोपिक’ची अर्थात आत्मचरित्राची लाटच आली आहे, असे काहीसे चित्र दिसून येते. मग या वाहत्या पाण्यात मराठीतील एका नवोदित दिग्दर्शकानेही आपले नशीब आजमावलेले दिसते. पण, मराठीतील या दिग्दर्शकाने आणलेलं आत्मचरित्र हे कोणा महापुरुषाचे किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे नसून, ते आत्मचरित्र आहे चक्क एका सामान्य व्यक्तीचे! आत्मचरित्र हे केवळ इतिहासात नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेल्याच महान व्यक्तींचे नसू शकते, हे ‘आत्मपॅम्फलेट’ या चरित्रपटातून दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि लेखक परेश मोकाशी यांच्या साथीने सिद्ध करून दाखवले आहे.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे आत्मचरित्र कोणा दुसर्या-तिसर्याचे नसून चक्क चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांचेच. आत्मचरित्र हे केवळ एका व्यक्तीचे नसून त्या व्यक्तीभोवती घडलेल्या अनेक घटनाही त्यात तितकीच मोलाची भूमिका बजावतात. शालेय जीवनातील बालपणीच्या प्रेमापासून झालेली आत्मचरित्राची सुरुवात शेवटाला अगदी एलियन्सपर्यंत म्हणजेच आकाशगंगेपर्यंत पोहोचते. पण, त्या प्रेमकथेमागे जात-धर्म या समाजात पिढ्यान्पिढ्या मुरलेल्या विचारांनादेखील आंतरआकाशगंगीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.
चित्रपटाचा नायक अर्थात आशिष यांच्या बालपणाच्या अनेक घटना या साधारण १९०० सालात जन्मलेल्या प्रत्येक प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील. शालेय जीवनात जात-धर्म वर्णभेदाची फारशी समज नसते. परंतु, घरातील संस्कार किंवा सामाजिक, राजकीय जीवनात घडणार्या घटना विद्यार्थ्यांना हा भेद आपसुकच अधोरेखित करून देतात. चित्रपटात नायक अर्थात आशिष शाळेत दरवर्षी शाळेचे नवीन वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी एका अर्जावर सही करताना दाखवला आहे, तर दुसरीकडे इयत्ता चौथीपासून एका मुलीवर त्याचे प्रेम असते आणि तिला त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी त्याचे मित्र कशी त्याची मदत करतात, हे दाखवले आहे.
या संपूर्ण चित्रपटाच्या मांडणीत चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी कथा सांगणारे निवेदकही आहेत. एकीकडे प्रेम व्यक्त करण्याची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे नायकाच्या मित्रांची जात, धर्म एका विशिष्ट प्रकारे सांगण्यात आली आहे. मग काय, त्यानंतर घडणारेे प्रसंग चित्रपटात खुबीने मांडण्यात आले आहेत. म्हणजे चित्रपटाचा नायक हा बौद्ध समाजाचा असल्यामुळे त्याला शालेय फी माफ करण्यात आली आहे. यावरून त्याचे इतर जातीय मित्र शिक्षकांना जाब विचारतात. परंतु, शिक्षकांकडेही विद्यार्थ्यांच्या या शंकेचे निरसन करण्यासाठीच उत्तरच नसते आणि त्यामुळे वादाची स्थिती उद्भवते. त्यावेळी त्यांच्या लक्षात येते की, आपले रक्त हे लालच आहे. त्यामुळे आपण एकमेकांचे बंधू आहोत आणि आपण कधीही मैत्रीआड जात किंवा धर्म आणता कामा नये. येथे दिग्दर्शकांनी विद्यार्थ्यांमधील जातीयता त्यांनी स्वत:च कशी दूर केली, याचे उत्तम उदाहरण दाखवले आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, हिंदू, मुस्लीम, बौद्ध असे विविध धर्म, जातीजमाती यांचेही एक भावनिक, मानसिक नाते खोलवर आहे, हेदेखील अनेक प्रसंगांतून दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटातून एकीकडे शिक्षणाअभावी खुंटलेली एका समुदायची प्रगती आणि दुसरीकडे शिक्षणाचे महत्त्व जाणून आपले जीवन सुखकर करणारा समुदाय, अशा दोन्ही बाजू दिग्दर्शकाने उत्कृष्टरित्या मांडल्या आहेत. तसेच, चित्रपटाचे कथानक पुढे जात असताना नेमका हा काळ कोणता आहे, हेदेखील अनेक घटनांमधून उलगडत जाते. कोणत्याही जातीधर्माचा अवमान न करता, विद्यार्थ्यांच्या मनातील जातीभेद नाहीसा करण्याचा प्रयत्न नकळतपणे या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
एकीकडे शालेय जीवनातील नायकाचे प्रेम प्रकरण पुढे सरकत असताना, दुसरीकडे हळूच आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्याला देखील दिग्दर्शकाने स्पर्श केला आहे. नायकाची प्रेमिका ही उच्च जातीची असून तिच्याशी दुसर्या जातीतील तरुणाचे लग्न कसे होणार, शिवाय ही संबंध घटना ज्या साली घडत आहे, त्यावेळचा समाज हे सगळे कितपत मान्य करेल, यादेखील शक्यता अचूक ओळखत दिग्दर्शकाने यावर सूचक भाष्य केले आहे. शिवाय आंतरजातीय विवाह भारतात समाज, पालक खुल्या विचारांनी स्वीकारतील, त्यावेळी जागतिक पातळीवर त्याचा कसा परिणाम होईल आणि इतर देश याचा कसा गैरफायदा घेऊन भारतीयांमध्ये फूट पाडतील, वगैरे पुढचा विचारदेखील दिग्दर्शकाने कथानकातून मांडला आहे.
२१व्या शतकातही जाती-धर्मावरून सुरू असणारी सामाजिक, राजकीय धुसफुस अतिशय मार्मिकपणे मांडण्याचा दिग्दर्शक आणि लेखकाचा प्रयत्न खरेच वाखाणण्याजोगा आहे. त्याशिवाय चित्रपटातील प्रत्येक बालकलाकारांनी आणि इतर कलाकारांनी अभिनय करत चित्रपटाचा आलेख उंचावर नेऊन ठेवला आहे. परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणार्या ‘आत्मपॅम्फलेट’ या चित्रपटाला महाराष्ट्रात अतिशय अल्प प्रतिसाद मिळालेला दिसतो. एकीकडे मराठी प्रेक्षक उत्तम कलाकृती पाहतो आणि त्यांना प्रतिसाद हा चित्रपटगृहात जाऊन देतो, असे म्हटले जाते. मात्र, दुसरीकडे जातीधर्मासारख्या गंभीर विषयाला अतिशय चपखलपणे हाताळणार्या या चित्रपटाचे मोजके शो ही तितकीच निराशाजनक बाब म्हणावी लागेल.
चित्रपट : आत्मपॅम्फलेट
दिग्दर्शक : आशिष बेंडे
कलाकार : ओम बेंडखळे, भीमराव मुडे, प्रांजली श्रीकांत, केतकी सराफ
रेटिंग : ***
रसिका शिंदे-पॉल